माझी आदर्श शाळा!

माझी आदर्श शाळा!

शिक्षण विवेक    01-Aug-2023
Total Views |

माझी आदर्श शाळा!
ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा,
संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा,
व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा,
मौज-मस्तीचा वेगळाच थाट म्हणजे शाळा!
खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते, कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मूल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच. म्हणूनच शाळेचे महत्त्व लहान मुलाच्या जीवनात फार मोठे असते.
माझी शाळा ही मंदिरासारखी आहे. जिथे आपण विद्येचे ज्ञान घेण्यासाठी जातो. जिथे मुले शिकून सुसंस्कृत आणि सभ्य नागरिक होतात. कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील मुले आणि ही संपत्ती शाळेतच ठेवलेली असते.
प्रत्येक मुलाला घडवण्यामागे आई-वडिलांचा जितका वाटा असतो, तितकाच शाळेचाही असतो. मला घडवण्यामागे ही माझ्या शाळेचा वाटा आहे.
माझ्या शाळेची शिशुविहार प्राथमिक शाळा आहे ती एरंडवणा शाखेत स्थित असून 14 जून 1972 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. त्यांनी स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला. त्यांना या कामासाठी भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला. मी खूप भाग्यवान आहे. मी अण्णांनी स्थापन केलेल्या शाळेत शिकते.
माझ्या शाळेत 1 ते 7 वर्ग आहेत. सर्व वर्ग हवेशीर आणि टापटीप असतात. शाळेची इमारत खूप प्रशस्त आहे. शाळेचा परिसर खूप मोठा आणि स्वच्छ आहे. त्याचबरोबर हवेशीर आणि रमणीय आहे.
माझ्या शाळेत मुलांना आल्यावर प्रसन्न वाटावे म्हणून आनंदी वाटिका आहे. वाटिकेत फूलझाडे, औषधी वनस्पती, शोभेची झाडे, फुलपाखरू उद्यान आणि कारंजे आहे. त्याचबरोबर मला आवडणारे फणसाचे झाड आहे. माझ्या शाळेत वाचनालय आहे. जिथे विविध प्रकारची, विविध भाषेतील पुस्तके आहेत. माझ्या शाळेत विज्ञानखोली, संगणक कक्ष, स्वच्छतागृह, दोन मोठी मैदाने आहेत, तिथे आम्ही वेगवेगळे खेळ शिकतो. अशी माझी शाळा भव्य आणि सुंदर आहे.
माझ्या शाळेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे माझ्या शाळेत सतत वेगवेगळे कार्यक्रम वेगळ्या स्पर्धा चालू असतात. त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या शाळेतून विद्यार्थी येतात. या आधी आम्ही विद्यार्थी दुसर्‍या शाळेत स्पर्धेसाठी जायचो, पण आता आमच्या स्पर्धेसाठी दुसर्‍या शाळेतून विद्यार्थी येतात. हे पाहून खूप आनंद होतो आणि आमच्या शाळेचा आम्हा मुलांना खूप अभिमान वाटतो. आम्ही शाळा संपून कॉलेजला गेलो किंवा शिक्षण संपून नोकरीला लागलो तरी आमची सुंदर शाळा आम्ही कधीच विसरणार नाही.
माझ्या शाळेत शिक्षकांना हाक मारण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. अनेक शाळेतून शिक्षकांना मॅम, मॅडम, मिस्, बाई इ. शब्दांनी हाक मारतात, पण माझ्या शाळेत शिक्षकांना ताई म्हणायला खूप आवडते. कारण दुसर्‍या शाळेपेक्षा माझ्या शाळेत शिक्षकांना हाक मारण्याची पद्धत वेगळी आहे आणि हे जर कुणाला सांगितले की, ते लोक म्हणतात तुमची शाळा ओल्ड फॅशन आहे. काही लोक तर शिशुविहार या नावाला सुद्धा हसतात. पण त्या न्यू फॅशन शाळेतील विद्यार्थांवर होणार्‍या संस्कारांपेक्षा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांवर संस्कार होतात न त्याच्यात खूप फरक आहे आणि इंग्लिश मिडिअमच्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा मिळतात ना तितक्याच सोयीसुविधा आम्हांला आमच्या सेमी इंग्लिश प्रेरित करतात. आई जसे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करते, चांगल्या गोष्टी सांगते, तसेच आमचे शिक्षक सांगतात. त्या प्रत्येक मुलावर आईप्रमाणे प्रेम करतात. म्हणून मला माझी शाळा खूप आवडते. -
माझ्या शाळेच्या विविध वैशिष्ट्यांमुळे, शिक्षकांमुळे, मुख्याध्यापिका ताईंमुळे, विद्यार्थ्यांमुळे माझी शाळा ‘आदर्श शाळा’ आहे, असे मला वाटते. मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो, कारण माझी शाळा फक्त शिकवण्याचे काम करत नाही, तर आम्हां मुलांवर उत्तम संस्कारही करते. मला माझी शाळा दुसरे घर वाटते. मी माझ्या शाळेचा आदर करते आणि मला वाटते,
“कधी नसावी सुट्टी मजला,
न यावा कधी उन्हाळा,
अशी असावी माझी शाळा,
यावा न मजला कंटाळा!”
 
- संकष्टी संतोष पांगारे
शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणे