सुट्टीतील सहल (माझा अनुभव )

शिक्षण विवेक    20-May-2023
Total Views |


सुट्टीतील सहल (माझा अनुभव )

या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही माझ्या मामाकडे साताऱ्याला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मामा आम्हांला पाचगणीला घेऊन गेला. जाताना वाटेत ‌‘आसले' या गावी भवानी माता मंदिराला भेट दिली. हे मंदिर एका टेकडीवर आहे. मंदिराचा परिसर खूप शांत आणि प्रसन्न होता. आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि वाईकडे जाण्यास निघालो.

वाईला आम्ही महागणपतीचे दर्शन घेतले, एवढा मोठा गणपती मी प्रथमच बघितला; त्यानंतर शेजारीच असलेल्या काशी विश्वेश्वर म्हणजे महादेवाचे दर्शन घेतले. तिथे खूप मोठा नंदी होता. आम्ही तिथे फोटोही काढले; त्यानंतर आमचा प्रवास पाचगणीच्या दिशेने सुरू झाला. पांचगणीला जाताना वाटेत आईचे कॉलेज लागले, ते पाहून आईला खूप आनंद झाला. पुढे पाचगणी घाट सुरू होताच उजव्या बाजूला मामाच्या साईटवर गेलो, तिथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी आमीर खानने देणगी दिली आहे. अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज असे हे हॉस्पिटल उभारले जात आहे. त्या हॉस्पिटलच्या मागेच रेशीम केंद्र होते, आम्ही तिथे गेलो पण सध्या ते बंद होते. तिथून आम्ही पाचगणीला गेलो.

घाटातून वर जाताना धोम धरणाचे लांबवर पसरलेले पाणी खूप छान दिसत होते. पाचगणीला जेवण करून आम्ही बेलेर हॉस्पिटलला मामाच्या कामासंदर्भात भेट दिली. तिथे फणसाची खूप सारी झाडे होती; प्रत्येक झाडावर खूप सारे फणस लागले होते. तिथे आम्ही एक दुर्मीळ प्राणी बघितला त्याचे नाव होते ‌‘शेकरू'. तिकडचा परिसर बघता पेशंट एकदम ठणठणीत बरा होईल. पेशंटला वाटणारच नाही की, आपण हॉस्पिटलमध्ये आलोय, एवढा सुंदर परिसर होता. त्यानंतर आम्ही संध्याकाळी साताऱ्याला परत गेलो.

तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सज्जनगडला गेलो. मी, मामी, दादा-वहिनी यांच्यासोबत पुढे गेले, आई-बाबा मागे राहिले होते. ते गडावर येत असताना एक कुत्रा त्यांच्यासोबत येत होता, आई-बाबा थांबले की तो ही थांबायचा. आई-बाबा चालू लागले की, तोही चालायचा. गडावर आल्यावर मात्र तो कुठे दिसला नाही. गडावर आरती चालू होती. आम्ही दर्शन घेतले प्रसाद घेऊन समाधी मंदिरात गेलो. समाधी मंदिराच्या वर प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे, मंदिरामध्ये खूप शांत आणि प्रसन्न वाटत होते. तिथूनच पायऱ्या उतरून आम्ही खाली समाधी मंदिरात पोहोचलो, तिथे अभिषेक चालू होता.

आम्ही रामदास स्वामींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन चप्पल स्टॅन्ड पाशी आलो. तिथे एक गंमतच झाली. तिथे माकडे खूप होती. चप्पल स्टॅन्डवर एका काकांनी चप्पल ठेवली हेल्मेट ठेवताना त्याखाली पाण्याची बाटली ठेवली आणि ते दर्शनाला गेले, हे जवळच बसलेल्या माकडाने बघितले. त्याने हेल्मेट खालील बाटली काढून पाणी प्यायले बाटली शेजारी ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकली. आम्हांला खूप आश्चर्य वाटले. जे या माकडांना समजते ते माणसांना कधी समजणार असे वाटून गेले. नंतर आम्ही गड फिरून अकरा वाजता घरी पोहोचलो.

संध्याकाळी चाफळला प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. हे मंदिर देखील खूप मोठे आहे. या मंदिरात रामदास स्वामींच्या तपश्चर्येची जागा होती. अगदी बारीक वाट होती. मी आणि बाबा आत मध्ये गेलो. कुठेही खिडकी नसताना ती खोली एकदम थंडगार होती याचे आश्चर्य वाटले. वाटेत पालीच्या खंडोबाला गेलो. खंडोबाचे दर्शन घेऊन पुन्हा रात्री साताऱ्याला घरी आलो.

दुसऱ्या दिवशी मामाने बांधलेले फार्महाऊस बघायला गेलो. तिथून 360 कोनातून सगळी दृश्य दिसतात. एका बाजूला सज्जनगड, एका बाजूला अजिंक्यतारा, एका बाजूला उरमोडी धरण आणि एका बाजूला कनेर धरण दिसत होते. तिकडे झाडेच झाडे होती. खूप सुंदर आणि शांत परिसर होता. अशा प्रकारे चार दिवस मजा करून आम्ही पुण्याला परतलो.

- आर्या मिलिंद वाडेकर

व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, नऱ्हे, पुणे. (इयत्ता - 8 वी व्हिनस)