कागदाची गोष्ट

कागदाची गोष्ट

शिक्षण विवेक    05-Dec-2023
Total Views |

कागदाची गोष्ट
आजकाल प्रत्येक घरात आपल्याला बबड्या पाहायला मिळतो. एकुलताएक असल्याने त्याला प्रत्येक गोष्ट हातात मिळते. असाच हा बबड्या अतिशय लाडका आणि खोडकर होता. त्याला चार दिवसाला एक वही लागत असे. त्याचे आई-बाबा त्याला वही आणून देत असत. त्यांना वाटे आपल्या बबड्या खूपच अभ्यास करत आहे, कारण त्याची वही, त्याचा अभ्यास पाहण्यासाठी त्यांना वेळच मिळत नसे. एक दिवस बाईंनी निबंध लिहिण्यास सांगितला, म्हणून बबड्या खोलीत निबंध लिहीत होता. एक शब्द लिहिला की, पान फाडत असे. कागदाच्या गोळ्यांनी त्याची खोली भरली होती. शेवटी थकून तो झोपी गेला.
हळूच एक कागदाचा गोळा बोलायला लागला. त्याने त्याला हाक मारली,‘बबड्याऽऽ एऽ बबड्याऽ’ त्याला जाग आली. सगळे कागदाचे गोळे वाईट नजरेने पाहत होते. त्यातील एक जण म्हणाला, ‘कागद हा किती महत्त्वाचा आहे, तुला माहित आहे का? अरे! अति प्राचीन काळात आम्ही नव्हतो तेव्हा खडकावर, भिंतीवर, झाडांवर, पानांवर, झाडांच्या सालीवर, खोदकाम करून लेखन वाचनाचे हौस पुरवीत होते. १७९८ ला कागद तयार करण्याचे यंत्र फ्रान्समध्ये तयार करण्यात आले. कागद तयार करण्यासाठी गवत, चिंध्या, जुने कपडे याचा वापर केला जात असे. त्यानंतर इंग्लंडमध्ये कागद तयार करण्याचा कारखाना काढण्यात आला. त्या ठिकाणी मोठमोठ्या यंत्राचा वापर करून आमचे अस्तित्व निर्माण झाले.’
‘माणसांच्या दैनंदिन जीवनात कागद खूप महत्त्वाचा आहे. पुस्तक छापण्यासाठी, वही, वेष्टन, तक्ते, नकाशे, छायाचित्र, पोस्टाचे तिकीट, नोटा, विविध कागदी वस्तू, वर्तमानपत्रे, दिनदर्शिका अशा विविध गोष्टींसाठी उपयोग होतो आणि सध्या तर प्लॅस्टिकऐवजी कागदाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसत आहे. आज सगळीकडे आमचे महत्त्व वाढले आहे आणि तू मात्र आम्हांला फाडून त्याचा गोळा करून टाकत आहेस. आम्हांला त्याचा खूप त्रास होत आहे रे. आमच्यापासून तू होडी, ससा, गुलाब, पिशवी, फोटो फ्रेम, विविध फुले तयार कर आणि आमची शोभा वाढव.’
बबड्याला हे ऐकून वाईट वाटले आणि अचानक त्याला जाग आली. त्यांनी आपल्या खोलीतल्या कागदाचे गोळे व्यवस्थित ठेवले. इथून पुढे कागदाला त्रास द्यायचा नाही अन् वहीची पानं फाडायची नाहीत. उलट त्या कागदापासून आपण सुंदर शोभेच्या वस्तू तयार करायच्या. कागद आपल्यासाठी वरदान असला तरी त्याचा उपयोग काटकसरीने केला पाहिजे असे बबड्याने ठरवले.
 
- रोहिणी चौधरी, सहशिक्षिका,
नू.म.वि. मराठी शाळा, सोलापूर