माझे अंगण आनंदाची आठवण

शिक्षण विवेक    13-Apr-2023
Total Views |


माझे अंगण आनंदाची आठवण

कुहू-कुहू कोकीळेचा स्वर कानी आला आणि मला चाळीतल्या अंगणातील चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला.

आमच्या चाळीत सलग 14 खोल्या म्हणजे एक पुढची एक मागची स्वयंपाक खोली, मागे अंगण आणि पुढे ओटा. तोही 14 खोल्यांचा सलग आणि त्याच्या पुढे मोठे अंगण. त्या अंगणात धावपळ करून खेळायला खूपच मज्जा येते. हल्लीच्या मुलांचं ते अंगण कुठं बरं हरवलंय! इथे तर प्रत्येकाचं आपलं अंगण. त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्यांची फळे यांची खूपच मजा होती.

अंगणाची देखभाल मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण करीत. पावसाळ्याचे चार महिने संपले की, प्रथम खणून मातीसारखी केली जाते. नंतर अंगणाच्या कडेला तिरप्या विटा लावल्या जात. मग पाणी शिंपडून लाकडाने चोपून सारखे करून घेतले. नंतर आम्ही मुले आठवडी बेलबाजारातून शेण गोळा करून आणायचो. हल्लीची मुले त्या शेणाला हातही लावणार नाहीत. मग आजी किंवा आई बाटलीत शेण पातळ करून शिंपून घेत. ते वाळले की त्यावर लाल मातीने सारवण करीत आणि मग सुरेखशी अंगणभर रांगोळी काढली जात असे.

उन्हाळ्यात अंगणात खाटेवर पापड, कुरडया, चिंच, लाल माती लावलेले वाल अशी वर्षांची बेगमी वाळवून ठेवत. त्यातली चिंच मात्र बरेच वेळा आम्ही मुले पळवत असू. त्या वाळवणाची राखण करायची ती मुलांनी. चाळीत गुजराती बिर्हाडे होती. त्यांनी बरणीत भरून ठेवलेला मोरावळा, लोणचे, मुरांबा उन्हात ठेवलेला असे. हल्ली तर या वस्तू हॉलमध्ये व बाजारात रेडिमेड मिळतात. पण तेव्हाची मजा आज नाही.

हेच अंगण उन्हाळ्यात खाटेवर अंथरून टाकून आभाळीच्या चांदण्या मोजत व आजीची गोष्ट ऐकत झोपी जात असे. चाळीच्या फाटकाजवळ रातराणीची वेल होती. त्याचा सुगंध रात्री दरवळत असे आणि सारा आसमंत सुगंधाने भरून राहत असे.

चाळीत कुणाकडे लग्नकार्य असेल की त्याची जेवणाची पंगत ओट्यावर बसे आणि मांडव अंगणात असे. त्याचे लग्नाचे पाहुणे ते सर्वांचे पाहुणे असत. मग मात्र एकमेकांशी असलेले भांडण व अबोला त्या लग्नकार्यात विरघळला जाई. चाळीत तुझे-माझे काहीच नव्हते. दुपारी मोठ्यांची नीजानीज झाल्यावर मुलांचे लपंडाव, सागरगोटे, काचापाणी आणि अंगणात टिकर्या, विटी-दांडू, गोट्या असे खेळ खेळत. खेळताना मुलांची आपापसात भांडणं होत. मग रडारड, मोठ्यांचा ओरड आणि नंतर खेळ बंद!

पुढच्या अंगणात बागडल्यावर मागचे अंगण आहेच. या अंगणात तुळशी वृंदावनपासून अनेक प्रकारच्या लहान-मोठ्या झाडांनी बहरलेली बाग. मागच्या बाजूला मोठ्या जागेत बकर्यांचा आठवडी बाजार असे. चाळीची आणि बाजाराची हद्द यात एक भिंत होती. प्रत्येकाच्या दारापुढे एक त्रिकोनी कोनाडा होता. तिथे रोज संध्याकाळी आई सांज दिवा लावत असे. विहिरीजवळ तिच्याजवळ वड-पिंपळ होता. छोटी-छोटी रंगीबेरंगी फुले असलेली रानटी झाडे होती. मोठे उंबराचे झाड होते, त्याची कच्ची पक्की लालसर फळे खाली पडत. एक पेरूचे झाडं होते. त्याबरोबर कर्दळी, पांढरा, चाफा, तगर, अबोली, गुलछडी होती. आम्ही त्यांचे गजरे करीत असू किंवा देवांना हार केले जात. यात हजारी मोगरा, कांचन वृक्ष, मधु-मालतीचा वेल आणि त्याला येणारी भरघोस फुले. आमच्या शेजारी प्राजक्त होता. सकाळी उठल्यावर त्या फुलांचा सडा पाहून मन फुलून यायचे. आणि या झाडांवरील घरट्यात असणार्या पक्षांच्या किलबिलाटाने मन प्रसन्न व्हायचे.

आमच्या दारात राजेळी केळीचे झाड होते. शेजारी सीताफळाचे झाड होते. प्रत्येक बिर्हाड करू संध्याकाळी झाडांना पाणी घाले व पुढे अंगणात सडा घातला जाई. येणार्या मृग्दंधाने छान वाटे. आजही पहिला पाऊस पडल्यावर येणारा मृग्दंध मला मोहवून जातो आणि हो, मागच्या दारी कृष्ण-कमळ, गोकर्णीचे वेल भिंतीवर चढवलेले होते. आई किंवा आजीबरोबर आम्ही मुलेही झाडांना पाणी घालणे, त्यांची काळजी घेणे हे आपोआप शिकलो. माझे अंगण आणि झाडांविषयी आले की, चाळीत अशी कितीतरी झाडे होती.

माझे अंगण

सुरेख आठवण

- अंतरा सावंत, 7 वी,

सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे