माझा पाल्य माझी जबाबदारी

शिक्षण विवेक    14-Apr-2023
Total Views |


माझा पाल्य माझी जबाबदारी

माझे नुकतेच डी.एड. संपले व लगेच दोन महिन्यात मला नोकरी लागली. शाळेत नोकरी लागल्यानंतर मला इयत्ता पहिलीचा वर्ग दिला. वर्गात मुले, मुली व मी, आम्ही दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होतो. हळूहळू मी, मुलांमध्ये रमून गेले. काही मुले हुशार, काही खोडकर, काही दंगामस्ती करणारी, तर काही आगावू होती. पण त्यामधील सर्वांत जास्त खोडकर मुलगा म्हणजे, रणजीत होता. अतिशय चंचल, वर्गात शांत बसणारच नाही, सतत बडबड करणे, रागवले की उलट उत्तर देणे. रणजीत हा दररोजचा त्रास सुरू होता. मी माझ्या शेजारच्या वर्गातील शिक्षकांना सांगितले. माझ्या शेजारच्या वर्गातील जोशीबाई वयाने व अनुभवाने खूप मोठ्या होत्या, त्यांनी मला लगेच सुचवले की, तू त्याच्या पालकांना बोलावून घे. त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घाल. मी त्या दिवशी लगेच पालकांना फोन करून बोलावले व त्यांना सर्व हकीकत सांगितली. पण त्या पालकांनी मलाच उलट सांगितले, त्याला वळण लावण्याची जबाबदारी तुमची आहे. मी नवीन असल्यामुळे काहीच बोलू शकले नाही. ज्या वेळी मी माझ्या मुख्याध्यापकांना ही गोष्ट सांगितली. त्या वेळी त्यांनी मला त्या पालकांना बोलावून घेण्यास सांगितले. पालक मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी परत आले. मुख्याध्यापकांनी पालकांची जबाबदारी काय असते? व शिक्षकांची जबाबदारी काय असते? हे नीट समजावून सांगितले.

आज आपल्याला असे बरेच पालक दिसतात. मुलांची जबाबदारी घेण्यात, मागे पडत आहेत. प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य असल्यामुळे, त्यांचे अति लाड केले जातात. त्या लाडाचे परिणाम हळूहळू शाळेत जाणवायला लागतात. शाळेत मुलाने एखादी चूक केली की, ती चूक आपल्या मुलाने केली आहे, हे पालक लवकर मान्य करत नाही.

सद्यपरिस्थितीत मात्र आई-वडील दोघेही नोकरी करत असतात व घरातील वयोवृद्ध आजी-आजोबा गावाकडे, यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवतात. मुलांवर नीट संस्कार झाले नाहीत की, तो पाळणाघरात होता त्यामुळे तसा आगावू झाला आहे, असे म्हणतात. पाळणाघराला दोष देत बसतात. आपण आपल्या पाल्याला किती वेळ देतो, याचा विचार करत नाही. आपण जरी नोकरी करत असलो तरीसुद्धा नोकरी सांभाळून, आपल्या मुलाच्या जडणघडणीची जबाबदारी आपणच घ्यायला हवी व जास्तीत जास्त आपल्या पाल्याला आपण वेळ दिला पाहिजे. फक्त आपला मुलगा जी वस्तू मागेल ती वस्तू आणून देणे म्हणजे जबाबदारी घेणे नव्हे, तर त्याच्याबरोबर भरपूर वेळ देऊन योग्य संस्कार करणे हेच आपले कर्तव्य आहे.

आपल्या पाल्याला शिस्त, ही प्रथम त्याच्या घरातून लागत असते. मुलांवर जे काही संस्कार होत असतात ते घरातूनच होत असतात. जसे घरातील वातावरण असते, तसा आपला पाल्य तयार होत असतो. आपल्या मुलाला चांगले वळण लावणे, चांगल्या सवयी लागणे, स्वावलंबी करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, इतरांना मान देणे, नम्रपणे वागणे या सर्व गोष्टींची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे.

ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आपण आकार देतो तशी, ती मूर्ती तयार होते, त्याला पैलू पाडतो, तिची सजावट करतो आणि त्या मूर्तीचे रूपच बदलून टाकतो. त्याप्रमाणेच माझा पाल्य म्हणजे मातीचा गोळा आहे व त्याला घडवणे ही माझी जबाबदारी आहे. असे प्रत्येक पालकांनी स्वीकारणे गरजेचे आहे.

संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. त्यासाठी लहानपणापासून शिस्तीचे संस्कार बालमनावर रुजवायला हवेत.

शाळेतील शिक्षकांनी जर आपल्या मुलांतील गुण दोष सांगितले, तर ते स्वीकारले पाहिजेत. कारण जगात कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नाही. सर्वांमध्ये गुण दोष असतात. शिक्षकांशी वाद न घालता माझ्या मुलामध्ये मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो असे जर म्हणालात, तर तुम्हाला तुमची जबाबदारी समजली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मुलांच्या संस्कारक्षम वयात, जे संस्कार अगर वळण मुलांना मिळते ती आयुष्यभराची शिदोरी असते आणि ही शिदोरी, मुलाला योग्य मार्गावर ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगी पडते.

आई-वडिलांवर अधिक जबाबदारी पडते ती, आपल्या मुलाच्या जीवनाचे वळण सुसंस्कृत करण्याची व यासाठी त्यांनी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत. आजच्या सामाजिक परिस्थितीत तर, पालकांवर आपल्या पाल्याची जबाबदारी वाढली आहे. त्या परिस्थितीला पालकांनी तोंड दिले पाहिजे.

उद्याचा सुसंस्कृत सुजाण नागरिक, जर आपल्याला घडवायचा असेल, तर सर्व पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वतः घेणे गरजेचे आहे.

- रोहिणी चौधरी, सहशिक्षिका,

नु..वी. मराठी शाळा, सोलापूर