मन्नो

चला वाचू या, गाऊ या, चित्र रंगवू या

शिक्षण विवेक    26-Jul-2023
Total Views |
 
मन्नो
मन्नो - चला वाचू या, गाऊ या, चित्र रंगवू या
डॉ. आर्या जोशी
प्राथमिक गटासाठी
मन्नो हे एक गोष्टीचं पुस्तक आहे. नाही नाही ते एक कवितेचं पुस्तक आहे. मुळीच नाही. ते तर एक चित्राचं पुस्तक आहे. अरेच्चा! काय आहे काय हे नक्की!!!
छोट्या दोस्तांनो, असे गोंधळून जाऊ नका बरं का! या एकाच पुस्तकात तुम्हाला तीन गमती दिसतील. यात मन्नो नावाची एक छोटी मुलगी आहे. अशी मुलगी मोठ्या शहरात पण असते आणि छोट्याशा गावात पण. तिला नाचायला आवडतं, खेळायला आवडतं आणि खोड्या करायला पण आवडतात. तिची दोस्ती होते सगळ्यांशी... म्हणजे कुणाकुणाशी? माऊशी, भूभूशी, ढगाशी, झाडाशी आणि पावसाशी सुद्धा! हीच दोस्ती कधी आपण गोष्टीत वाचतो तर कधी छोट्या छोट्या कवितेतून... या कविता पण तुमच्यासारख्याच अगदी गोड गोड आहेत. यात पावसाची गोष्ट आहे आणि पावसाच्या कवितासुद्धा..
ढमढम ढोल वाजला ढगात,
छमछम पाऊस नाचला अंगणात...
किंवा
माळावर घुमली वार्‍याची बासरी,
खुळखुळ वाजली नदी धावरी..
अशा या चार ओळींच्या कविता मस्तच आहेत.
तुम्हाला पावसात भिजायला आवडतं ना? तसं मन्नोलाही आवडतं. पाऊस गोष्ट वाचताना आपल्याला भेटतो सूर्य, मोर, खिडकी, बेडूक दादा, गाय, नागोबा, घरट्यात बसलेले पक्षी आणि पिले आणि गाणे म्हणणारे गाढवसुद्धा!
आणि यांची चित्रे पण इतकी गोंडस आहेत की ती तुम्ही रंगवा असं या पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानावर म्हणजे मुखपृष्ठावरच सांगितलं आहे.
तुमच्या भूगोलाच्या पुस्तकात किंवा परिसर अभ्यास विषयात तुम्हाला भूरूपे आहेत का अभ्यासाला? म्हणजे दरी, डोंगर, बेट आणि तुम्हाला कोकण आणि देश या प्रदेशांबद्दल काही माहिती आहे का? कोकण आणि देश या दोन ठिकाणांचा फरक हे पुस्तक सांगते आणि तेही कंटाळा न येता नाचत, गात. कोकणात पाऊस कसा पडतो, देशावर कसा पडतो. मुळात पावसाचे पाणी कसे तयार होते, हे सगळं वर्णन या पुस्तकात आहे.
तुम्हाला सर्वांना कुणाशीही गप्पा मारायला आवडतं हे मला माहिती आहे. गावात राहणारी मन्नो आणि तिचे दोस्त झाडाशी, गोगलगाईशी गप्पा मारतात. चिखलात त्यांच्याबरोबर दंगा करतात आणि पावसाची मजा लुटतात.
शहरात जी मन्नो राहते, तिला मात्र आई असं पावसात मनसोक्त भिजू देत नाही. मग तिला टि.व्ही.वर किंवा पुस्तकात पाहून पावसाची माहिती घ्यावी लागते.
या पुस्तकात मन्नो आणि झाडदादा यांच्या गप्पांची मैफल मस्त जमून आली आहे. ती मात्र तुम्ही स्वतः वाचा बरं का! मज्जा येईल तुम्हाला खूप.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन ऋतू पण या पुस्तकात भेटतात.
उंच झाडावरून बर्फ किसत
आकाशबाबा बसतो आईसकांडी बनवत..
गिरक्या घेत थेंब टपटपले
पानांच्या घसरगुंडीवर घसरले...
अशी गाणी म्हणत मन्नो आणि आपण पुढे पुस्तक वाचत राहतो आणि भेट घडते टोपीवाला आणि माकडांच्या गोष्टीची. आवडते ना ही गोष्ट तुम्हाला? मन्नोला पण ही गोष्ट माहिती आहे, पण तरीही तिचा मित्र ढगदादाकडे तिने हट्ट केला आणि त्याने ही गोष्ट तिला परत सांगितली.
मन्नो तू आता एक झाड लावायचं आहेस हं! मन्नोला या दोघांनी खूप छानपैकी झाड लावायला प्रोत्साहन दिले आहे.
हे पुस्तक तुम्हाला आवडतील अशा आणखी छान-छान गोष्टी करायला सुचवते. मला तर त्या आयडिया खूप आवडल्या आहेत. तुम्ही हे पुस्तक वाचला तर तुम्हालाही समजतील त्या आयडिया!
तुम्हाला असे प्रश्न पडतात का रे?
थंडी वाजते गार गार हवेत
पण वाजण्याचा कधी आवाज नाही येत?
आकाशातले दिवे, रोज कोण लावतं?
चालू-बंद करायचं, बटण कुठे असतं?
तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असतील तर मला सांगा आणि नसतील तर मन्नोबरोबर तुम्हीही या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि मला कळवा.
चला तर मग..
मन्नोला भेटू, गोष्टी ऐकू,
चित्र रंगवू आणि धमाल करू...
पुस्तकाचे नाव- मन्नो
लेखिका- मंजुषा आमडेकर
प्रकाशक- मनस्वी शब्द फीचर्स अँड पब्लिशर्स
किंमत रू 20/- ( पहिली आवृत्ती 2002)