नदीकाठी वसलेलं माझं गाव

नदीकाठी वसलेलं माझं गाव

शिक्षण विवेक    02-Dec-2023
Total Views |

नदीकाठी वसलेलं माझं गाव
नदी म्हटलं की, आठवते ते गांव आणि नदीकाठचे हिरवेगार शेत. माझं गाव म्हणजे मलकापूर, तसं छोटसचं गाव पण दोन सुंदर नद्यांमध्ये वसलेलं हे मंगलपुर म्हणजेच आजचे मलकापुर, तालुका शाहुवाडी आणि जिल्हा कोल्हापुर-पंचगंगेचा सहवासच जणू.
माझं गाव हे ‘शाळी’ आणि ‘कडवी’ या दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं छोटसंच पण ऐतिहासिक दृष्टया गाजलेलं. कोल्हापुर आणि रत्नागिरी या दोन जिल्हयांच्या मध्ये असलेले हे मंगलपुर म्हणजेच आजचे मलकापुर पावनखिंडीच्या इतिहासात नावाजलेला हा भागच जुने राजवाडे, जुनी भव्य मंदीरे, १०० वर्षापुर्वीची जुनी घरे, जुन्या विहीरी, नदीवरील पुल, आजुबाजुला असलेले उंच डोंगर या अशा थाटात वसलेलं माझ गांव आजही जुन्या रूढी, परंपरा चालवत आणि नव्या संकल्पनांना दुजोरा देत शिवरायांच्या काळापासुन आपली वेगळीच ओळख देत सुधारू लागले आहे.
गावातील प्रत्येकजण या दोन नद्यांशी जोडला गेलेला आहे. पावसाळ्यात या दोन्ही नद्यांना भरपूर मोठा पूर येतो त्यावेळी या नद्या रौद्र रूप धारण करून आपलेच अस्तित्व महत्वाचे आहे हे जाणवून देतात. गावकरी मात्र दर वर्षी न डगमगता आपली काळजी घेतात. यातून आपले संरक्षण म्हणून नदीकाठी घरे असणारे लोक त्यानिमीत्ताने का होईना पक्षांप्रमाणे चार महीने आपले स्थलांतर करतात. परंतू ही नदी आपलीच माता आहे हे लक्षात घेऊन सर्वजण त्यावेळी सुध्दा नदीला कितपत पाणी आले आहे अथवा किती ओसरले आहे हे पाहण्यासाठी आवर्जून जातात. हीच खरी खासीयत आहे या गावकर्‍यांची. पुर ओसरल्यावर गावकरी आपल्याच गावांतील केरकचरा नदीत अडकला आहे की काय हे पाहतात आणि एकजुटीने स्वच्छही करतात.
गणेश उत्सवात या नदीमुळेच गावाला जणु शोभाच येते. गौरी आवाहन म्हणजे या नद्यांवरचा एक मोठा सोहळाच असतो. तसेच गणेश विर्सजनाच्या निमीत्ताने हे गांवकरी एकत्र येवुन भेटतात ते या नदी किनारीच. बाप्पाचे विर्सजन करून परतताना या नदीतील ५ खडे गोळा करणे, नदीला वंदन करून श्रीगणरायाला निरोप देणे हे या गांवकर्‍यांचे दर वर्षी ठरलेलेच. यावेळी नदीच्या आकर्षणाने लहान - थोर सर्व मंडळी या नदीत अनवाणीच खेळुन आपले मन तृप्त करून परततात. या गांवात गणेशोत्सवाप्रमाणेच मरीमाई देवीची यात्रा भरते ती देखील नदीकाठी असणार्‍या मरीमाईच्या मंदीरातच. या दोन्ही नद्यांच्या अलीकडे - पलीकडे असलेले सर्व गांवकरी अशा कार्यक्रमांना आवर्जून येतात.
‘सरिता करीते का कधी खंत!
‘सरिता करीते का कधी खंत’
या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला ही माझीच नदी आहे असे वाटते. या नद्यांमध्ये गावकरी आंघोळीस, कपडे धुण्यास, गुरे धुण्यास, गाडया धुण्यास या आणि अशा अनेक कारणांनी दररोज एकत्र भेटतात. गांवची सकाळ संध्याकाळ जणु या नदीमुळेच होत असते. खरच माझा गांव आणि या गांवच्या नद्या यांचा मला खुप अभिमान आहे, म्हणुनच मला मलकापूर विषयी अभिमानाने म्हणावे वाटते,
"गावांत नदी, नदीत पाणी,
पाण्यात वेली, वेलीची गाणी,
गाण्याच्या चालीत, गोड-गोड वाणी
वाणी तशी रहाणी, रहाणार्‍याला पाणी देते कोण?
देते कोण? हीच आमच्या गांवची नदी”
खरंच असं हे नदीकाठी वसलेलं माझं गांव मलकापूर अखंड पूर आलेला असल्यासारखेच माणसांनी गजबजून गेलेले असते.
- स्वाती फडणीस, पालक,
डी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे