“घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती
या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेउनि शक्ती
आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती.”
वरील काव्य पंक्तीप्रमाणे यशोदाचेही घर म्हणजे मोठा वाडा होता. वाड्याच्या समोरील अंगणात आंबा, फणस, पेरू, पपई, रामफळ यांसारखी फळझाडे आणि गुलाब, मोगरा, पांढरा चाफा, जास्वंद यांसारखी फुलझाडे होती. वाड्याच्या मागील बाजूस म्हणजेच परसदारी केळी, पपई यांची झाडे होती. वाड्याच्या भोवताली मोठंमोठी झाडं असल्यामुळे सदैव हवेत गारवा असायचा आणि झाडांवर पक्ष्यांचा सदैव किलबिलाट. यशोदाला कधीही पहाटे उठण्यासाठी घड्याळ्याच्या गजराची गरज पडली नाही. कारण पहाट होताच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू व्हायचा आणि डोळे आपोआप उघडले जायचे आणि सडासारवणापासून यशोदाचा दिवस सुरू व्हायचा आणि सांजवेळी शुभंकरोतीने संपायचा.
भलामोठा वाडा असल्यामुळे वाड्यात कोणतीही वस्तू कुठेही ठेवलेली असली, तरी ती कोणी उचलून नेईल याची अजिबात भीती नसायची. कारण वाड्याच्या कुटुंबातीलच एक सदस्य म्हणजे आमचा मोती कुत्रा. मोत्यामुळे कोणी आमच्या वाड्याकडे चुकूनसुद्धा वाकडी नजर करायची हिंमत करायचे नाही आणि चुकून एकदा अनोळखी पाहुणा आला तर, मोत्या भुंकूनभुंकून घर डोक्यावर घ्यायचा. मग आम्ही आपोआप समजून घ्यायचो की, कोणीतरी अनोखा पाहुणा आला आहे. मोत्याच्या जोडीला दुसरी आमची घरातील सदस्य म्हणजे आमची मनीमाऊ, पांढर्या शुभ्र रंगांची. तीदेखील आमच्या घराचं, आम्हा सर्वांचं रक्षण करायची बरं का? वाड्याभोवती मोठमोठी झाडं, झुडपं यांची गर्दी असल्यामुळे साप, विंचू यांसारखे प्राणी अधूनमधून फिरायचे, पण मनीपुढे त्यांचे काहीही चालायचे नाही. शिवाय मोत्याही असायचा मनीच्या जोडीला. एखादा साप चुकून जरी पक्ष्यांच्या नजरेस पडला की, ते एकसारखे किलबिलाट करत राहायचे. मग आपण समजून जायचे काहीतरी अंगणात आलंय बरं का?
प्राण्यापक्ष्यांखेरीज यशोदाचा खूप मोठा गोतावळा होता. कुटुंबातल्या व्यक्तीखेरीज यशोदाने खूप माणसे जोडलेली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर संपूर्ण वाडा गजबजून जात. घरात माणसांची रेलचेल तर झाडांवर पक्ष्रांची किलबिल, आंबा, फणस उन्हाळ्यात पिकायला लागले की, खारूताई आपल्या इवल्याइवल्या दातांनी आंबा कुरतडून खायची. याखेरीज वटवागुळदेखील रात्री फळांचा आस्वाद घ्यायला यायचे बरं का?
पण यशोदा माईचे सासरे, बाजीराव अतिशय युक्तीबाज. त्यांनी फळांचे संरक्षण करण्यासाठी चक्क दोरीच्या सहाय्याने झाडावर भलीमोठी दोरी लटकवली आणि तिची सूत्रे शेठ बाजीरावांच्या हातात. पक्ष्यांची चाहूल लागताच बाजीराव दोरी ओढायचे आणि डब्याचा आवाज व्हायचा. मग पक्षी उडून जायचे. यशोदामाई मात्र कायम म्हणायची अहो, बाबा खाऊ द्या त्या पक्ष्यांना. यशोदामाईच्या भल्यामोठ्या वाड्यासमोरील अंगणात लाकडी झोपाळा होता. यशोदामाईचे पती श्रीरंगराव सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी शेतातून आल्यावर, झोपाळ्यावर तास दोन तास निवांत बसायचे आणि येणार्या जाणार्याची आपुलकीने चौकशी करायचे. अडल्यानडल्याची गरज जाणून घ्यायचे आणि त्याप्रमाणे त्यांना मदत देखील करायचे. त्यामुळे यशोदामाई आणि श्रीरंगराव यांना समाजात मान होता.
यशोदामाईंना दोन मुली आणि दोन मुलगे होते. मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या, मोठा मुलगा व सूनबाई नोकरीनिमित्ताने शहराच्या ठिकाणी स्थानिक झाले होते. धाकटा मुलगा शेती कामात मदत करायचा, म्हणून तो आणि त्याचे कुटूंब यशोदामाईंच्या जवळच राहत होते. भरपूर शेती असल्यामुळे यशोदामाई आणि श्रीरंगरावांचे कुटूंब सुखी होते. शेतीवाडीमुळे अनेक नोकरचाकर माणसांचा राबता असायचा. त्यामुळे घरात कायम गजबज असायची. शेतात काम करणार्या नोकरचाकरांना त्यांनी कधी नोकरासारखं वागवलं नाही. जणू काही ती सर्व त्यांच्या कुटूंबांचाच एक भाग होती. त्यामुळे त्यांचा गोतावळा खूप मोठा होता. यशोदामाईचा वाडा म्हणजे एक अनोख नंदनवन होतं.
- आश्विनी बिडकर
आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा, पुणे