आभाळात ढगांची
दाटी झाली
अंधारून आले
सभोवताली
वाऱ्याने वाजवला
ताशा जोरात
तालावर नाचला
मोर जोशात
ढगांनी वाचला
पावसाचा पाढा
जमिनीवर पडला
गारांचा सडा
वीजबाई चमकून
पाहते खाली
झाडांना पाऊस
अंघोळ घाली
पावसाचे पाणी
वाहे खळखळ
मातीचा पसरे
चौफेर दरवळ
पावसामुळे झाली
बियांची पेरणी
साऱ्यांच्या ओठी
पावसाची गाणी
झाडे - वेली
हसली फुले
पाऊस झेलायला
आली मुले
- एकनाथ आव्हाड