
विविध राज्यात, देशात, जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळते. कुठे फाफडा, इडली-सांबर, कुठे पेढे, कुठे डाळवाटी, तर कुठे झुणका भाकर. असे एक ना अनेक पदार्थ काही किलोमीटरच्या अंतरावर आपणास बघायला मिळतात. त्याची चव आपल्याला घेता येते आणि मग तेच पदार्थ त्या त्या ठिकाणी अगदी नावाजून जातात. असाच आपला विदर्भ. विदर्भामध्ये अनेक गावात अनेक वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळतात. पण काही गोष्टी अशा आहेत की, अजून काहींना याची माहिती नसावी म्हणून मी ते पदार्थ कोणते आणि कसे तयार होतात, यासंबंधी थोडे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी पस्तीस चाळीस वर्षांपासून मला हे प्रकर्षाने लक्षात आले की, वाळवण ते कसे? तर काही शहरात गावात उन्हाळ्यात भाज्यांचा तुटवडा असतो. म्हणजे काही ठिकाणी भाज्या मिळतही नाहीत. त्यासाठी हिवाळ्यातच वाळवण करून ठेवतात. ते वाळवण कशाकशाचे असते? तर वांगी, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, दहीमिरची आणि शेरनी. हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात असतात. जेवढ्या विकता येतील, तेवढ्या विकल्या जातात आणि काही फळभाज्या या उरतात. काही लोक स्वस्त दरात वरील भाज्या घेऊन वाळवण करतात. वांगी कापून त्याच्या फोडी करणे, परड्यामध्ये त्या एकेक फोड अगदी जवळजवळ ठेवणे आणि त्यावर बारीक मीठ घालणे. मीठ कशासाठी तर त्या फोडी खराब होऊ नये म्हणून वांगी-टोमॅटो यांच्या वाळवणाला ‘खुला' असे म्हणतात. मेथी, कोथिंबिरीचे कडक वाळवण झाले असले तरी, ते वाळवण पाण्यात टाकले की, मऊ होते आणि डाळीचे पीठ लावून पिठलं तयार करतात किंवा त्यात कांदा मिरची घालून सुकी भाजी करतात. वांग्याच्या खुलांची भाजी, आपण ज्या ताज्या वांग्याची भाजी करतो. त्यापेक्षाही दुप्पट चवीची भाजी खुलांची होते. तसेच टोमॅटोच्या खुला हलक्या गरम तेलात तळायच्या आणि त्या जेवणासोबत खायच्या अगदी कुरकुरीत. शेरनी एक काकडीसारखं पण छोट्या आकाराचं फळ, तेही असंच वाळवून तळून खातात. दहीमिरची हिवाळ्यामध्ये दूध दुपते पण छान असते आणि मिरच्यासुद्धा स्वस्त असतात, त्यामुळे हिरव्या मिरचीमध्ये एक मोठी काप करतात आणि दही किंवा ताक यामध्ये योग्य ते मीठ घालून दोन दिवस त्या मिरच्या भिजत ठेवतात. दोन दिवसांनी त्या मिरच्या ताकातून काढतात, वाळत घालतात. परत संध्याकाळी त्याच ताकात रात्रभर मिरच्या ठेवतात. दुसऱ्या दिवशी परत वाळत घालतात. असे दही/ताक संपेपर्यंत करतात आणि ते संपले की, मिरच्या कडक वाळवून घेतात. हलक्या गरम तेलात तळून त्या जेवणासोबत खातात. वरील सगळे वाळवण पदार्थ खुला किंवा दहीमिरची या दोन दोन वर्षे त्याला काहीही होत नाही. शिवाय अतिशय रुचकर लागतात. अशा प्रकारे त्याचा उपयोग होतो. असे एक ना अनेक प्रकारांची आपल्या संपूर्ण भारतातच खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळते. जेथे जावे तेथे रुचकर पदार्थ खायला मिळत असतात. तसेच रोजच्या जेवणामध्ये कढी-भात-गोळा असेही विदर्भातलं एक छान खाणं आहे. भात अर्धा शिजल्यानंतर त्यावर डाळीच्या पिठात तिखट मीठ हळद घालून गोळे करून त्या भातावर पाणी असतानाच शिजवतात. त्यानंतर सोबत मस्तपैकी गरम कढी आणि लाल मिरच्या तळून त्या हाताने कुसकरून मिरच्याची चटणी आणि ज्वारीचे कोळशावर भाजलेले पापड. असा खाद्यपदार्थ विदर्भामध्ये नेहमीच जेवणामध्ये आढळतो.
शिक्षणविवेकच्या या विषयामुळे परत खाद्यपदार्थांकडे प्रकर्षाने लक्ष गेलं आणि लिहिताना अनेक आठवणी ताज्या झाल्या.
- साधना फडणीस, शिक्षिका
कै.वा.दि.वैद्य मुलींची प्राथमिक शाळा