अंगणातील अंगत-पंगत अविस्मरणीय अनुभव

शिक्षण विवेक    17-Apr-2023
Total Views |


अंगणातील अंगत-पंगत अविस्मरणीय अनुभव

लहानपणी मित्र-मैत्रिणींसोबत एकत्र खेळायचो, तसेच एकत्र जेवायचं यालाच आम्ही अंगत-पंगत म्हणत असू. अंगणात संध्याकाळच्या वेळेला थंडगार हवेत चंद्राचा पांढराशुभ्र प्रकाश छोटासा बारीक दिवा किंवा ट्यूब लाईटच्या प्रकाशामध्ये, आजूबाजूला असलेल्या झाडांच्या थंडगार हवेमध्ये आमच्या संध्याकाळच्या जेवणाचा हा सोहळा पार पडत असे. इतर वेळेस शाळेच्या वेळात हे फार काही जमत नव्हतं, पण मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत या गोष्टीचा मनमुराद आनंद घेता येत होता.

सगळ्या मित्र-मैत्रिणींची आई रोज संध्याकाळी जेवणाचे साधे, सोपे, पौष्टिक पण चटपटीत विविध पदार्थ तयार करत असे आणि भरपूर ताट वाढून देत असे. आम्ही सगळे मित्र मैत्रिणी रोज एकेकाच्या घरी जेवणासाठी जमत असू. जेवणात कढी-खिचडी, पापड, लोणचं, दही-थालीपीठ, धपाटे, पिठलं भाकरी, पिठलं भात, भाजी-भाकरी, पोळी, उकडपेंडी, इडली सांबार, डोसा चटणी असे अनेक वेगवेगळे पदार्थ प्रत्येकाच्या ताटात असायचे. स्वतःचे ताट आणि पाण्याचा तांब्या असे रोज संध्याकाळी एकेकाच्या घरी जेवणासाठी एकत्र जमायचो. हसत खेळत जेवण व्हायचे. सगळ्यांचे ताटातले सगळे पदार्थ खाल्ल्याने सगळे पदार्थ आवडू लागले. सगळे खाण्याची सवय लागली. जेवताना ताटात काही टाकायचे नाही हाही एक प्रकारचा संस्कार मनावर नकळत घडून गेला. अंगणात मित्र-मैत्रिणींसोबत जेवण्याची सर कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमधील जेवणाला येणार नाही हे तितकेच खरे.

जेवता जेवता अभ्यासाच्या गप्पा, दिवसभरात केलेल्या खोड्या, दंगा, मस्ती, धिंगाणा रुसलेल्या मित्र-मैत्रिणींचा रुसवा काढण्यासाठी अंगत-पंगत हा एक बहाणा होता, पण त्यातून मिळणारा आनंद म्हणजे अक्षरशः स्वर्गीय सुख होते. म्हणूनच म्हणतात ना... रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी!!!

आता या शहरातल्या मोठ-मोठ्या गगनचुंबी इमारतींमध्ये हे अंगणही राहिले नाही आणि अंगणातील अंगती-पंगतीचा आनंददेखील राहिला नाही.

- स्वप्नाली देशपांडे.

सौ विमलाबाई गरवारे प्रशाला