खरा मित्र

शिक्षण विवेक    23-May-2023
Total Views |


खरा मित्र

एके दिवशी एक लाकूडतोड्या जंगलात गेला. त्याला एक वाघ शिकाराच्या जाळ्यात अडकलेला दिसतो. तो वाघ त्याला मदत मागू लागतो. लाकूडतोड्या त्याला जाळ्यातून सोडवतो. वाघ लाकुडतोड्याला आपल्या गुहेत घेऊन जातो आणि त्याला सोने, चांदी पैसे देतो. त्यावर लाकूडतोड्या म्हणतो, ‌‘एवढे पैसे, सोनं-चांदी तुझ्याकडे कसं आलं?' वाघ म्हणतो, ‌‘अरे आजपर्यंत जेवढ्या शिकारी मी केल्या, त्यांचेच आहेत हे पैसे. तू माझे प्राण वाचवलेस म्हणून माझ्याकडून तुला भेट', असं म्हणून ते सर्व पैसे, सोनं, चांदी तो त्या लाकूडतोड्याला देतो.

लाकूडतोड्या तिथून पुढे जातो. त्याला एक खार कुत्र्याने आपल्या पायात पकडलेली दिसते. ती खार जोरजोरात ओरडू लागते. ‌‘मदत करा, मदत करा, वाचवा.' लाकूडतोड्या त्या कुत्र्याला दगड मारून पळवतो. ती खार लाकूडतोड्याचे आभार मानते. ती लाकूडतोड्याला खायला बोरं देते. तिथून लाकूडतोड्या पुढे जातो. पुढे गेल्यावर त्याला एक साप झाडाच्या ढोलीत अडकलेला दिसतो. तो लाकूडतोड्या झाडाला तोडून त्या सापाचा जिव वाचवतो. तो साप लाकूडतोड्यास म्हणतो की, ‌‘मी अडचणीच्या वेळी तुझी मदत करेन.' पुढे त्याला एक माणूस खड्ड्यात पडलेला दिसतो. लाकूडतोड्या त्याचीही मदत करतो. तो त्या माणसाला एका दोरीने वर ओढतो. तो माणूस त्याला आपल्या घरी घेऊन जातो. तो माणूस म्हणतो, ‌‘तू माझी मदत केली आहेस. तू इथच बस मी आलोच.' तो माणूस राज्याकडे जातो आणि राजाला सांगतो की, ‌‘माझ्या घरी चोर आला आहे.' तो माणूस राजाच्या सैनिकांना त्याच्या घरी घेऊन जातो. ते सैनिक लाकूडतोड्याला तुरुंगात टाकतात. त्या वेळी त्या तुरुंगात लाकूडतोडयाने वाचवलेला साप येतो. साप लाकूडतोड्याला म्हणतो की, ‌‘मी तुला म्हटलं होतं, की तुझी अडचणीच्या वेळी मदत करेन. मी राजाच्या मुलीला चावतो. तू तिला बरं कर', असं म्हणून तो साप राजाच्या मुलीच्या कक्षात जाऊन तिला चावतो. राजाला हे कळताच तो अनेक वैद्य, हकीम बोलवतो; पण कोणाकडेच त्यावरचा उपाय नसतो. त्यावर लाकूडतोड्या म्हणतो, ‌‘माझ्याकडे आहे उपाय.' लाकूडतोड्या त्या मुलीला बरं करतो आणि तिचे प्राण वाचवतो. राजा खुश होऊन लाकूडतोड्याशी त्याच्या मुलीचं लग्न लावतो. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र हेच आपल्याला यातून कळतं.

- संकलन - श्रीरंग बेंद्रे, 7 वी,

कै. वि. मो. मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर