आम्ही दोघी जुळ्या बहिणी

शिक्षण विवेक    12-Apr-2023
Total Views |


आम्ही दोघी जुळ्या बहिणी

पाचच मिनिटांचा काय तो फरक आमच्यात..

त्यामुळे ती मोठी आणि मी शेंडेफळ (सध्यातरी)...

ती इना, मी मीना...

इना माझी ताई... स्वभावाने एकदम गंभीर, मोजून मापून खेळणारी, स्वतःला खूप सांभाळणारी आणि मी एकदम टगी, मनात आलं की करून टाकणारी, मला कुठलीच गोष्ट अवघड नाही वाटायची, खूप दंगा-मस्ती करणारी... भरपूर म्याव म्यावचा हौदोस करून घरातल्यांना त्रास देणारी...

परवा तर समोरच्या कुत्र्याशीच गप्पा मारत बसले... त्याला मी दिसतच नव्हते, त्याला कळेच ना हे कोण बोलतंय गोड म्याव आवाजात आपल्याशी...

अजून एक किस्सा सांगू का? म्हणजे सांगतेच...एक दिवस एक खारुताई आली गच्चीवर. आम्ही खूप गप्पा मारल्या, ती म्हणाली, ‘चल येते का समोरच्या उंबराच्या झाडावर...’ मी विचार केल्यासारखं केलं आणि म्हंटलचल’ (म्हणजे मला जायचय होतं पण इना म्हणते कृती करायच्या आधी विचार करावा) मी केला आणि गेले खारुताईच्या मागे.. गच्चीतूनच डायरेक्ट उडी मारून झाडाच्या फांदीवर... बापरे काय भारी वाटत होतं, थ्रिलिंग का काय म्हणतात ना तसं..

ते झाड किती खरखरीत होतं, जरा सरळ चाललं की त्याला फांदी फुटलेली आणि खूप पानं, मधेच लाल लाल छोटी छोटी फळं.

खारुताई फारच भन्नाट होती, पटापट तिच्या चार पायांवर तुरुतुरू चालत होती न पडता आणि मी तिच्या मागे घाबरत घाबरत...

तिने कितीच्या किती फळं खाल्ली, मला पण दिली पण मला खाताच नाही आली झाडाच्या फांदीवर दोन पायांवर बसून समोरच्या दोन पायांनी फळ खायचं?? बापरे किती ते अवघड...

संध्याकाळ होतं आली होती, तेवढ्यात मी ज्या फांदीवर बसले होते ना त्या तिथेच एका पक्ष्यासारखा दिसणार्या कोणाला येऊन लटकायचं होतं, वेडा कुठचा, तो आला आणि पाय फांदीवर लटकावून एकदम उलटाच झाला, त्याला बघता बघता मी मात्र धुपकन खाली पडले..

शूऽऽऽऽऽऽ कोणी सांगू नका हां... इनाला...

घरी जाऊन इनाच्या कुशीत झोपून जाते.. हळूच ..

- प्रीता नागनाथ