आषाढ संपताच चाहूल लागते, ती श्रावण मासाची. श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हटला जातो. मुसळधार पावसानंतर श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. त्यामुळे निसर्गही हिरवी चादर घेऊन मस्त ऊन-पावसात पहुडलेला असतो, त्यामुळे श्रावणात मुबलक प्रमाणात वेगवेगळ्या पालेभाज्या, बेलवर्गीय भाज्या, फळे उपलब्ध असतात. त्यामुळे गृहीणी आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. नव्या आहार पद्धतीचा प्रवास सुरु करण्याची सर्वात योग्य वेळ, श्रावण महिना असतो. संपूर्ण भारतात हिंदू धर्मीय लोक हा श्रावण महिना एक उत्सव म्हणूनच साजरा करतात.
मांसाहार, हा शब्दही वर्ज्य असतो या महिन्यात. का ते माहित आहे का, माझ्या बालमित्रांनो? श्रावण महिना हा पावसाळा ऋतुत येतो. मराठी महिन्यातील पाचवा महिना, या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. पावसाळ्यात वातावरण हे दमट, ओलसर असते. मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढायला सुरुवात होते. उन्हाळ्यात उष्णता सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाही. पावसाळ्यात त्यांची वाढ वेगाने होते. त्यामुळे या महिन्यात मांसाहार करणे म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण ठरते. तसेच पशु, पक्षी, मासेवर्गीय प्राण्यांचा हा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे पशु, पक्षी, मासे यांच्यात गर्भधारणेची संभावना असते. कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे, हे हिंदू धर्मात पाप मानले जाते. म्हणून मांसाहार वर्ज्य केले जाते.
श्रावणात उपवास करण्याचे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे, श्रावण महिना पावसाळ्यात येतो. शेतीची किंवा अन्य कामे बरीचशी झालेली असतात. पावसामुळे माणसे जास्त वेळ घरातच राहतात. खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. शरीराचे चलन वलन कमी होते. अशा वेळी हलका आहार आरोग्यासाठी लाभदायक असतो. म्हणून श्रावणात जास्त उपवास केले जातात. असा हा हलका फुलका, पवित्र, हरित, व्रत वैकल्याचा सण उत्सवांनी समृद्ध असा श्रावण महिना.
बाल दोस्तांनो उपलब्ध भाज्या, डाळी, इतर सकस अन्न यांचे सेवन करा. शरीर निरोगी ठेवा. कोणतीही कुरकुर न करत आपल्या आईने बनवलेले अन्न बिना तक्रार खावा. शाळेत आईने दिलेला डबा पूर्ण संपवा. तंदुरुस्त रहा. श्रावण मासाच्या आपणास हरित. आरोग्यदायी शुभेच्छा !
- गौरी घुगरे, 9 वी,
कन्याशाळा, सातारा