मृद्गंध

मृद्गंध

शिक्षण विवेक    08-Sep-2023
Total Views |

मृद्गंध
“रोहनऽऽऽऽ काय रे रोज कपडे मळवून येतोस. अरे, तुझे शर्ट घासून घासून हाताला घट्टे पडले माझ्या. सारख्या कशा मारामार्‍या होतात तुझ्या? आता असा उभा राहू नको शुंभासारखा. जा हात पाय धुवून घे. बाबांनी तुझा हा अवतार पाहिला तर फटके खाशील नेहमीसारखा. एवढा मार खातोस पण डोळ्यांत टिपूस नसतं तुझ्या. कोडगा झाला आहेस अगदी.” आईचा आरडाओरडा ऐकून रोहन मुकाट्याने आत गेला. रोज संध्याकाळी शाळेतून घरी आल्याआल्या आईचा आणि रोहनचा हा ठरलेला संवाद असायचा. शब्द बदलले तरी शब्दांमधून व्यक्त होणारी त्याच्याबद्दलच्या रागाची तीव्रता तीच असायची. “रिया बाळा, तू दादासारखं वागू नकोस हं! शहाण्यासारखं वागायचं. छान अभ्यास करायचा. पहिला नंबर मिळवायचा. दादासारखा रोज मार खायचा नाही आईबाबांचा.” रोहनला फार वाईट वाटायचं बाबांचं असं बोलणं ऐकून. खरं तर चिमुकल्या रियाला घेऊन आई घरी आली, तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. जणू काही त्याला एक मैत्रीण मिळाली होती. जेव्हा आई कामात असायची, तेव्हा रियाला खेळवता खेळवता तो सगळं विसरून जायचा. रोहनला बाबा फटके द्यायला लागले की, रिया डोळे विस्फारून बघत बसे. अलीकडे रोहन तिच्याजवळ गेला की, ती रोहनला थडाथड मारू लागली. दादाला मारणे हा रियाचा एक नवीनच खेळ होऊन बसला होता. रोहन केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघू लागला की, ती हसत खिदळत असे. तिच्या चेहर्‍यावरचे ते निष्पाप हसू पाहून रोहन तिचे तोंडावर, गालावर मारणे सहन करे. “दादा ऽऽऽ दादा ऽऽऽऽ चल नं आपण खेळू या. दादा ऽऽऽ” रियाला रोहनवर सोपवून आईबाबा एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. “चल रिया. काय खेळू या?” रोहन अभ्यास सोडून पळतपळत तिच्याकडे आला. “चल तू माझा घोडा. मी बसू घोड्यावर? चल चल वाक नं.” “हो गं बाई वाकतो. चल बस” रोहन रियासाठी काहीही करायला तयार असायचा. “रिया मारू नको गं. लागतंय मला. आऽऽ आऽऽ” रोहन कळवळून रियाला सांगत होता आणि रिया मात्र हसत खिदळत “चल रे घोड्या थांबलास का?” असं म्हणत त्याला अजूनच मारत होती. शेवटी सहन न होऊन रोहन धावतधावत त्याच्या खोलीत गेला. दादा दादा म्हणत रिया पण त्याच्यामागे गेली. “अंऽऽ अंऽऽऽ” रोहनला रडू आवरत नव्हतं आणि आपला लाडका दादा असा ओक्साबोक्षी रडतोय हे बघून छोटी रिया हवालदिल झाली होती. “दादा काय झालं रे? तू तर कधीच रडत नाहीस. दादा तू का रडतोयस? थांब मी तुझे डोळे पुसते.” असं म्हणत रियाने आपल्या छोट्या छोट्या हातांनी रोहनचे डोळे पुसायला सुरुवात केली. रोहनने रियाला जवळ घेतलं पण तरी तो रडतच होता. “दादा तू का रडतोयस. सांग ना रे!” “ रियू तुला नाही कळणार गं मी सांगितलं तरी. अगं आईबाबा मला मारतात, बोलतात. कधीकधी माझं चुकलेलं पण नसतं तरी मला ओरडतात. मला थोडे जरी मार्क कमी पडले तरी त्यांना राग येतो, पण मला आता त्याची सवय झालीय गं. मला आता रडायला पण येत नाही त्याच्यासाठी. पण तू घरी आलीस नं तेव्हा मला वाटलं तू माझा आधार होशील. आईबाबांना सांगशील माझ्या दादाला मारू नका, सारखंसारखं ओरडू नका. पण त्यांचं बघून बघून तू पण मला मारायला लागलीस. मला खूप वाईट वाटतं गं रियू तू मला मारतेस तेव्हा.” रियू आश्‍चर्याने दादाकडे पहात होती. “दादा मी मारलं की, तुला वाईट वाटतं हे मला माहितीच नव्हतं. मी आता तुला कधीच मारणार नाही. शप्पथ. माझ्या टेडीची शप्पथ. खरंच.” रियाच्या डोळ्यांतूनही आता गंगायमुना वाहायला लागल्या. रोहनच्या मनात मात्र त्या कोवळ्या अश्रूंनी मायेचा मृद्गंध दरवळू लागला.
 
- स्वाती देवळे
976704912