कागद

कागद

शिक्षण विवेक    04-Dec-2023
Total Views |

कागद
 
कागद किती सरळ शब्द आहे ना!
कागदाचा उपयोग आपण जसा करू त्यावरुन त्याचे मूल्य ठरत असते. जेव्हा आपण कागद फाडून कचराकुडींत टाकतो, तेव्हा त्याचे स्वरूप कचऱ्याचे होते, पण जर आपण त्याला महत्वाच्या कागदपत्राचे, जमिनीची कागदपत्र अगदी जपून नीटनेटके, फाईलीत ठेवतो, पाहा ना कागदाची किंमत त्यावर काय लिहीले आहे यावरुन ठरते.
प्रत्येकालाच आपल्या दैनंदिन कागदाचे महत्व असते .काहीजण पुस्तकप्रेमी असतात त्यांना पुस्तकांमध्ये रमायला आवडत व ते पुस्तकांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतात. कारण ते कागदाचे महत्व जाणून असतात .ते पुस्तकाचे एकही पान फाटू देत नाहीत . पूर्वी जेव्हा लोक आपल्या माणसांपासून, नातेवाईकांपासून दूर राहायचे तेव्हा त्यांच्यात माहीतीची देवाण-घेवाण पत्राद्वारे व्हायची . कधी सुखद बातम्या तर कधी दु:खद घटना आपल्या माणसांना कागदच सांगत असे. मग त्या कागदाशी मानसांचे भावनिक नाते तयार व्हायचे, काहीजणं तर आपल्याला माणसांचे पत्र आले, म्हणून तो कागद खूप जपायचे. नात्यामधील विशेषत: वडील, मुलगा, आई, भावंडं, नातेवाईक यांच्या रोजच्या जिवनातील घडामोडी, सुखद घटना यांच्यामधील दुवा म्हणजे हा कागद असायचा.
सैनिकांना व त्यांच्या घरच्यांना दिलासा देण्याचे काम कागदच करतो. सीमेवरील सैनिक देशाचे रक्षण करत असतात, त्यांच्या घरातील व्यक्तींची विचारपूस पत्रांद्वारेच होत आली आहे. तेव्हाही हा कागद अगदी मनाला आनंद देतो, त्यावर असलेले मजकुर कधी हसायला लावतो तर कधी रडवतो. यावरुन एक गोष्ट आठवली सुप्रसिध्द लेखिका अरुणा ढेरे यांचा एक लेख आहे, त्यात त्यांनी अशाच एका पोस्टमनची व म्हातारीची गोष्ट सांगितली आहे त्यात अंध म्हातारी एकटीच राहत असते व पोस्टमनला ती तिच्या मुलाचे पत्र वाचायला सांगते, पण खरंतर तो कागद कोराच असतो पण पोस्टमन तिच्या आनंदासाठी खोटी खुशाली कोऱ्या कागदावरून सांगतो व त्याच आशेने म्हातारीही आनंदी जगते. तिच्या जिवनाला जगण्याची उम्मेद मिळते. हे सर्व कागदामुळेच शक्य होऊ शकते!
त्याचबरोबर सकाळच्या वेळी बऱ्याच जणांंना वर्तमानपत्र वाचण्याची सवय असते व तो असा कागद आहे ज्यात देशभराच्या नविन घडामोडी पोहोचवण्याचे काम करतो. त्याचे मूल्य काढताच येणार नाही. आम्ही विद्यार्थी ज्यावर परीक्षा देतो तोही कागदच असतो की! त्यावरुन आमचे मार्क्स व भविष्य ठरते. काही जण पास होऊन त्यांचा कागद (गुणपत्रक ) भरगच्च होत असतो व काहींचा कागद (कोराच) राहतो, म्हणजे कमी गुण येतात. पाहीलत ना, एक कागद काय काय करतो ते. अश्या अनेक भुमिका कागद साकारत असतो.
 
- शांभवी कुलकर्णी
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव.