आठवणीतलं बेळगांवचं घर

शिक्षण विवेक    14-Apr-2023
Total Views |

घर तेथे अंगण

घर नं 1250, बसवाण गल्ली, शहापूर, बेळगांव. असा माझ्या घराचा पत्ता. कर्नाटकात नंदीला बसवण्णा म्हणतात. आमच्या गल्लीच्या एका टोकाला एक नंदीचं देऊळ होतं, म्हणून गल्लीचं नाव बसवण्णा गल्ली.

तर या गल्लीत होतं आमचं पारंपरिक घर. घर कसलं, खरं तर वाडाच तो. गल्लीत सगळी लागून लागून घरं आणि अशा सगळ्या घरांची एक अखंड गल्ली. सगळ्यांच्या भिंती सामायिक.

आमचं घर काळ्या कौलांचं छत असलेलं होतं, त्या छतात धूळ-माती जमा होऊन त्यातूनच कधी रान उगवे, मग शाकारणी करावी लागे. शाकारणी करणं म्हणजे मोठं जोखमीचं आणि कौशल्याचं काम. ते काम करणारा विश्वासू कारागीर हेरून ठेवावा लागे. घराला लाकडाचे जाडजूड भक्कम दार. सुरुवातीला एक खोली, मग सोपा, मग माजघर, मग स्वयंपाक घर, मग मोरी (बाथरूम), आणि मग संडास, अशी व्यवस्था. या खोल्यांच्या छताची उंची अगदी कमी, म्हणजे 6 फूट उंचीच्या माणसाचा हात सहज छताला लागेल इतकी कमी उंची. प्रत्येक खोलीला जाडच्या जाड भिंती, त्याही मातीच्या. या भिंती इतक्या जाड की त्यातच कपाटं काढलेली होती, त्यामुळे स्वतंत्र कपाट आमच्या घरात नव्हतंच. कपडे टांगायला खुंट्या आणि छोट्या मोठ्या वस्तू ठेवायला कोनाडे अशी व्यवस्था या भिंतीतच होती. घरातल्या जमिनी कितीतरी वर्षं मातीच्याच होत्या, त्यामुळे त्या अधूनमधून सारवाव्या लागत. सारवण्यासाठी शेण आणायचं काम बर्याच वेळा आमच्याकडे असायचं. चार आण्याचं शेण अनेक खोल्यांसाठी पुरेसं असायचं. पुढे बाबांनी हळूहळू प्रत्येक जमीन सिमेंटची करून घेऊन त्यावर लाल रंगाचा गिलावा करून घेतला, त्याला कोबा केला असं म्हणायचे. भिंतींची माती सतत पडे, त्यामुळे भिंतीही हळूहळू सिमेंटच्या करून घ्याव्या लागल्या. पुढच्या बाजूला घराला जवळपास लागून रस्ताच होता, एक तीन चार पायर्यांच काय त्या मध्ये. रस्ता आणि घराच्या मध्ये उघडी गटारं हे बेळगांवच वैशिष्ट्य, पण जवळपास प्रत्येकानेच आपल्याला खर्चाने त्यावर फरशा टाकून घेतलेल्या होत्या. आमच्या घराच्या मागच्या बाजूला मात्र प्रशस्त अंगण आणि अंगणात एक मोठं तुळशी वृंदावन होतं. या वृंदावनाच्या चारही बाजूने प्रशस्त चौरस आकाराचा पार होता. त्यावर आम्ही खूप खेळायचो.

वेगवेगळी फुलझाडं या आमच्या अंगणात जास्वंद (याला तिकडे दासाळी म्हणतात), कुंदा, सायली, गुलाब, कर्दळी, करांटी (याला तिकडे घोरटी म्हणतात) अशी सगळी फुलझाडं आणि एक मोठ्ठ विलायती चिंचेचं झाडही होतं. या झाडाला खूप गोड चिंचा यायच्या. या चिंचा खाण्यासाठी छोटे पक्षी यायचे. चिमण्यांचा तर धुमाकूळ असायचा. घराच्या माजघरातून एक लाकडी जिना, आम्हांला माडीवर न्यायचा. तिथे दोन कमी उंचीच्या खोल्या होत्या, उंच माणूस उभा राहिला की, त्याच्या डोक्याला छत आपटायचं. या जिन्याच्या मुळातच जमिनीत बसवलेलं उखळ होतं. कितीतरी वर्षं या उखळात कुटूनच आई गोडा मसाला, चटणी असे प्रकार तयार करायची.

बाहेरच्या खोलीत एक मूर्तिकार श्रावण महिन्याच्या थोड्या आधीपासून नाग, बाळकृष्ण, हरतालिका आणि गणपतीच्या मूर्ती करायला सुरुवात करायचे. मग आम्ही त्यांच्याकडे हट्ट करून करून त्यातील मूर्ती रंगवायला शिकलो. आधी पांढरा रंग, मग एखादा शेल्याचा रंग, असं करतकरत संपूर्ण मूर्ती रंगवायला शिकलो. देवाच्या सान्निध्यात राहिलो ते असे. ते मूर्तिकार खूप गरीब होते, दोन तीन महिने त्या खोलीत मूर्ती करायचे आणि जाणीव म्हणून आमच्या हातावर खाऊसाठी काही पैसे ठेवायचे. भाडं देणं अर्थातच त्यांना परवडण्यासारखं नव्हतं.

घराला एक बाळंतिणीची खोली होती, संपूर्ण अंधार होता या खोलीत आम्ही त्याला अंधाराची खोली म्हणायचो. आश्चर्य वाटेल अशी व्यवस्था होती. या खोलीची हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात गार असं वातावरण असायचं त्या खोलीत.

बैठे घर असल्यामुळे उंदरांचा सुळसुळाट फार, त्यामुळे आम्हांला आवडो किंवा नावडो, मांजर पाळावीच लागे. आणि मग काही मांजराचा लळा ही लागे. स्वयंपाकघरात ओटा नव्हताच. आई खाली बसूनच स्वयंपाक करायची. कित्येक वर्षं चुलीवर स्वयंपाक होता. त्यामुळे लाकडं आणणं, ती रचून ठेवणं अशी सगळी कामं चालायची आम्हीही ती करू लागायचो. नंतर थोडी सुधारणा होऊन रॉकेलचा स्टोव्ह आला. एक उभा आणि एक आडवा असे दोन स्टोव्ह होते. स्टोव्ह पेटवणं हा एक कार्यक्रमच असायचा; मला हे काम खूप आवडायचं. त्यामुळे बर्याच वेळा मी स्टोव्ह पेटवायचो. बर्याच वर्षानंतर गॅसची शेगडी आली. फ्रीज हा प्रकार तर या आमच्या घरानं पाहिलाच नाही.

परसदारी विहीर होती. त्यावर कप्पी होती बसवलेली. त्यावर दोर टाकून आम्ही (थोडे मोठे झाल्यावर) कळशीने पाणी उपसायचो. ती विहीर 60 फूट खोल होती, पण अरुंद. शेतात जशा प्रशस्त विहिरी असतात तशी नव्हे.

बेळगावला बर्याच लोकांच्या स्वतःच्या विहिरी आहेत. विहीर आणि घर यामध्ये जी जागा होती तिथे कपडे धुवायचं काम चालायचं. कपडे धुण्यासाठी जे पाणी लागतं ते साठवायला डोण ज्याला म्हणतात ती एक प्रकारची दगडी उथळ टाकी सदृश्य व्यवस्था होती.

या घरात माझं बालपण गेलं, जन्मापासून 20 वर्षं मी या घरात राहिलो, माझ्या आई-वडिलांचं अर्ध्याहून अधिक आयुष्य याच घरात गेलं, त्या घराच्या जागी आता मात्र एक तीन मजली इमारत उभी आहे! ‘तुमच्या गल्लीतून गेलो की तुमच्या घराची आठवण येते’, असं अजूनही मला माझे मित्र सांगतात.

- सोमनाथ जायदे

पालक - माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे. / शिक्षक - नू. . वि. . महाविद्यालय, अप्पा बळवंत चौक, पुणे.