साप झाला शहाणा

शिक्षण विवेक    28-Apr-2023
Total Views |


साप झाला शहाणा

एक होती मुंगी. ती नेसली रंगीत लुंगी. शोधायला निघाली पुंगी. कशाला हवी पुंगी? तर म्हणे, ‘एक भला मोठा साप आमच्या वारुळाशेजारून जातो. ना इकडे बघत ना तिकडे बघत. नुसता स्वतःच्या तोर्यात. त्याच्या थंडगार अंगाखाली आम्ही बिचार्या चिरडून जातो. त्याचा त्याला पत्ताच नसतो. त्याला एकदा अद्दल घडवीन म्हणते. म्हणून पुंगी शोधीन म्हणते. पुंगी वाजली की कसा घाबरतो मग. असेल तिथून धावत सुटतो. घाबरतघाबरत आला की, लगेच तावडीत पकडते आणि चांगलाच धडा शिकवते.

मुंगी गेली कबुतराकडे. तो तिचा जिवलग मित्र. ती त्याला म्हणाली, ‘चल, माझ्या मदतीला. पुंगी शोधू लागायला.’ कबुतर म्हणाले, ‘कशाला हवी गं मुंगीताई पुंगी?’ पुंगी म्हणाली, ‘अरे, तो साप नाही का? आम्हाला फार त्रास देतो आता मलापण एक युक्ती सुचली आहे. त्याची चांगलीच फजिती करते.’ कबुतर म्हणाले, ‘हो गं! आम्हालाही तो त्रास देतो. आम्ही बाहेर गेलो की, गुपचूप येऊन आमची अंडी खातो; पण मी आता येऊ नाही शकत. मला फार भूक लागली आहे.’ मुंगी म्हणाली, ‘चल, माझ्याकडचे दाणे खा.’

मुंगीने कबुतराला दाणे दिले. कबुतराने पटापट दाणे टिपले आणि निघाला मुंगीताईबरोबर पुंगी शोधायला. दोघे जण पुढे-पुढे जाऊ लागले. इकडे-तिकडे पाहू लागले. त्या दोघांना घाईघाईने जाताना पाहून समोरून येणार्या हत्तीने मध्येच त्यांना अडवलं आणि विचारू लागला, ‘काय रे एवढी घाई? कुठे चालली मित्रांची जोडी?’ मुंगीताई जाम घाबरली. काय सांगावे तिला कळेना. कबुदादाने मात्र ठरवलेलं काम हत्तीला सांगितलं. हत्ती म्हणाला, ‘अस्सं आहे काय! बरंबरं! तो साप ना, मला ही काही चूक नसताना दंश करत असतो. मी करीन मदत; पण मुंगीताई मला तुझ्याकडची थोडी साखर दे की.’ मुंगीने आपल्याकडची साखर हत्तीभाऊंना दिली आणि ते मदतीला तयार झाले.

हत्ती म्हणाला, ‘अरे माझ्याकडे एक गंमत आहे.’ कबुतर आणि मुंगी एकदम म्हणाले, ‘सांग सांग लवकर.’ हत्ती म्हणाला, ‘पुंगी-बिंगी हवी कशाला? माझ्या सोंडेतूनच काढतो पुंगीचा आवाज.’ हत्ती पुंगीचा आवाज काढू लागला. सापाला तो बोलावू लागला. पुंगीचा आवाज ऐकून साप घाबरला. सैरावैरा पळू लागला. पळतापळता गोंधळून गेला. धावपळीत दाराच्या फटीत अडकला आणि दुखतंय म्हणून रडू लागला. तिकडून आला बंटी. कोठून आवाज येतोय बरं, असं म्हणत इकडेतिकडे शोधू लागला. दाराकडे पाहतो तर काय? दाराखाली साप अडकलेला. तो रडतोय हे पाहून बंटी हसू लागला. म्हणाला, ‘का रे बाबा रडतोस? तुला पाहिलं की, आम्ही रडतो रोज आणि आज तुला काय झालं रडायला? ’ त्यावर साप म्हणाला, ‘तो आवाज ऐकलास का? पुंगी वाजते आहे. मला गेलं पाहिजे. नाही तर कोणी तरी माणूस पकडेल. मला अगोदर इथून बाहेर काढ.’

बंटीने दार उघडलं. साप आणि बंटी पुंगीचा आवाज ऐकू लागले, कोण आहे ते शोधू लागले. साप आवाजाच्या दिशेने चालू लागला. माणूस तर कोणी नव्हताच मुळी. बंटीही सापाच्या मागे जाऊ लागला. साप थेट हत्तीपुढे येऊन थांबला. मुंगी, कबुतर, हत्तीला एकत्र पाहून साप घाबरलामारू नका, मारू नका’, विनवू लागला. तेवढ्यात बंटी तेथे पोहचला. तिघे मित्र काही करणार तोच बंटी म्हणाला. ‘हत्तीदादा मला ओळखलंस का? मी बंटी! रोज तुला झाडाचा ताजाताजा पाला आणि केळी खाऊ घालतो. आणि बरं का कबुतरभाऊ तुला रोज गच्चीवर दाणे ही मीच टाकतो. मी तुमचा मित्र बंटी आहे. साप संकटात आहे, तर त्यालाही मदत मीच करणार.’ हत्ती आणि कबुतर म्हणाले, ‘आमचं काही नाही. आम्ही तर मुंगीताईला मदत करायला आलो आहोत.’ बंटी मुंगीला म्हणाला, ‘मुंगीताई, मी रोज तुमच्या वारुळापाशी पोळीचे तुकडे टाकतो. आपण सगळे मित्र आहोत ना? घाबरलेल्या सापाला कशाला बरं त्रास द्यायचा?’ तिघांनी बंटीला सांगायला सुरुवात केली. ‘पण तो आम्हाला त्रास देतो. त्याचं काय ? कधी अंगाखाली चिरडतो, तर कधी अंडी खातो. कधी फुत्कार टाकून घाबरवून सोडतो.’ बंटीने आपला मोर्चा सापाकडे वळवला. तो काही बोलायच्या अगोदरच साप म्हणाला, ‘बंटीसाहेब चुकलं माझं. पुन्हा असं करणार नाही. विनाकारण कोणाला त्रास देणार नाही. आजपासून सगळ्यांशी मित्राप्रमाणे वागणार.’ बंटी त्यालाथँक्सम्हणाला. तेव्हापासून साप स्वतःहून कोणाची खोडी काढत नाही. कोणाला मुद्दाम त्रास देत नाही. आता साप शहाणा झाला होता. ते पाचही जण एकमेकांचे मित्र झाले. रोज भेटू लागले. एकमेकांच्या मदतीला धावून जाऊ लागले.

- सुनीता वांजळे, शिक्षिका

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे