माझा पहिला पदार्थ कोथिंबीरवडी

माझा पहिला पदार्थ कोथिंबीरवडी

शिक्षण विवेक    25-Aug-2023
Total Views |


माझा पहिला पदार्थ कोथिंबीरवडी

प्रसंग काही दिवसांपूर्वीचा आहे. माझ्या मामाच्या गावी काहीतरी कार्यक्रम असल्या कारणाने माझे आई-बाबा आणि लहान भाऊ तिकडेच गेले होते. घरी फक्त मी, दीदी आणि माझी आजी आम्ही तिघीच जणी होतो. आजीची तब्येत जरा बरी नव्हती. म्हणून स्वयंपाक मला आणि माझ्या दीदीलाच करायचा होता. रोजचाच वरणभात, भाजी-पोळी खाण्याचा तर कंटाळा आलाच होता. पण त्यापेक्षाही भारी करण्याचा कंटाळा आला होता. आजीला थोडी खिचडी करून दिली, आजीने खिचडी खाल्ली आणि आजी झोपी गेली. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे आता आमच्या जेवणाचं काय? आम्ही आमच्या मनाच्या मालक होतो. आज कोणी बंधन घालणार नव्हतं. आज आम्हांला पाहिजे ते आम्ही करून खाऊ शकत होतो. मग आमच्या दोघींमध्ये गहन चर्चा झाल्यावर कोथिंबीरवडी खाण्याची दोघींची इच्छा आहे, असा निष्कर्ष निघाला. ठरलं तर मग! कोथिंबीरवडी करायची आहे. पण पाककृती नेमकी काय आहे? हे दोघींनाही माहीत नव्हतं.मग काय मोबाईल काढला आणि त्यावर रेसिपी बघितली आणि आम्ही कामाला लागलो. आधी आलेला कंटाळा हा आता द्विगुणीत उत्साहामध्ये रूपांतरित झालेला होता. कोथिंबीर वडी करता करता आम्ही दोघींनी सगळ्या स्वयंपाक घरात नुसता राडा करून ठेवला होता. अखेर आमची कोथिंबीरवडी तयार झाली. त्या वड्यांची चव मला अजूनही आठवते. अगदी खमंग आणि खुसखुशीत झाल्या होत्या. एका क्षणासाठी तर विश्वासच बसत नव्हता की, ह्या वड्या नक्की मीच केल्या आहेत ना? इतक्या चविष्ट झाल्या होत्या त्या! मी केलेल्या प्रयत्नात मी यशस्वी झाले होते. अटकेपार झेंडा लावल्याचा आनंद मला होत होता. राम रावणाला हरवून सीतासवे पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत येत असताना, त्यांना जेवढा आनंद झाला नसेल, तेवढा आनंद मला होत होता. अशा प्रकारे एखादा नवीन पदार्थ करून पाहण्याचा हा माझा अनुभव!

- राधिका जोशी, 10 वी,

श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव.