कर्मघाट

कर्मघाट

शिक्षण विवेक    09-Dec-2023
Total Views |

कर्मघाट
संत गाडगे बाबांच्या
असे मस्तकी गाडगे
डेबुजी या बालकाने
दिले स्वच्छतेचे धडे!
विदर्भात कोते गावी
जन्मा आली ही विभूती.
हाती खराटा घेऊन
स्वच्छ केली रे विकृती!
वसा लोकजागृतीचा
केला समाज साक्षर
श्रमदान करूनीया
केला ज्ञानाचा जागर!
झाडूनीया माणसाला
स्वच्छ केले अंतर्मन.
धर्मशाळा गावोगावी
दिले तन, मन, धन!
देहश्रम पराकाष्ठा
समतेची दिली जोड
संत अभंगाने केली
बोली माणसाची गोड!
धर्म, वर्ण, नाही भेद
सदा साधला संवाद
घरी दारी, मनोमनी
गोपालाचा केला नाद!
स्वतः कष्ट करूनीया
सोपी केली पायवाट
संत गाडगे बाबांचा
अलौकिक कर्मघाट!
असे संतबाबा जनी
मन ठेवती निर्मळ
त्यांच्या आठवात आहे
प्रबोधन परीमल!
- सुजित कदम, पालक,
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे