प्रवास

शिक्षण विवेक    02-May-2023
Total Views |


प्रवास

प्रवासहा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. मग तो एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणारा असो किंवा आयुष्याचा असो. प्रवासाचे वर्णन काही शब्दांत करणे अशक्यच असते. ‘आयुष्यहादेखील एक प्रवासच असतो. त्यात अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. या आयुष्याच्या प्रवासात काही सुखद क्षण, तर काही दु:खाचे खाचखळगे असतात. तरीही आपण याचा आनंद घेत असतो.

प्रवास करताना आपल्याला निसर्गाच्या विविध रूपांची ओळख होत असते. सावल्या देणार्या मोठमोठ्या वृक्षांची, डोंगरावरच्या वनराईची, घट्ट लपटलेल्या वेलींची, हिरवीगार शेती आणि शांत निर्मळ नद्या वाहताना दिसतात. मंदमंद वारा अंगावर शहारा आणणारा असतो, तर कधी पावसाची भूर-भूर असते आणि आठवण करून देणार्या बालपणीच्या आठवणी असतात.

प्रवासादरम्यान आपण निसर्गाशी खर्या अर्थाने जोडलो जातो. वेगवेगळ्या रूपातून निसर्ग आपल्याला साथ देत असतो. वाटेत दिसणारी पक्षी, छोटे-छोटे प्राणी यांची ओळख होते. छोटी गावे, मोठी शहरे, इमारती, अधून-मधून एखादा कारखाना धूर ओकत असतोच; पण या यंत्रयुगात हेही होणारच. कुठे शेजारून येणारी बैलगाडी, इतर वाहन, अंधाराची अनुभुती देणारा मोठा बोगदा, कधी पवनचक्क्या, तर कधी रेल्वेगाड्या. निसर्गाचं प्रत्येक रूप, रंग यांमुळे आपल्याला पाहता आणि अनुभवता येते. प्रवासादरम्यान आपल्या जवळच्या माणसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही; तसेच आपण अंर्तमुख होऊन सिंहावलोकन करून शांत होतो.

प्रवासात ओळख-पाळख नसलेली माणसेही दिसतात. आपण स्वत:च्या पलीकडे जग पाहायला शिकतो. आपल्या एककेंद्री आयुष्याच्या पलीकडेही जग आहे. हेही आपल्या लक्षात येते. अशा प्रकारे असा अनमोलखजिनाया प्रवासादरम्यान आपल्याला मिळत असतो. हा असा खजिना कुठल्याही भौतिक सुखापेक्षा लाखपटीने आनंद आणि समृद्धी देणारा असतो. म्हणूनच आपल्याही आयुष्याचा प्रवास करताना भरभरून जगा आणि खर्या अर्थाने आनंदाचा उपभोग घ्या.

- संध्या देशपांडे, पालक,

मा.. गोळवलकर गुरूजी विद्यालय, पुणे