हर घर तिरंगा

हर घर तिरंगा

शिक्षण विवेक    18-Aug-2023
Total Views |

हर घर तिरंगा
‘झंडा ऊँचा रहे हमारा,
विजयी विश्‍व तिरंगा प्यारा’
प्रत्येक राष्ट्राचे एक प्रतीक हा त्या राष्ट्राचा झेंडा, ध्वज असतो. आपल्या राष्ट्राचे प्रतीक, आपला राष्ट्रध्वज हा आपला तिरंगा आहे. हा तिरंगा आपल्या देशाची शान, बान आणि अभिमान आहे. या तिरंग्यासाठी बऱ्याच वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या  तिरंग्याचा सन्मान वाढवला. आपल्या राष्ट्रध्वजाला ‘तिरंगा’ म्हणून संबोधले जाते, याचे कारण म्हणजे यामध्ये असणारे तीन रंग. ‘वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली शोभे हिरवा, प्रगतीचे हे निळे अशोक चक्र मधल्या पांढर्‍यावर शोभे बरवा।
हे तिन्ही रंग आपल्याला काही ना काही सुचित करतात. केशरी रंग हे त्याग आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी म्हणजेच स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे कार्य घडले, लोकांनी जे बलिदान केले त्यांच्या शौर्याचे , त्यागाचे प्रतीक म्हणजे हा केशरी रंग.
मध्यभागी असणारा पांढरा रंग हा शांतता, सत्य आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि सर्व धर्म, सर्व पंथीय लोक येथे एकत्र शांततेने, सुखाने आनंदाने नांदत आहेत. तसेच शेवटी असणारा ‘हिरवा रंग हा समृद्धीचे, निसर्गाचे आणि हरित क्रांतीचे हे प्रतीक आहे. या तिरंगयामध्ये मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र प्रगतीचे प्रतीक आहे. अशोक चक्रामध्ये एकूण 24 आरे आहेत, हे आरे व्यक्तीला जीवनामध्ये जगण्यास आवश्यक असणाऱ्या क्षमता मार्गदर्शन करतात. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ फडकवायचा आहे.
यामागचा उद्देश म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या राष्ट्रविषयी असणारे प्रेम वृद्धिंगत करणे. आपल्या देशाप्रती असणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देणे. प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेम जागृत करणे. देश सेवेसाठी एक धाडसी, देश प्रेमी पिढी तयार करणे. चला तर मग आपण सर्व या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या तिरंगयाचा सन्मान वाढवू आणि देशाप्रती आपली निष्ठा व प्रेम जागवू.
‘तिरंगा आमची शान,
तिरंगा आमची जान,
सदैव तयार आम्ही तिरंग्यासाठी,
करण्या बलिदान...’
जय हिंद!!
- झोया अत्तर,
एस.पी.एम.इंग्लिश मिडीयम स्कूल, परशुराम