वाडा

शिक्षण विवेक    12-Apr-2023
Total Views |


वाडा

समाज हा परिवर्तनशील असतो. त्यात सतत बदल घडतच राहतात, पण हा बदल हळूहळू झाला तर सर्वांच्या पचनी पडतो. पुण्यातल्या पेठांपेठातून हळूहळू उतरणारा दिवस, दारात रांगोळीचे सडे, घराघरातून येणारे रेडिओ-टी.व्ही.चे आवाज, नळांवरील भांड्यांचे आवाज आज हे चित्र तुम्हा सर्वांना पाहायला मिळत नाही. पण एकेकाळी हे सगळं प्रत्यक्ष घडत होतं. या गोष्टीला फार काही वर्षे उलटली नाहीत. पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत या गोष्टी सगळीकडे दिसत होत्या,किंबहुना आजही पुण्यातल्या काही पेठांमध्ये हे चित्र बघायला मिळते.

कसबा पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ आजही काही वाडे आपल्या वैभवाची साक्ष देत अनंत संकटांचा सामना करत, नवीन पिढीला जुन्याचं मोल सांगण्यासाठी निधड्या छातीने, आधुनिकतेचा परिवार सांभाळत, तुम्हां बालगोपालांना संस्कृतीचे धडे द्यायला दिमाखात उभे आहेत. वाड्यांमध्ये अनेक कुटुंबे एकत्रित नांदायची, प्रत्येकाचे स्वतंत्र कुटूंब असूनही त्यात खेळीमेळीचे वातावरण असायचे. प्रत्येक घरात ज्येष्ठ नागरिक असायचे. वाड्यातल्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. घरात बंब, घंगाळी, तांब्या-पितळ्याची मोठी भांडी आढळायची. सणावाराला सर्व गृहिणींची जणू स्वच्छता स्पर्धा असायची. खाण्यापिण्याची चंगळ व्हायची ती लहान मुलांची. कारण केलेला पदार्थ प्रत्येक घरात दिला जायचा. गणेशोत्सव, दहीकाला, दिवाळी सर्व सण एकत्रित साजरे केले जायचे.

उन्हाळी सुट्टीत तर आईसक्रिम पॉट आणून तयारी केली जायची. उन्हाळ्यातील वाळवणं करणे आम्हां बालचमूंना मोठी पर्वणीच असायची. टी.व्ही. सर्वांकडे नसल्याने छोट्या खोलीतच थिएटरचा आनंद घेतला जायचा. खेळायला मित्र-मैत्रिणींचा वाड्यागणिक वेगवेगळा ताफा असायचा. पकडापकडी, लंगडी, आंधळी कोशिंबीर, फुगड्या, शिरापुरी किती नावे सांगू? सवंगडी आणि खेळ कधीच कमी पडले नाहीत.

वाड्यातील ही मजा तुमच्या आई-बाबांनी, काका-काकूंनी ही अनुभवली असेलच. त्यांना नक्की विचारा, त्यांना त्यांच्या जुन्या आठवणीत नेण्यासाठी, ही वाड्यातील गंमत तुम्हांला सांगितली आहे. त्यांच्याशी गप्पा मारून अजून गमतीजमती जाणून घ्या.

त्याचप्रमाणे वाड्यावर आधारित कविता शोधा आणि पुण्यातील ऐतिहासिक वाडे नक्की बघा.

- पल्लवी समेळ, शिक्षिका,

शिशुविहार प्राथमिक शाळा, कर्वेनगर