खीरीची गंमत

खीरीची गंमत

शिक्षण विवेक    18-Oct-2023
Total Views |

खीरीची गंमत
मला रेसिपी करताना भरपूर मजा येते. रविवारचा दिवस होता, सर्व जण बाहेर गेले होते. घरात कुणीसुद्धा नव्हते, तर मी एक रेसिपी केली ‘खीर’. खीर करताना जे मला हवं होतं, ते आई किचनच्या ओट्यावर ठेवून गेली होती आणि मला कशी खीर करायची तेसुद्धा सांगून गेली होती. कारण मी कधीसुद्धा किचनमध्ये गेले नव्हते, पण मला आईचे शब्द आठवले. मग मी न घाबरता किचनमध्ये गेले. गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली, दूध घातले, पाच मिनिटे चांगले उकळू दिले. उकळून झाल्यावर त्यात वेलची घातली. तांदूळ आधीच भिजवले होते. ते बारीक वाटले आणि त्या सारणात घातले. त्यानंतर काजू, बदाम, केसर घातले आणि १० मिनिटे शिजवायला ठेवले. शिजवून झाल्यानंतर गॅस बंद केला आणि दारावरची बेल वाजली. दार उघडले तर, दारात आई उभी होती. आई घरात आली आणि म्हणाली, ‘खूप खमंग सुवास सुटलाय. काय केलयंस गं?’, ‘अगं आई, तू म्हणाली होतीस ना; खीर कर. तीच केली आहे.’ आई म्हणाली, ‘मी तोंड हात पाय धुते, तू मला खीर खायला दे. खीर काढून टेबलावर ठेव जा.’ आईने खीरीची चव घेतली. आई तेव्हा काहीसुद्धा म्हणाली नाही. पण आई नंतर म्हणाली, ‘अगं सानू, याच्यात साखर नाही.’ आई असं म्हणाल्यावर, माझी पंचाईत झाली. ‘पण आई, मी, जे तू म्हणालीस ते सर्व घातले होते.’ आई म्हणाली, ‘खीर गरम आहे ना?’ मी हो म्हटले. आई म्हणाली, ‘जा त्यात ५ चमचे साखर घाल आणि चांगली हलवून घे.’ आईने सांगितल्याप्रमाणे मी सर्व केले आणि खीरीची चव चांगली लागू लागली. माझी खीर करायची ही पहिलीच वेळ होती. पण त्यातून मी खीर करायला शिकले.
- संचिता क्षेत्रे,
विद्यामंदिर मांडा, टिटवाळा