जग विस्तारलं; मामाचं गाव मात्र हरवलं...!

शिक्षण विवेक    13-Apr-2023
Total Views |

जग विस्तारलं; मामाचं गाव मात्र हरवलं...!

 परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जाण्याचं एक वेगळंच आकर्षण पूर्वी बच्चेकंपनीला असायचं. पण आताच्या पिढीला मात्र हे अनुभवायला मिळत नाही. कारण तो हिरवा निसर्ग, आजीआजोबांची माया, मामीच्या हातचं सुग्रास जेवण अशा सुंदर आठवणी देणारं मामाचं गाव आजच्या बदलत्या युगात हरवत चाललंय.

परीक्षा संपली रे संपली की बच्चे कंपनी लगेच मामाच्या गावाला जात असे, मनसोक्त खेळणं, भातुकलीचा खेळ, कैर्या पाडून खाणं, दिवसभर उन्हात फिरत राहणं, वडाच्या पारंब्यांच्या झोपाळ्यावर झुलायचं, बैलगाडीत बसून फेरफटका मारणं, रात्री रात्री मामीच्या हातच्या जेवणावर ताव मारणं, दिवसभर खेळून दमल्यामुळे खूप भूक लागायची, तेव्हा जिभेचे चोचले नव्हते, पिझ्झा, बर्गर, मॅगी याच्याशिवाय जेवणार नाही असं नव्हतं.

ताटात वाढलेलं अन्न गोड लागायचं. अंगणात बसून आजीकडून गोष्ट ऐकणं, गार वार्यात चांदण्याकडे बघत छान झोप लागायची. गावात नवनवीन शब्द महित व्हायचे. सर्व मित्रमैत्रिणी जमायचे सापशिडी, पत्ते असे कितीतरी खेळ खेळले जात असत. दुपारी उन्हात खेळताना त्या आहे.

उन्हाची तीव्रता कधीच जाणवत नव्हती. त्या दिवसांची गोडी काही वेगळीच होती. हे सर्व दिवस आजच्या लहान मुलांच्या वाट्याला येत नाहीत. नोकरीसाठी लोक शहराकडे वळलेत, सिमेंटच्या जंगलात विसावले. त्यामुळे मुलं तरी कुठल्या गावाला जाणार? आजच्या मुलांचं ते निसर्गरम्य सुंदर जग मात्र हरवलंय, चार भिंतींमध्ये बंदिस्त झालंय.

लहानपणीच्या त्या खेळांची जागा, टी.व्ही, मोबाईल गेम ने घेतली आहे. मामा मामींकडे भाच्यांचे लाड पुरवायला वेळ नाही. आता संपर्क होतो पण तो फक्त फेसबुक आणि मोबाईलवर. या बदलत्या युगाने मुलांचा तो आनंदच हिरावून घेतला आहे. त्यांचं मामाचं गावच नाहिसं केलं.

- स्वप्निल नंदकुमार गोंजारी, शिक्षक,

कै. .भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती