छान कविता सादर करणार्याला चॉकलेट... : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील परिषद
शिक्षणविवेकचा 11वा वर्धापनदिन आणि काव्य अभिवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
पुणे : मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, शिक्षकांना त्याविषयी प्रशिक्षण दिले जात आहे. या शिक्षणपद्धतीत मुलांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिक्षणविवेकचा 11वा वर्धापनदिन आणि काव्य अभिवाचन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी काव्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वप्राथमिक ते माध्यमिक आणि शिक्षक, पालक असे गट स्पर्धेत सहभागी झाले होते. विविध गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत 400 गटांचा सहभाग होता, तर 229 वैयक्तिक सादरीकरणे अशी स्पर्धेची व्यापकता होती, अशी माहिती डॉ. अर्चना कुडतरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
शिक्षणविवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य वैशाली पोतदार, कवी अनंत भावे, कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, स्पर्धेचे परीक्षक मा. अद्वैता अमराणीकर, मा. अतुल कुलकर्णी, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिक्षणविवेकच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता पहिली पूर्वीची तीन वर्षे आणि इयत्ता पहिली नंतरची चार वर्षे या कालावधीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाचे त्यांच्यावर संस्कार होत असतात. त्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले. म्हणूनच काव्य अभिवाचन स्पर्धा घेऊन एक उत्तम उपक्रम राबवला असल्याबद्दल चंद्रकांतदादांनी शिक्षणविवेकचे अभिनंदन केले.
विविध माध्यमातून घेण्यात येणार्या लहान मुलांच्या स्पर्धेत प्रौढांची गाणी गाऊन घेतली जातात, याबाबत खंत वाटते असे सांगून डॉ. नीलिमा गुंडी यांनी त्याऐवजी त्यांना बालकविता म्हणण्यास उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लहानपणी मुलांच्या मनात जे बीज रुजते त्याच बीजाचं वृक्ष होतं, त्यामुळे लहान वयातच मुलांमध्ये उत्तम साहित्याची गोडी निर्माण करावी, अशी अपेक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केली. पहिली कविता कशी स्फुरली, याविषयी त्यांनी आठवणी जागविल्या. अनंत भावे यांनी कविता सादर करत मुलांकडून त्या सामूहिकपणे गाऊन घेतल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालक गटातील प्राजक्ता यावलकर, उत्कर्षा मुळगुंद, सौम्या कुलकर्णी यांनी कवितेचे अभिवाचन केले. ‘आजीची कविता’ या कवितेने उपस्थितांची वाहवा मिळवली. न्या. रानडे बालक मंदिरातील विद्यार्थी अर्णव वाळिंबे याने सादरीकरण केलेल्या ‘मुंगीबाय मुंगीबाय’ या कवितेचे कौतुक करून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याला चॉकलेटची भेट दिली.