संवाद : एक आवश्यक गोष्ट

शिक्षण विवेक    02-May-2023
Total Views |


संवाद : एक आवश्यक गोष्ट

खाऊ नको, नको फ्रॉक

आई, अगं ऐक जरा

नको, नको काहीच मला

माझ्याशी तू बोल जरा

लॅपटॉप ठेवून बाजूला तो

बाबा, बोला माझ्याशी

बिझी एवढे झालात, तर

संवाद साधू कोणाशी?

लहान मुलांचे दुःख या ओळींतून आपल्याला जाणवेल. आई-बाबा दोघेही त्यांच्या उद्योग-व्यवसायात प्रचंडबिझीझाल्याने मुलांवर वरील ओळी म्हणायची वेळ आली आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या प्राथमिक गरजा मानल्या जातात, पण खरं तर यातसंवादही गोष्टदेखील समाविष्ट करायला हवी.

संवाद घरातल्या व्यक्तीशी असो किंवा बाहेरच्या, तो मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. इतका महत्त्वाचा की, बोलणारी व्यक्ती जशी संवाद साधू इच्छिते, तशीच मुकी व्यक्तीदेखील हाताच्या खुणांमधून-नजरेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. मनात येणारा प्रत्येक विचार, भावना, आनंद, दुःख ज्याला इतरांशी संवाद साधून व्यक्त करता येऊ शकत नाही, त्याची व्यथा खरंच मोठी असते. अशा व्यक्तींची मनातल्या मनात घुसमट होऊन त्या व्यक्तीला मानसिक विकार/आजार जडू शकतात.

हल्ली मोबाइलमुळेमेसेजमधून संवाद साधण्याची सुविधा आहे; पण तरीही मौखिक संवादाचे महत्त्व मोठेच आहे, हे निश्चित. म्हणूनच वेळ काढून माणसं एकमेकांना फोन करून संवाद साधतात किंवा प्रत्यक्ष भेटून बोलतात. लहान बाळाला बोलता येत नसलं, तरी तो अधूनमधून हुंकार देतो, बोलणार्या माणसाकडे एकटक पाहून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. यातूनच लक्षात येतं की, जीवनाची सुरुवातच संवादातून होते आणि तो संवाद अंतापर्यंत सुरू राहतो.

कोणत्याही संवादात शब्दांना प्रचंड महत्त्व आहे. शब्द चुकले, तर संवादाचा विसंवाद व्हायला वेळ लागत नाही. आणि विसंवादातून नाते-संबंध तुटण्याची, दुरावण्याची शक्यता वाढते. मात्र, संवादाचे रूपांतर सुसंवादात झाले, तर ते खूप सुखद होते. संवादामुळे अनोळखी व्यक्तीदेखील जवळची होऊ शकते. प्रवास करताना हा अनुभव अनेकांना येतो. काही जणांची मैत्री लोकल ट्रेनच्या प्रवासातही होते. याचाच अर्थ संवादाला स्थळ, भाषा यांचा अडथळा नसतो. संवाद कुठेही आणि अगदी इतर भाषिकांशीसुद्धा छान होऊ शकतो.

वयस्कर माणसांना संवादाचीच गरज जास्त भासते. सुना, नातवंडं, मुलं, आजी-आजोबांशी रोज बोलत असतील, तर आजी-आजोबा आनंदी व निरोगी असतात. एखादी व्यक्ती रुग्णालयात असेल, तर ती व्यक्ती आपल्याला कुणीतरी भेटायला यावं अशी इच्छा बाळगते. असं का? कारण, संवाद साधल्याने त्या व्यक्तीला बरं वाटतं. दुखणं विसरायला मदत होते.

संवाद हे संस्कार रूजवण्याचेही एक साधन आहे. घरातल्या मोठ्या माणसांच्या संवादातून लहान मुलांवर कळत-नकळत चांगले-वाईट संस्कार होतात. मोठी माणसे भांडत असतील, तर मुले घुसमटतात किंवा भांडकुदळ होतात. मोठी माणसं छान बोलत असतील, तर मुले सुस्वभावी होतात. संवाद या मानवाला ईश्वराने दिलेल्या वरदानाचा तो त्याच्या नित्य जीवनात जितका चांगला उपयोग करेल, तितकं त्याचं आयुष्य आनंदी होईल.

काही जण कमी बोलतात, काही जास्त, पण अजिबातच बोलत नाही, असा मानव शोधूनही सापडणार नाही. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जंगलात तप करण्यासाठी जायचे. तिथे त्यांना बोलण्यासाठी माणसं भेटत नसत, पण ते आपल्या हृदयातील ईश्वराशी, निसर्गशी संवाद साधत असत. ‘आपुलाची वाद आपणाशी’, असं संत तुकारामांनी सांगितलं. असा स्वसंवाद ज्याने हृदयातला ईश्वर जाणून घेतला आहे, त्याला साधता येऊ शकतो. तो सर्वोत्तम संवाद असतो. एकूणच, संवादाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे, हे नक्की आहे.

- शैलजा भास्कर दीक्षित, सहशिक्षिका,

बालविकास कुटी, गणेशवाडी, कल्याण पूर्व