नुक्कड साहित्य आणि बालसाहित्य संमेलनात वैविध्यपूर्ण कार्यक्रम….

शिक्षण विवेक    30-Dec-2024
Total Views |


नुक्कड साहित्य संमेलन आणि बालसाहित्य संमेलन २०२५ 

 

नुक्कड साहित्य आणि बालसाहित्य संमेलनात वैविध्यपूर्ण कार्यक्रम….

'विवेक साहित्य मंच', 'विवेक व्यासपीठ', 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी', 'विदिशा विचार मंच', 'युवाविवेक', 'पुणे मराठी ग्रंथालय', 'श्री मुकूंद भवन ट्रस्ट' आणि 'शिक्षण विवेक' यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी नुक्कड साहित्य संमेलन तर, रविवार, दि. ५ जानेवारी रोजी नुक्कड बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत होणाच्या या संमेलनात विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील मुक्तसंवाद, अ. ल. क. कथांचे सादरीकरण आणि बालकांचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग असलेले बालसाहित्य संमेलन अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे, अशी माहिती आयोजकांतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.


'
भय इथले संपत नाही'चे अभिवाचन
। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'एम्फी थिएटर' मध्ये होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि संपादक डॉ. रमेश वरखेडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. रमेश वरखेडे यांचे बीजभाषण होणार असून यावेळी ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यानंतर सकाळी ११.१५ वाजता 'मराठी भाषा, अभिजातता आणि साहित्यिक उपक्रम' या विषयावर डॉ. आनंद काटिकर आणि मिलिंद शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये स्वानंद बेदरकर, कीर्ती जोशी आणि प्रांजली देशपांडे सहभागी होणार आहेत. दुपारी १२.१० वाजता 'भय इथले संपत नाही' या कार्यक्रमात देवेंद्र भिडे हे भयकथांचे अभिवाचन करणार आहेत. दुपारी १२.४० वाजता नुक्कड कथाविश्वचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. दुपारी २ वाजता राजेंद्र वैशंपायन यांच्या अध्यक्षतेखाली 'माझी अ. ल. क.' हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३.१५ वाजता 'कथा, कविता, कादंबरी आणि तरुण' या विषयावर खुले चर्चासत्र होणार आहे. याचे अध्यक्षस्थान डॉ. रुपाली शिंदे आणि अभिजित थिटे भूषविणार असून त्यामध्ये अनिरुद्ध प्रभू सुचिता घोरपडे आणि गीतेश शिंदे सहभागी होणार आहेत. दुपारी ४.१५ वाजता नुक्कड साहित्य संमेलनाचा समारोप डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५ वाजता 'फोकलोक' हा लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे.


चिमुकल्यांसाठी 'क.. कवितेचा'
रविवार, दि. ५ जानेवारी रोजी होणाऱ्या बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यकार मंगला वरखेडे यांच्या बीजभाषणाने होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय ढोले उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११.१५ वाजता ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 'क.. कवितेचा' या कार्यक्रमात लहान मुले स्वरचित कविता सादर करणार आहेत. दुपारी १२ वाजता सागर मांडके यांचा 'गोष्ट इथे संपत नाही' हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.५० वाजता 'ऐकू या, गाऊ या हा कार्यक्रम मधुवंती पेठे सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता रवींद्र सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली 'ऐका माझी नाट्यछटा' या कार्यक्रमात लहान मुलांचे नाट्यछटा सादरीकरण होणार आहे. दुपारी ३ वाजता बालगीत इंडिया आणि स्वरतेज संगीत विद्यालय यांची 'बालगीत मैफील' होणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता ज्येष्ठ लेखिका, बालसाहित्यकार आणि संपादिका डॉ. मंदा खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली या बालसाहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. यानंतर दुपारी ४.३० वाजता बालनाट्य सादर होणार आहे. सर्वांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या दोन दिवसीय संमेलनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 
- तरुण भारत