“वंदन करू या टिळकांना
जमली ही नू.म.वि.सेना
स्तुतीसुमने ही अध्यक्षांना
आज सभा अंगणा”
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. ज्याप्रमाणे चिखलातून कमळ उगवते आणि आपल्या सुगंधाने सर्व परिसर दरवळून टाकते. त्याच प्रमाणे लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वाचा सुगंध भारतभर पसरला. सूर्याचे तेज, मेघाचे गांभीर्य, हिमालयाची उत्तुंगता, सागराची विशालता या सर्व गुणांचा सुरेख संगम म्हणजे ‘बाळ गंगाधर टिळक’ होय. आपल्या भारतमातेला इंग्रजांच्या जुलामगिरीतून स्वतंत्र करण्यासाठी टिळकांनी आयुष्यभर संघर्ष केला.
लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील एक गोष्ट आज मी तुम्हांला सांगणार आहे. बळवंत टिळकांना एक वर्तमानपत्र सुरू करायचे होते. वर्तमानपत्राचे नाव काय ठेवावे? या चर्चेसाठी टिळक आणि त्यांचे मित्र एका खोलीत जमले. कुणी म्हटले ‘विराट’, तर कुणी म्हटले ‘विशाखा’. पण बळवंत टिळकांना एकही नाव पसंत पडेना. चर्चा संपली आणि बळवंतराव टिळक आपल्या खोलीत येरझार्या घालू लागले. तेवढ्यात दारात कोणीतरी येऊन म्हणाले, ‘अहो बळवंतराव, ‘केसरी’ हे नाव कसे वाटते?’ बळवंतराव येरझार्या घालताना थबकले आणि आनंदाने म्हणाले, ‘हो! केसरी हेच नाव उत्तम आहे. आजचे राज्यकर्ते माजलेल्या हत्तीप्रमाणे मन:पूत वागत आहेत. त्यांना वठणीवर आणायला केसरीचीच गर्जना हवी. तर ठरलं ‘केसरी’ या नावाने वृत्तपत्र तयार सुरू करायचे.’ अशा प्रकारे केसरी या वर्तमानपत्राचा जन्म झाला. याच वर्तमानपत्रातून टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे.’ राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, असे जळजळीत लेख लिहिले.
अशा टिळकांना माझे शतश: प्रणाम!
जय हिंद! जय भारत!
भारत माता की जय!
- विराज पळसकर,
नू.म.वि शाळा, पुणे