पडदा उघाडतो sssssss
(सगळी मुलं सोसायटीच्या बागेत खेळत असतात. तिकडून धावत विनू येतो. )
विनू: तुम्ही तयारी केली दिवाळीची?
आपण दिवाळीत मस्तपैकी किल्ला करूया आणि मी ना घरीच आकाश कंदील बनवणार आहे यावर्षी.
सनी: ए मला पण शिकवशील?
विनू: हो नक्की शिकवीन की खूप मजा येते आकाश कंदील करायला आणि आपण किल्ला पण करूया. ठरलं तर मग..........
चिंगी : हो मलाही करायला आवडेल. चला आपण छान रंगीबेरंगी कागद आणून त्याचे आपण आकाश कंदील करूया आणि सगळ्या सोसायटीत लावूया किती छान वाटेल ना?
विनू : तुम्ही फटाके आणले?? मी तर पप्पांना या वेळेस सांगितलं आहे की मला सगळे मोठे फटाके हवेत उडणारे आणि वर जाऊन रंगीत चकमक दिसणारे फटाके हवे. खूप छान दिसतात ते. मला फार आवडतात.
सानिया: ए मला ना एक आयडिया सुचली आहे, बघा तुम्हाला पटते का? यंदा आपण फटाके नको आणू या. त्याने एक तर खूप प्रदूषण होतं आणि आपण त्या फटाक्यांच्या वाचलेल्या पैशात वॉचमन काकांची प्रमिला आणि त्या समोरच्या झोपडीत राहणारी बबली आहे ना त्यांना पण छान कपडे आणि फराळाचं देऊया. त्यांना पण खूप आनंद होईल.
विनू: खूपच मस्त आयडिया आहे मला आवडली.
(सगळेच ओरडतात हो खूपच आवडली आम्हाला आयडिया आपण नको घेऊ या या वर्षी फटाके. मग सगळेच सोसायटीच्या चेअरमन काकांकडे जातात.)
सगळे: काका आम्हाला तुमच्याशी थोडं काम आहे तुम्हाला वेळ आहे का?
चेअरमन काका: हो आहे की बोला तुम्ही, काय हवय तुम्हाला?
सानिया: काका आम्हाला वाटतं फटाके वाजवले की ध्वनी आणि वायू प्रदूषण होतं म्हणून या वर्षी फटाके न घेता त्या पैशातून वॉचमन काकांच्या प्रमिला आणि त्या समोरच्या बबलीला चांगले कपडे आणि फराळाचं द्यावं असं आम्हाला वाटतं.
चेअरमन काका: अरे वा!! मस्त आयडिया आहे तुमची. माझ्या कडे अजून एक आयडिया आहे बघा तुम्हाला पटते का? आपण दिवाळी जर अनाथ आश्रमात साजरी केली तर?
विनू: काका तुमची आयडिया खूप भन्नाट आहे. पण मग एवढ्याशा पैश्यात काय देणार आपण त्यांना?
चेअरमन काका: सोसायटीतले कोणी तयार असतील तर त्यांच्या कडून वर्गणी गोळा करायची. कोणालाही जबरदस्ती करायची नाही. बघू किती रक्कम जमा होते ते. मग ठरवू काय करायचं ते.
(दोन दिवस सगळी मुले घरोघरी फिरून येतात. त्यांना भरपूर वर्गणी मिळते. दोन दिवसांनंतर काकांना भेटतात)
विनू : काका अहो काय सांगू काय सॉलिड रिस्पॉन्स मिळाला आहे. भरपूर वर्गणी गोळा झाली. जोशी काकू तर फराळाचं द्यायला पण तयार झाल्या आणि त्यांचं बघून सगळेच जण फराळाचे पदार्थ देणार आहेत. काका तुम्ही काहीही म्हणा आपली दिवाळी दणक्यात साजरी होणार.
यश: काका आता काय करायचं सांगा तुम्ही.
चेअरमन काका: आता मी आपल्या जवळच्या 'आजोळ' अनाथ आश्रमात फोन करून त्यांची परवानगी घेतो.
(काका फोन करुन अनाथ आश्रमात दिवाळी साजरी करण्याची परवानगी घेतात.)
चिंगी : ए आपण सगळे मिळून भरपूर आकाश कंदील तयार करू. सगळ्या सोसायटी मध्ये आणि आजोळ मध्ये पण लावू या.
(सगळी मुले आकाशकंदील तयार करतात, पण त्या रंगावतात सगळी तयारी करतात दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळे जण आजोळ मध्ये जायला निघतात.)
सानिया: काका फराळाचं साहित्य भरपूर जमा झालय आता सगळे डबे असेच न्यायचे की पॅक करून द्यायचं फराळाचं सगळ्यांना??
चेअरमन काका: मला वाटतं आपण डबे असेच नेऊ या आणि मस्त पंगत बसवून वाढू या. चालेल ना तुम्हाला?
विनू : हो काका गूड आयडिया!!
श्रुती: ए चला लवकर आज जाऊन आपण तिथल्या सगळ्या मुलांना घेऊन किल्ला बनवू या. आणि त्यांना आजच नवीन कपडेही देऊ म्हणजे ते उद्या घालून तयार होतील.
सगळे किल्ला करायला जातात. सगळे ताई, दादा आणि आजोळ मधली मुले मस्त किल्ला तयार करतात, त्यावर रंगीबेरंगी पणत्या ठेवतात, सगळी कडे सुंदर सुंदर आकाश कंदील लाऊन मुलांना नवीन कपडे देतात. आजोळ मधली मुले तर खूपच खुश असतात.
सानिया: (आजोळ मधल्या मुलांना) ए चला आता आम्ही निघतो. उद्या सगळ्यांनी लवकर उठून पहाटे लवकर अंघोळ करून नवीन कपडे घालून तयार रहा आम्ही पहाटेच येणार आहोत.
अनाथाश्रमातील मुले: हो चालेल दीदी. बाय....
दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सोसायटीतले सगळे लहान मोठे पहाटे स्नान करून खाली गोळा झाले. आज सगळेच तिकडे दिवाळी साजरी करणार होते.
यश: ए सगळं घेतलं का? खाद्य पदार्थांचे बॉक्स, रांगोळ्या, पणत्या आणि इतर पदार्थ, प्लेट्स वगैरे..
सानिया: हो हो मी स्वतः सगळं चेक केलंय.
चिंगी: मी प्रमिला आणि बबलीला पण बोलावते.
सगळे जण आजोळला जातात. ती मुलं पण उत्साहाने तयार होऊन बसलेली असतात. मग काय सगळ्या मुली रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात. पणत्या पण लावतात. सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं.
सानिया: पहाटेच्या अंधारात आकाशकंदीलाचा प्रकाश, सुंदर सुंदर रांगोळ्या, अंगाला झोंबणारा गार वारा, वाऱ्याने होणारा झिरमिळ्यांचे आवाज, अंगणात लावलेल्या पणत्या किती छान वाटतं आहे सगळं.
यश: हो ना किती मस्त वाटतंय.
जोशी काका: चला आपण थोडे पहाटेचे श्लोक म्हणू या.
सगळे प्रार्थना करतात. सुर्य उगवला की त्याची पूजा करतात. काका प्रार्थनेचं महत्त्व समजावून सांगतात.
चव्हाण काका: मुलांनो चला सतरंज्या अंथरा बघू, आता थोडी पोट पूजा करूया.
मग सगळे गप्पा टप्पा करत फराळ करतात. सगळी मुले आणि मोठी माणसं मिळून स्वयंपाकाचा बेत करतात. चुलीवर मस्त फर्मास स्वयंपाक करतात. दुपारी अंगत पंगत करत जेवण करतात. अंगात पंगत केल्याने सगळे दोन घास जास्तच जेवतात. संध्याकाळी सगळेजण लक्ष्मी पूजनाची तयारी करतात. सगळं अंगण दिव्यांच्या प्रकाशाने उजळून जातं. थाटामाटात सगळे लक्ष्मीची पूजा करतात. खूप धमाल येते. सगळ्या लहान मोठ्यांनी दिवसभर खूप एन्जॉय केलं. आता मात्र घरी जाण्याची वेळ येते.
चेअरमन काका: कशी वाटली दिवाळी?? मज्जा आली की नाही सगळ्यांना?
सगळे: हो खूप मज्जा आली. आता दरवर्षी इथेच दिवाळी साजरी करायची.
चेअरमन काका: (आजोळ मधल्या मुलांना) आता तुम्ही एकटे नाही बरं का... आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत.
सगळे: हो ssssss
(अनाथाश्रमातील मुले खूपच आनंदी होतात. त्यांनी अशी दिवाळी कधी पहिलीच नसते. सगळेच आनंदाने भारावून जातात. मुलांच्या पुढाकाराने अशी अनोखी दिवाळी सगळेच अनुभवतात.)
पडदा पडतो. ssssssss
नाव: सौ. मंजुषा महेश गारखेडकर
संपर्क क्र:9766309248
इ मेल:manjugarkhedkar@gmail.com
साहित्य प्रकार: कथा/ नाटिका
कथेचे/नाटिकेचे नाव : अनोखी दिवाळी