मी चिऊताई बोलतेय..

शिक्षण विवेक    12-Apr-2023
Total Views |

मी चिऊताई बोलतेय.. 

चिव.. चिव.. चिव.. चिव.. अरे ओळखलं का मला? मी चिऊताई बोलतेय.. हो, सांगावं लागत आहे मला कारण, मी आता जास्त दिसत नाही तुम्हाला. आमची संख्या कमी होऊ लागली आहे आता.

जहाँ डाल डाल पर सोनेकी चिड़ियां करती है बसेरा, वो भारत देश है मेरा!’ एकेकाळी भारतात खूप समृद्धता आणि आनंद होता हे दर्शवणार्या या गाण्याच्या ओळी माझं भारतातील अस्तित्वही अधोरेखित करतात. पक्षीवर्गाच्या पेसरिफॉर्मीस गणातील आणि पेसरिटी कुलातील पॅसर प्रजातीच्या पंचवीस जातींपैकी मी एक पक्षी आहे. माझे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिक्स् आहे. माझी लांबी साधारण 16सेमी असून वजन 13ते 39 ग्रॅम आहे. मी एका वेळेला 3 ते 5 अंडी देते. माझ्या अंडी उबवणीचा काळ 14 त े17 दिवसांचा आहे. वाळलेले गवत, पिसे, कापूस यांपासून आम्ही आमचे लहानसे घरटे झुंबरे, वापरण्यात नसलेले कोनाडे, वळचणीची जागा इ. ठिकाणी नर-मादी असे दोघे मिळून तयार करतो. मूळची युरोप, भूमध्य प्रदेश आणि आशियामध्ये असणारी मी आता जगभर पसरले आहे. भारतात काही ठिकाणी मलातपकीरअसेही म्हणतात. मी दिल्ली व बिहार या राज्यांचा राज्यपक्षी आहे.

चिऊताई ..चिऊताई.. दार उघडहे बडबडगीत म्हणत तुमचे आई-बाबा लहानाचे मोठे झाले. ’थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे..’ यातून माझी पिलांप्रतीची काळजी, माझी कर्तव्यनिष्ठा दिसते.. माझं घर मेणाचं होतं यातून माझी दूरदृष्टी दिसते.. पण दिसणार्यालाच बर का !!

एक घास चिऊचा.. एक घास काऊचा ..आता कोणच म्हणत नाही.. सर्वत्र आलाय कबुतरांचाच (पारव्यांचाच) महापूर.. ऐकू येत आहेत का माझ चिव चिव असे सूर? चिमण्या कवितांमध्ये, धड्यांमध्ये, गाण्यांत आहेत परंतु पाहण्यात नाहीत !

सगळ्या प्रकारची धान्ये, किडे, सुरवंटे, नाकतोडे, कोळी, फळे, कोवळ्या रोपांचे शेंडे वगैरे माझे खाद्य आहेत. मुलांनो तुम्ही च्युईंगम खाऊन कुठेही फेकता आणि अन्न म्हणून आम्ही पक्षी ते खायला जातो, तर आमची चोच चिकटते, आमचे पाय चिकटतात.. आम्हाला काहीच करता येत नाही. मुख्यत्वे मकरसंक्रांती व इतर दिवशीही आपण आनंदाने पतंग उडवता ,पतंगाच्या मांजामध्ये आमचे पंख अडकून आमची अवस्था काटलेल्या पतंगासारखी निष्प्रभ अशी होते.. आम्हाला नीट उडताही येत नाही. बुद्धीजीवी आहात तुम्ही.. सर्व सजीवांचा जीव जाणा.. एवढेच सांगावेसे वाटते..

मनुष्य आणि पर्यावरणीय घटक यांच्यामधील ऋणानुबंधाची वीण घट्ट असेल तर पर्यावरण क्षीण होणार नाही. मला शेतकर्यांचा मित्रही म्हणतात. परंतु आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतींमुळे, घरट्यांसाठीच्या जागांची आणि अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा शेतातील वाढता वापर, नागरिकांमध्ये पक्षांबाबत असलेले अज्ञान इ. कारणांमुळे आमची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मोबाईल टॉवर्समधून होणार्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनामुळेही आमची संख्या घटत आहे.

आम्हाला मातीची आंघोळ लागते; परंतु पायाला धूळ न लागू देणार्या माणसांमुळे शहरांमध्ये तर सर्वत्र सिमेंट काँक्रिटचे रस्ते व त्याच्या शेजारी सिमेंटचेच ब्लॉक. जरासुद्धा धूळपायाला लागणार नाही याची माणसांनी पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे. पण आमचे काय? आमचा कोण विचार करतो!! पावसाच्या पाण्याचे लोटच्या लोट नदीला जाऊन मिळतात.. जरासुद्धा पाणी मुरायला संधी नाही. पाहवतच नाही आम्हाला ते.

आमचे पर्यावरणीय महत्त्व किती आहे आणि आमची संख्या कमी होऊ लागली आहे हे माणसाला जाणवू लागले आहे. मुलं जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देऊन नव्हे, तर प्रत्यक्षामध्ये आम्हाला दाखवत चिऊ-काऊचा घास भरवायचा आहे.. असे वाटू लागले आहे. माणसाला असे वाटत आहे, म्हणूनच की काय आमच्या संवर्धनासाठीदरवर्षी दि.20मार्च हा दिवस सन2010 पासूनजागतिक चिमणी दिवसम्हणून साजरा करण्यात येऊ लागला आहे.

चला आता येते मी.. पंखात बळ आणून अन्नपाणी शोधलं पाहिजे. फार लांबचा पल्ला गाठायचा आहे ना!! माझ्या पिलांसाठी मी हे करणारच ! तुम्हीही तुमच्या पिलांसाठी मला म्हणजेच चिऊला घास ठेवालच आणि जोडीला पाणीही!!

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्याया स्वर्गीय लता दिदींनी गायलेल्या भावपूर्ण गाण्यामध्ये आम्हालाही आमचे चिवचिव असे सूर एकरूप करावेसे वाटत आहेत; परंतु हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे!

स्वाध्याय:- शेतकर्याचे मनोगत, सैनिकाचे मनोगत, कोरोनायोध्याचे मनोगत, झाडाचे मनोगत, सूर्याचे मनोगत, किल्ल्याचे मनोगत, नदीचे मनोगत, सह्याद्रीचे आत्मवृत्त, ढगाची कैफियत इ. विद्यार्थ्यांनो यापैकी कुठल्याही घटकाचे आत्मवृत्त लिहा..

संदर्भ-चिमणीच्या मनोगतातील शास्त्रीय संदर्भ विश्वकोश, आंतरजाल

मनोगतलेखन-सुगम मराठी व्याकरण व लेखन- मो. रा. वाळंबे,.9वी,.10वीपाठ्यपुस्तक

लेखन- प्रेमलाअरुण बराटे

शिक्षिका- महिलाश्रमहायस्कूल, कर्वेनगर,पुणे-52

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था