च बाई चकलीचा

च बाई चकलीचा

शिक्षण विवेक    14-Nov-2023
Total Views |

 
च बाई चकलीचा

   घरात सर्वात पहिली बनणारी आणि शेवटी संपणारी ती म्हणजे मीच चकली. अगदी डायट करणारी लोकं पण एकवेळ पूर्ण फराळ बाजूला ठेवतील; पण मी त्यांच्या तोंडात पडल्याशिवाय दिवाळीची पहाटंच होत नाही. असो, माझे कौतुक करावे तितके कमीच. अगदी चिमुकल्यांच्या ताटापासून वृद्धांच्या वय झालेल्या दातांपर्यंत सगळ्यांत पहिली हजेरी माझीच असते; पण मुलांनो, खरं तर तुम्हाला माहीत आहे का ? माझ्या इतक्या खुसखुशीत व चवदार असणाऱ्या चवीचे कारण काय ते? नाही ना! चला तर मग, मी इतकी चविष्ट कशी काय बनते? याचे कारण आणि प्रक्रिया सांगते.

खूप सारे पदार्थ व आईचे प्रेम मिळूनच मी बनते. मी म्हणजे तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, पोहे, धने, लवंग, दालचिनी, जिरे, साबू या सर्वांना भाजून झालेल्या पिठाची. दिवाळी हा शब्द कानावर पडताच आई या सर्वांना एकत्र करते व भाजून त्यांची गिरणीतून एक चक्कर मारून आणते. मग आई तीळ, ओवा, मिरची पावडर, हळद, मीठ व चकलीचा मसाला हे सर्व एकत्र करून तेलाचा तडका देते. हळूहळू त्यामध्ये दळून आणलेले पीठ व थोडे पाणी एकत्र करून कणीक बनवायला घेते. आई म्हणते चकलीचं कणिक ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असावं. कणिक कसं अगदी दोन वर्षाच्या मुलाने कणकेच्या गोळ्यात हात ठेवतात पाच बोटे उठली पाहिजेत असं असावं. इथेपर्यंत तर सर्व आई स्वतः करते; पण आता मात्र बनवलेल्या कणकेच्या चकल्या पाडायला आईला चिनू आणि मिनूची गरज नेहमीच लागते. मग पाळी- पाळीने पाच चकल्या चिनू पाडतो आणि पाच चकल्या मिनू पाडते आणि एकीकडे आई मला मोठ्या कढईत तळायला घेते. इथे मात्र मी माझ्या मनाप्रमाणे तेलात पोहते; पण आईने जर हट्ट केला आणि मला तेलातून लवकर बाहेर काढली, तर मी कच्ची राहते. जर आईचे लक्ष नसेल, तर मग मी रुसून काळी पडते. म्हणून मी मला तेलातून कधी बाहेर काढायचे, हे माझ्या रंगावरून सांगते. ना जास्त गडद ना जास्त फिकट असा मध्यम रंग आला की, आई मला बाहेर घेते.

मग च पासून सुरू झालेली बाराखडी चकली या शब्दावर येऊन थांबते. आईच्या सांगण्यावरून चिनू आणि मिनूने पाच चकल्या देवासमोर आणि दोन-दोन आपल्या खिशात टाकून पळाले. दिवाळीच्या आधी आणि दिवाळीच्या नंतरही फराळाच्या ताटात शेवटी राहते ती म्हणजे मीच चकली; पण असो, तुम्ही त्याचं वाईट मानून घेऊ नका. कारण, माझ्या सोबत नेहमी असतो तो म्हणजे एक चहा. मी नेहेमी लोकांच्या तोंडून ऐकले आहे, दोन घोट चहा आणि एक चकली म्हणजे दिवस कसा मावळतीला आल्यासारखा वाटतो!

गिरीश चिवटे