सिनेमा - सिरियलमधून मला काय हवंय?

शिक्षण विवेक    20-May-2023
Total Views |


सिनेमा - सिरियलमधून मला काय हवंय?

पूर्वीच्या काळी मनोरंजनाला तसं दुय्यमच स्थान होतं. मनोरंजन कधीकधी आपल्याला आपल्या कर्तव्यापासून दूर करतं, असं मानलं जायचं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असं मानलं जायचं. पण आताच्या काळी मनोरंजनाला बरंच महत्त्व आलं आहे. याचं कारण कदाचित असं असावं की, आताच्या काळी माणसं खूप बिझी झाल्याने, कामाचं टेन्शन दूर करण्यासाठी मनोरंजनाची गरज वाढली आहे.

पूर्वी ही गरज कुटुंबातले सदस्य आपापसात गप्पा मारून, पत्ते खेळून, भेंड्या खेळून पूर्ण करत असत. पण आता तेवढा वेळ कोणाजवळ नाही. गप्पा मारायला बसलं, तरी एकीकडे टि.व्ही. चालूच असतो, मग संवाद थांबतात आणि उरतं निव्वळ टि.व्ही. पाहणं. या टि.व्ही.वरून अनेक सिरियल्स, सिनेमे, डॉक्युमेंटरीज, मुलाखती, लाईव्ह गाण्यांचे प्रोग्रॅम असं बरंच काही असतं.

घरातल्या महिला मात्र सिरियलच जास्त पसंत करतात आणि हो सिनेमाही. पुरूषही तेच पाहतात. काही जण बातम्या, डॉक्युमेंटरीही पाहतात पण कमीच.

वाईट या गोष्टीचं वाटतं की, ज्या सिरियल्स जास्त पाहिल्या जातात, त्यात आजकाल लेखक मंडळी सतत कौटुंबिक कलह रचत राहतात. मोठ्या जावेने धाकट्या जावेला छळणं, सासूने सुनेविरूद्ध कपट करणं, मित्राने मित्रालाच फसवणं वगैरे वगैरे. सिनेमातही असंच काहीतरी असतं. सिनेमातले फायटिंगचे सीन तर भयंकरच दाखवतात. असं वाटतं की, पृथ्वीची गुरूत्वाकर्षण शक्तीच नष्ट झाली आहे की काय! ते नट असे उंच उडी घेऊन हवेत दोन- दोन मिनिटे तरंगत फायटिंग करतात की, पाहून डोळे मोठे होतात. हे पडत कसे नाहीत किंवा यांचे हाड कसे मोडत नाही? असे प्रश्न पडतात.

ही सगळी नकारात्मक स्वरूपाची दृश्य पाहून नकळत प्रेक्षकांच्या मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. लहान मुलांवर तर नकारात्मकता वाढते. त्यांना टि.व्ही.तलं सगळं खरं वाटत असतं. ते नकळत या नकारात्मक गुणांचं अनुकरण करू लागतात. वाईट वागू लागतात.

मग मला हवंय तरी काय या सिनेमा-सिरियलमधून?

मला हवे आहेत उदात्त विचार. थेट अंतःकरणात सकारात्मकता, निःस्वार्थी प्रेम, सात्विक गुण निर्माण करणारे. मला हव्या आहेत अशा सिरियल्स, ज्यातून मन शांत होईल, घरातल्यांवरचा विश्वास वाढेल, देशभक्ती जागृत होईल.

मला हवे आहेत, असे सिनेमे ज्यात नसतील मारामाऱ्या. ज्यात रूजतील सकारात्मक विचार. ज्यातून निर्माण होईल देशात आणि कुटुंबात एकोपा. नकारात्मक शक्तीला दूर करत अंतिम विजय सत्याचाच होतो, हे सिद्ध झालेलं मला सिनेमात पाहायचं आहे.

स्वामी विवेकानंद यांचा भक्तीयोग, कर्मयोग मला पाहायला आवडेल. एकदा ईश्वरावर श्रद्धा ठेवली की, फायटिंगची गरज संपते. कपटाची गरज पडत नाही. शांती पसरते. हे विचार जनमानसात रुजावे. कपट, अनीती, स्वैराचार, अनाचार यांची सावलीही नसावी सिनेमात सिरियलमध्ये. तर आणि तरच आज समाजात सरळमार्गी मुले घडतील. सात्विक विचारांनी सतत घर भरलेलं राहील आणि एक सुंदर समाज घडेल असं मला वाटतं आणि ते घडण्यासाठी हातभार लागेल चांगल्या, उदात्त, श्रेष्ठ सिरियल्सचा आणि सिनेमांचा.

बदल हा निसर्गाचा नियम आहे. वाईट सिनेमे/सिरियल्स जाऊन त्याजागी सात्विक सिनेमे/सिरियल्स येवोत. हा बदल नक्कीच घडो ही शुभेच्छा मनी बाळगू या.

...शैलजा भास्कर दीक्षित.

सहशिक्षिका, बालविकास कुटी,

गणेशवाडी, कल्याण