खाऊगल्ली

खाऊगल्ली

शिक्षण विवेक    20-Jul-2023
Total Views |

खाऊ गल्ली

खरे तर गल्ली क्रिकेट, गल्लीबोळ, गल्लीत गोंधळ आणू हल्लीच्या गल्ली बॉय या शब्दांच्या भाऊगर्दीत अजून एका जिव्हाळ्याच्या विषय असणाऱ्या शब्दाची भर पडली आहे आणि ती म्हणजेच ‌‘खाऊ गल्ली.'

‌‘खाऊ गल्ली' म्हणजे खवय्ये लोकांचे स्वर्गच जणू!

जिभेचे चोचले पुरवण्याचे हक्काचे ठिकाण.

तसा खाऊ गल्ली हा प्रकार पुण्या-मुंबई आणि इतर राज्यांसाठी काही नवीन नाही. पूर्वीच्या काळी खाऊच्या टपऱ्यांचे एकत्रित संघटित आवृत्ती म्हणजेच ‌‘खाऊ गल्ली.'

‌‘खाऊ गल्ली' म्हणजे सुगंधित आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या निरनिराळ्या चविष्ट पदार्थांची रेलचेल असणारी मेजवानी! या खाऊ गल्लीत कुठे दक्षिण भारतीय लोकांचा पारंपरिक डोसा, मेदुवडा, इडली, अप्पम तर कुठे महाराष्ट्राचे पेटंट असणारा वडापाव, चटणी आणि सोबत तळलेल्या मिरच्या. कुठे बटरवर निवांत पोहणारे पाव आणि भाजीची जोडगोळी. तर कुठे डोळ्यांत पाणी आणणारी अस्सल तिखट मिसळ. न्याहारी म्हणून सोबत पोहे, उपीट, शिरा आणि उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे आहेतच! एवढेच नव्हे तर उत्तर भारतीय आणि ईशान्य भारतातील बांधवदेखील पाणीपुरी, भेळ, मोमोज, भुर्जी पाव, सँडविचेस, पिझ्झा असे भारतीय आणि परकीय पदार्थाची जुगलबंदी करताना दिसतात.

खाऊ गल्ली मध्ये प्रवेश करताना कधी कधी ‌‘स्वच्छता' आणि ‌‘अस्वास्थ्यकर' या दोन संकल्पनेकडे कानाडोळा केला जातो आणि मग आपल लाडके ‌‘पोटोबा' संपावर जाण्याची वेळ येते. अर्थातच डॉक्टरकडून-बाहेरचे काही खाण्यात आले होते का? असा यक्ष प्रश्न सोडवत आपसुकच आपली पावले या गल्लीकडे वळतात.

वाचक हो, खाऊ गल्ली हा आपल्या ‌‘खाद्य संस्कृती' आणि आपल्या आर्थिक व्यवस्थेचा अविभाज्य घटक असून, त्यावर आस्वाद घेणारे आणि ते चालवणारे दोघांचे पोट अवलंबून असते, कित्येक कुटुंब यावर आपला उदरनिर्वाह करत असतात.

तर मग चला, आपणही कधी ना कधी या खाऊ गल्लीत जाऊन, आपल्याला आवडत्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊन, आपल्या या ‌‘खाद्य संस्कृती'चे जतन करू या. पण आपले पोट जपूनच बरं का?

- कैलास दामामे, पालक,

दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा