माडग्याची गोष्ट

माडग्याची गोष्ट

शिक्षण विवेक    05-Oct-2023
Total Views |

माडग्याची गोष्ट
आमची पिढी म्हणजे इंटरनेट, मोबाईल इ. शिवाय मोठी झालेली, म्हणजेच आमचं बालपण अगदी निवांत आणि ताणतणाव विरहीत. खर्‍या अर्थानं आनंदी बालपण.
अशीच एक लहानपणीची खूप हळवी आठवण आहे. साधारण जुलै-ऑगस्ट महिन्यात आमच्या आजोळी भात लावणी सुरु व्हायची आणि आम्ही सारी भावंडे शनिवार, रविवार, एखादी जोडून सुट्टी आणि एखादी दांडी असे नियोजन करून आजीच्या मदतीला हजर व्हायचो.
भर पावसात शेतात भातलावणीची तयारी सुरु असायची. भात ज्या शेतांच्या छोट्या तुकड्यांत लावला जातो, त्याला ‘खाचर’ म्हणतात. अशा खाचरांमध्ये बैलांच्या साहय्याने चिखल केला जातो. या कामाला ‘चिखलणी’ म्हणतात आणि फुटभर पाय रोवेल अशा चिखलात भाताची तयार केलेली रोपे, ‘तरवा’ ओळीने लावली जातात.
वरून पडणाऱ्या संततधार पावसात, डोक्यावर इरली घेऊन २५ ते ३० जणांचा गट भातलावणी करायचा. हिरवेगार डोंगर, शेताच्या बांधांवरून वाहणारे लहानमोठे आहोळ, रिमझिम पाऊस आणि पारंपरिक गाणी म्हणत भातलावणी करणारे शेतकरी असे विहंगम दृश्र मनात अगदी कोरलं गेलं आहे.
आम्हा मुलांसाठी मात्र ही मोठी पर्वणी असायची. आजीने सर्वांसाठी केलेला स्वयंपाक एका पाटीत भरून, आम्ही तो घेऊन शेतावर यायचो. जमेल तशी थोडीफार मदत करायचो. पावसात भिजायचो, चिखलात आणि पाण्यात मनसोक्त खेळायचो आणि दुपारनंतर घरी परतायचो.
घरी परतल्यानंतर मात्र खूप भूक लागलेली असायची आणि भिजल्यामुळे थंडी वाजायची आणि अशा वेळी आजी आमच्यासाठी करायची गरमागरम ‘माडगं.’ आजी मायेनं, प्रेमानं आम्हाला पोटभर खाऊ घालायची आणि त्यासाठी तिने आधीच माडग्याची पूर्वतयारी केलेली असायची.
आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर, माडगं म्हणजे एक प्रकारचं सूप, ते तयार केलं जातं कुळीथ किंवा डुलगे या कडधान्याचं. यासाठी कुळीथ हलकेसे भाजून ते भरडावे लागतात. भरडणे म्हणजे जाडसर दळणे. आजी हे पीठ पावसाळा सुरु होताच भरडून ठेवायची आणि अर्थातच जात्यावर !
गरज भासल्यास पाणी उकळून त्यात तांदळाच्या कण्या आणि कुळीथाचे पीठ घालून, छान माडगे तयार होते. त्यात अजून फक्त मीठ आणि गूळ टाकला की, झाले चवदार आणि पौष्टिक माडगे तयार! केवळ दोन तीन पदार्थ वापरून तयार केलेले माडगे, पावसाळ्यात खाणे म्हणजे अवर्णनीय आनंद असायचा.
ती चव, ती चुलीची ऊब आणि आजीचा प्रेमळ चेहरा... हा प्रसंग स्मृतीपटलावर अगदी कायमच कोरला गेला आहे.
आता ना लहानपण आहे, ना आजी, ना माडगे आहेत...
आहेत केवळ त्यांच्या आठवणी.
- विजया शिंदे,
कन्याशाळा सातारा