आजोबांना पत्र

शिक्षण विवेक    31-May-2023
Total Views |


आजोबांना पत्र

प्रिय आजोबा,

तुम्हांला तुमच्या लाडक्या गोलूचा शि. सा. .

आजोबा, मला तुमच्याकडून घरी परतून दहा दिवस झाले; पण खरं सांगू? मला इथे अजिबात करमत नाहीय. इथे आई, बाबा, मीनूताई, केशवकाका सर्व जण आहेत; पण तरीही मनच लागत नाहीय.

किती मजा केली आपण सुट्टीत आम्ही तुमच्याकडे आल्यावर? ते सगळं डोक्यातून जातच नाहीय. आमच्या बाई एकदा म्हणाल्या होत्या की, ‌‘त्या गावाला काय डबोलं ठेवलंय रे तुमचं? लागली सुट्टी की, पळता गावाला.' बाईंना काही कळतच नाही. गावाला गेल्यावर कश्शी मजा येते, ते त्यांना काय कळणार? त्यांना म्हणे गावच नाहीय. मुंबईतच सगळे जन्मले आणि मुंबईतच राहिले. मग गाव कसं असेल?

आजोबा, त्या दिवशी तुम्ही आम्हाला आंब्याच्या झाडाला झोका बांधून दिलात; पण त्यावर आधी आम्हाला बसू देता गंगूबाई भांडीवालीच्या पोरीला झोक्यावर बसवलं, तेव्हा मी तुम्हाला रागावून ‌‘वाईट्ट आजोबा' म्हटलं. मात्र, नंतर तुम्ही समजावलं की, बेटा, लक्षात ठेव. गरीबात देव असतो. त्यांना हाडतुड करू नये. त्यांना माया द्यावी. आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्यावं. मला ते खूपखूप पटलं. अगदी हृदयालाच भिडलं. मी इथे आल्यावर माझ्या मित्रांना ती हकीकत सांगितली; तेव्हा मित्र म्हणाले की, तुझे आजोबा देवमाणूसच आहेत.

आजोबा, आठवतंय? मी आंब्याच्या राशीसमोर बसलो होतो नि चोखूनचोखून आंबे खात होतो? तेवढ्यात ते बनेकाका आले नि वादळात त्यांचं घर उद्ध्वस्त झालं म्हणून रडायलाच लागले. तुम्ही त्यांना पिशवीभर आंबे आणि डाळ-तांदूळ दिलं. त्या वेळीही आधी मला एवढं काही कौतुक वाटलं नव्हतं, पण नंतर जेव्हा बनेकाकांच्या नजरेत आनंदाश्रू पाहिले तेव्हा कळलं की, जीवनाचा आनंद स्वार्थीपणाने एकटंच खाण्यात नाही, तर आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं दुसऱ्याला देण्यात आहे.

आजोबा, मी खूप भाग्यवान आहे की, मला इतकं छान आजोळ मिळालं. इतके छान आजी-आजोबा मिळाले. आजीची माया, तर कश्शाकश्शात मोजता येणार नाही.

आजी त्या सुमीआजीच्या लेकीला किती कपडे आणि वह्या-पुस्तकं देते हो? ती पण अगदी तुमच्यासारखीच उदार कर्णच आहे!

आजोबा, आई हाका मारतेय. मी पत्र इथेच संपवतो. पण ऐका ना! मी तुमच्याकडून खूप चांगले गुण घेऊन घरी परतलोय. आता ते गुण मीही अंगिकारीन, हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि हो, मी पुढच्या उन्हाळी सुट्टीत परत येणारे, खूप काही नवं शिकायला.

आता मी पाचवीत गेलोय. माझी शाळा खूप मस्त आहे. लायब्ररी पण आहे त्या शाळेत. मी शाळेच्या गमतीजमती नंतर कळवीनच.

आजीला नमस्कार सांगा. मामा-मामीलासुद्धा नमस्कार सांगा. टिंगू, मोंटूला गोडगोड पापा. भेटूच!

तुमचा लाडका,

गोलु

- शैलजा दीक्षित, सहशिक्षिका,

बालविकास कुटी, गणेशवाडी, कल्याण (पूर्व)