आजी-आजोबाचं हृदयस्पर्शी नातं

शिक्षण विवेक    10-Apr-2023
Total Views |

आजी-आजोबाचं हृदयस्पर्शी नातं
माणसाचं जीवन कुटुंबव्यवस्थेवर आधारित आहे. त्या कुटुंबव्यवस्थेत नाती महत्त्वाची आहेत. कुटुंबात अनेक नाती असतात. आई-बाबांचं नातं, बहीण-भावाचं, बहिणी-बहिणीचं, भावा-भावाचं नातं, आत्या, मामा, काका, मावशीचं नातं, मैत्रीचं नातं.... या सर्व नात्यांशी असलेलं नातं महत्त्वाचं आहे. अशाच महत्त्वाच्या नात्यांपैकी एक अत्यंत महत्वाचं नातं म्हणजे आजी-आजोबांचं नातं!
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीची परंपराच होती. प्रचलित होती. आज विभक्त कुटुंबपद्धतीचा बोलबाला दिसतो. विभक्त कुटुंबपद्धतीची अनेक कारणेही आहेत. तो जेवढा चिंतन, अभ्यास, संशोधनाचा विषय आहे. तेवढाच तो चिंता व गांभीर्याचा विषय आहे. आजच्या घडीला विचार करायला गेलो, तर पूर्वीच्या संयुक्त कुटुंब पद्धतीचे फायदेच आपल्याला जास्त दिसून येतील. याचा अर्थ आज संयुक्त कुटुंबपद्धती नाही, असा घेऊ नये. लेखाच्या सुरुवातीलाच संयुक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण कमी असल्याचे मी नमूद केले आहे. अशा या कुटुंबव्यवस्थेत अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात, ते म्हणजे आजी-आजोबा. आजी-आजोबा कुटुंबव्यवस्थेचे आधारस्तंभ असतात. कुटुंबावर संस्कार करणारे. कुटुंबातील त्यांच्या मुलांना, नातवंडांना दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे असतात. आई-बाबांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, तेवढीच महत्त्वाची भूमिका आजी-आजोबांचीही असते, हे विसरून चालणार नाही. कारण तेही आपल्या आई-वडिलांचे आई बाबाच असतात. आजी-आजोबांचं घरावर सतत लक्ष असतं. घरातील लहान मुलांवर त्यांचे संस्कार होत असतात. विशेषतः नातवंडांवर. आजी-आजोबा नातवंडासोबत खेळतात. कुटुंबातील मुलांसाठी, नातवंडांसाठी सुख-दुःखात धावतात, धडपडतात. एवढंच नव्हे, तर त्यांच्या सुखाचा त्याग करून आपल्या सुखासाठी ते जगतात. आपलं निरागसपण ते जपतात. आपले हट्ट पूर्ण करतात. आजी-आजोबा त्यांच्या प्रेमळ स्वभावाने नातवंडांची मने जिंकून घेतात. आपल्या नातवंडासोबत त्यांच्यासारखे लहान होऊन खेळतात, बागडतात. नातवंडांच्या बालमनाशी एकरूप होतात. त्यांचे रुसवे-फुगवे लाड पुरवतात. त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांच्यात ज्ञानाची लालसा निर्माण करतात. त्यांना अभ्यासात मदत करतात. शाळा, शिक्षक, अभ्यास, सत्य, परिश्रमाचे महत्त्व सांगतात. गोष्टी सांगून आपल्या नातवंडामध्ये जीवनाची सकारात्मक आस्था, विश्वास वाढवतात. नातवंडांमध्ये चैतन्य निर्माण करतात. आजी-आजोबा आपल्या नातवंडांना प्रेरणादायी बोधकथा सांगतात. एक प्रकारे या बोधकथेच्या माध्यमातून, मार्गदर्शनातून, प्रत्यक्ष वर्तनातून जुन्या पिढीचा समृद्ध वारसाच नातवंडाकडे सोपवीत असतात. त्यामुळेच आजी-आजोबा संयुक्त कुटुंबाचा आधार, दीपस्तंभ आहेत. आजी-आजोबा कुटुंब व्यवस्थेतील संस्कारांचं व्यासपीठ आहे. हा वारसा आपण विसरून चालणार नाही. आज आजी-आजोबांची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. अन्यथा आपल्याला खरं प्रेम, आपुलकी, विश्वासातील नात्याचा आधार मिळणार नाही. कारण आजी-आजोबांचं नातं प्रेमळ, हृदयस्पर्शी आहे.
- राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे, सहशिक्षक,
डी.ई.एस. सेकंडरी शाळा, पुणे