मी चंद्र पाहिला होता

मी चंद्र पाहिला होता

शिक्षण विवेक    15-Jul-2023
Total Views |


मी चंद्र पाहिला होता

सायंकाळी रत तटावर कुणी मारवा छेडला होता

तमात नदीच्या उगवताना अन्‌‍ मी चंद्र पाहिला होता॥ धृ॥

निसटून चालला सुवर्णवर्ण निसटती बलाक माला

कमलदलाची कोमल दलदल दुःखहीन या दला

तरी कुमुदिनी हसती निरंतर कुमुदबान्धवा मुखरिता

तमात नदीच्या उगवताना अन्‌‍ मी चंद्र पाहिला होता॥1

रजनीरज रजरज नीरज राजरजनी रज स्त्रजताना

कर्णकोठरे कलकल कीट् कुटिल कीर नीजताना

रंगीत रंगीत गंधित-धुंदित गंध धुंद सांडला होता

तमात नदीच्या उगवताना अन्‌‍ मी चंद्र पाहिला होता॥2

पुढे पलिकडे पाराखाली बसणारा तो चांभार

मला ठाऊक असे त्याचा तो साराच कारभार

संध्या समयी खेळ घडीचा त्याने उरकला होता

तमात नदीच्या उगवताना अन्‌‍ मी चंद्र पाहिला होता॥3

ओजस ओजस मृग-पाडस विरस बागडे रिक्त रानी

आकाशात तो चकोरबन्धु पण प्रकटतो झणी क्षणी

समजून मयुखी क्षीर तयाने अश्म चाटला होता

तमात नदीच्या उगवताना अन्‌‍ मी चंद्र पाहिला होता॥4

कुणास ठाऊक कुण्या गात्राचे कातळ झाकोळले

कुणास ठाऊक कुण्या जत्रेचे तंबू दिसू लागले

मी तर मात्र समजून गेलो मिहीर बुडाला होता

तमात नदीच्या उगवताना अन्‌‍ मी चंद्र पाहिला होता॥5

- निखिल बिरमल, अध्यापक,

डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळा, टिळक रोड, पुणे