स्वप्न आणि सत्य

शिक्षण विवेक    03-May-2023
Total Views |


स्वप्न आणि सत्य

स्वप्न म्हणजे काय? तर, स्वप्न म्हणजे जीवनातील पुढच्या वाटचालीचा पाया. आपण दिवसभरात जे काही पाहतो, त्या विषयाशी निगडित आपल्याला रात्री झोपेत दिसतं. त्याला आपण स्वप्न पडलं, असं म्हणतो आणि मग आपण म्हणतो की, मी डॉक्टर होईन, इंजिनीअर होईन, पोलिस होईन. अशा अनेक गोष्टी आपण स्वप्नात पाहत असतो. मात्र, आपण बघितलेलं स्वप्न खरंखरं होतं का...?

मला डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची आहे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. हेच माझं स्वप्न आहे. एखाद्या वेळी इतरांचं कार्य पाहूनही आपण प्रेरित होतो आणि आपल्याला त्याच्यासारखं आपण व्हावं असं वाटू लागतं. कोरोनाच्या काळात पोलिसांना किंवा डॉक्टरांना पाहून अनेकांना असं वाटलं की, आपणही यांच्यासारखी सर्वांची सेवा करावी. मलाही असं वाटलं, की आपणही यांच्यासारखं काही तरी समाजासाठी करावं.

देशाच्या शूर सैनिकांना जेव्हा मी पाहते, तेव्हा मलाही असं वाटतं की, आपण त्यांच्यासारखं सैनिक व्हावं. सैनिक आपला जीव धोक्यात घालून देशाला वाचवतात, अगदी तसंच शौर्य आपण दाखवावं, असं मलाही वाटतं.

आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो, पण अभ्यास मात्र नकोसा वाटतो. मग आपल्याला असं वाटू लागतं की, ज्यात अभ्यास नाही, असं काही तरी होऊ जसे की, शेतकरी! शेतकर्याला केवळ शेतात जावं लागतं. त्याला अभ्यास करावा लागत नाही. मात्र, नंतर असं लक्षात येतं की, शेतकर्याला अभ्यासापेक्षाही अनेक महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. त्याला कष्ट करावे लागतात आणि त्याने ते कष्ट केले नाही तर, आपल्याला अन्न मिळणार नाही. मग पटकन लक्षात येतं की, हेसुद्धा काम खूप मोठं आहे. मग मात्र आपण हे नको, ते करू असं म्हणतो. मात्र, मित्रांनो कोणतेही कष्ट न घेता, कोणतीही मेहनत न घेता स्वप्न सत्यात येत नाही, ही खूणगाठ आपण बांधायला हवी.

- ऋषिका बादाडे, 8 वी,

श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव