‌‘बैलगाडीचे चाक'

‌‘बैलगाडीचे चाक"

शिक्षण विवेक    15-Jul-2023
Total Views |


‌‘बैलगाडीचे चाक'
  दिवाळीची सुट्टी सुरू झाली. आमच्या मळ्यातला जुना गोठा खराब झाला होता. पाऊस पडला की, गोठा खूप गळायचा. म्हणून आम्ही जुना गोठा पाडून नवीन गोठा बांधणार होतो. एक दिवस गवंडी काका आले. त्यांनी गोठा बांधायला सुरुवात केली. माझ्या घरातील सर्व माणसेदेखील गोठा बांधण्यासाठी मेहनत करत होती. मला वाटले की, आपणही आपल्या गोठ्यासाठी काहीतरी काम करू या.

मी माझ्या वडिलांपाशी गेलो. त्यांना म्हणालो, ‌‘पप्पा, मला पण गोठ्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही मला कुठले पण काम सांगा.' पप्पांनी आणि माझ्या काकांनी काही दिवसांपूर्वी आमच्या जुन्या बैलगाडीचे चाक आणि नांगर बाजूला काढले होते. चाकावर खूप धूळ आणि माती बसली होती. ते चाक, पप्पा आणि काकांनी पाण्याने स्वच्छ धुतले. बैलगाडी तर तुटून गेली होती. तिचे दुसरेपण चाक खराब झाले होते. हे एकच चाक जरा चांगले वाटत होते. म्हणून हेच चाक जुन्या काळातल्या बैलगाडीची आठवण म्हणून गोठ्याला फिट करण्याचे ठरले होते.

पप्पा म्हणाले, ‌‘प्रज्वल, तू बैलगाडीचे चाक पांढऱ्या रंगाने रंगवतोस का?' मी म्हणालो, ‌‘ठीक आहे, मी रंगवतो चाक.' पप्पांनी मला चाकाला रंग कसा द्यायचा ते दाखवलं. मी चाकाला रंग देण्यास सुरुवात केली. मी ते धुतलेले चाक छान रंगवत होतो. चाकाला पांढरा रंग देऊन झाला. ते चाक एक दिवस सुकण्यासाठी उन्हात ठेवले. चाकाचा पांढरा रंग सुकल्यानंतर त्याच्यावर निळा रंग द्यायचा होता. कारण आमच्या जुन्या बैलगाडीचा रंग निळा होता. म्हणून आम्ही त्या चाकाला निळाच रंग देणार होतो. मी ऑईल कलरने चाक छान रंगवत होतो, म्हणून पप्पांनी मला पूर्ण चाक रंगवायला दिले. मला खूप आनंद झाला. चाकावर रंगाचा ब्रश फिरवताना मला मज्जा येत होती. माझा सगळा जीव चाक रंगवण्यात गुंतला होता. संध्याकाळ होत आली. चाकाला दोन्ही बाजूने रंग देण्याचे माझे काम उरकलं. मी रंगवलेले चाक बघून मला घरातल्या सर्वांनी शाबासकी दिली.

काही दिवसानंतर गोठ्याचे बांधकाम पूर्ण झाले. गोठ्याला पत्रा बसवायला एक वेल्डिंगवाले काका आले. वेल्डिंगवाल्या काकांनी ते चाक गोठ्याला फिट केले. गोठ्याला फिट केलेले चाक खूप छान दिसत होते. या चाकाकडे पाहून मला आमच्या जुन्या बैलगाडीची आणि मी केलेल्या रंगकामाची आठवण येते.

- प्रज्वल धायगुडे, 6 वी,

..सो.वाघिरे विद्यालय, सासवड