गझल - सुरेश भट
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले
लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले
पांगळे आयुष्य थकुनी बैसले वाटेवरी
जागच्या जागीच मजला परत यावे लागले
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
रसग्रहण :
सुरेश भट यांची ही गझल समाज आणि ते यांच्यातील त्यांच्या वाईट काळातले संबंध, आलेले दु:ख, तेव्हाची मनोवस्था, त्या वाईट काळातही कवितेशी निष्ठा प्रकट करणारी एक रचना.
पहिल्याच शेरात जे दु:ख त्यांनी सहन केले त्यांना सुख म्हणावे लागले. बऱ्याचदा सुख येण्यापूर्वी भोगलेल्या वेदना, दु:ख हे नंतर सुखाची गोडी वाढविणारे ठरते किंबहुना काही वेदना याच सुखदायी असतात. भोगताना असह्य होत असल्याने ते त्रासदायक वाटलेले दु:ख, नंतर आठवण झाली की त्यावर हसावे लागले, एवढे दु:ख वाट्याला आली की, त्यातील काही हास्यास्पद वाटू लागले.
तरीही कधी रडत बसलो नाही. कठोरपणे सामना केला. शिवाय कोणापाशी रडलो नाही. उलट इतरांच्या दु:खात सहभागी झाल्यामुळे भिजावे लागले म्हणजे हृदयार्द्र व्हावे लागले.
दु:खात भेटण्याची औपचारिकता पार पाडण्यासाठी आलेल्या लोकांनी वरवर विचारपूस करून काढता पार घेऊन गेले, तेव्हा मलाच माझी वेदना सहन करावी लागली. खुशाली देखील माझी मलाच विचारावी लागली.
जीवनात अनेक परिवर्तने आली. त्यातून इतका बदलत गेलो की, आता मी कसा होतो तेही आठवत नाही.
पांगळे आयुष्य म्हणजे ध्येयविरहीत जीवन. हे दु:खाने थकलेले, थांबले होते. त्यामुळे जीवनातील महत्वाकांक्षा, मोठी स्वप्ने सोडून जागेवर यावे लागले.
आधी कधीतरी कविता करायचे ठरवलं होते, वचन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी परत कवितेकडे वळलो, तेव्हा कवितेचे विषय हे ते माझे राखरांगोळी झालेले आयुष्य होते. तेच गुनगुणायला लागले स्वरबद्ध झाले.
अशाप्रकारे जीवनातील दु:खाने रडत न बसता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, जे काही आपल्याकडे आहे त्यातून परत सुरूवात करत, पुन्हा सुंदर आयुष्य जगता येते, असा आशय आणि संदेश या कवितेतून मिळतो.
- सुदाम पोल्हारे, सहशिक्षक,
आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण