मोराची आई

मोराची आई

शिक्षण विवेक    12-Mar-2024
Total Views |


मोराची आईमोराची आई

मोर हा सुंदर मनमोहक पक्षी. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताच पिसारा फुलवून थुई-थुई नाचणार्‍या मोराच्या आनंदमयी आविष्कराचे विलोभनीय दृश्य पाहणे सर्वांनाच आवडते. परंतु गेल्या काही वर्षात मोरांची संख्या कमी झाली आहे. मोरांचे दर्शन दुर्मिळ झाले असले तरी सातारा शहराचे वैभव असलेल्या अजिंयतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असेलल्या घनदाट वनराईत मोरांच्या थव्याचा वनवास आहे. याच किल्ल्याच्या माचीच्या पायथ्याशी राहण्यार्‍या ललिता वसंत केसव यांना मोरांची अन्नासाठी भटकंती लक्षात आली आणि ललिता ताईंनी मोरांना अन्नपाणी द्यायचे ठरविले. अजिंयतारा किल्ल्यावर गेली १७ वर्ष मोरांच्या खाद्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार्‍या ललिताताई परिसरात ‘मोरांची आई’ याच नावाने त्यांना हाक मारली जाते. मोरांना दररोज ५ किलो धान्य खाऊ घालणार्‍या या माउलीला एखाद्या दिवशी डोंगरावर जायला उशीर झाला तर घरापाशी येऊन मियाँऊऽऽ मियाँऊऽऽ, असा आवाज काढून ही मोरांच्या आईची बाळं ललिता ताईंना साद घालतात. ललिताताई स्वत "बाळा, ऐ बाळा”, अशी हाक मारताच इतरत्र विखुरलेले मोर त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन धान्य खाण्यासाठी एकत्र येतात. डोंगरावरील मारूती मंदिरापेक्षा असलेल्या एका खळग्याला सिमेंटने लिंपून ललिताताईनी मोरांसाठी छोटासा पाणवठा तयार केला आहे.
अजिंयतार्‍यावर फिरायला येण्यार्‍याची संख्या मोठी आहे. माणसांची चाहूल लागली की, मोर दूर पळतात अशावेळी, ‘रस्ता बदला, मोर खातायत’ असं सांगून ललिताताई फिरायला आलेल्यांना रस्ता बदलायला लावतात. ललिताताईच्या सहवासाला सरावलेले मोर त्या दिसताच आनंदाने केकारव करतात. परिसरातील उंच खडकांवर, मंदिराच्या छतावर तांदूळ, ज्वारी, गहू आणि उन्हाळ्यात मटकी, मूग, हरभरा, वाटणा ही कडधान्ये ठेवतात. मोराबरोबरच इतर पक्ष्यांचेही थवेच्या थवे दिसून येतात. विविध सेवाभावी संस्थातून तसेच वैयक्तिकदेणग्यांतून तसेच धान्य स्वरूपात ललिताताईंना मदत मिळते.
पर्यावरण आणि पक्षी रक्षणाचा वसा घेतलेल्या ललिताताईंना सातारा नगरपालिकेने मोरांच्या पाण्याची व विजेची सुविधा केली आहे.
समाजातील काही विकृत लोक डोंगरावर काचेच्या बाटल्या फोडतात. काचेचे तुकडे मोरांच्या पायांना लागून रक्त येते. त्यावेळी ललिताताई कळवतात. त्या स्वत: काचेचे तुकडे वेचतात. उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांना गारवा हवा यांसाठी वड, पिंपळ, जांभूळ, बदाम, चिकू, चिंच, आंबा अशी अनेक झाडे त्यांनी लावली आणि परिसरातील झाडे त्यांनी जगवलीही. या झाडांना संरक्षक कवच बसवून ओला कचरा व गांडूळ खत घालतात.
गेल्या वर्षी ललिताताईंच्या मणयाचे ऑपरेशन झाले. तरीही त्यांनी दोन महिन्यानंतर काठी टेकत डोंगरावर जावून मोरांना खाद्य घातले. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा दिसून आली. ही पुण्याई मोरांचीच आहे, असे मनोगत ललिताताई व्यक्त केले. कार्तिक स्वामींचे वाहन असलेल्या मोरांची तहान-भूक भागवत असल्यामुळे आपली सर्व स्वप्ने पूर्ण होणारच याची त्यांना खात्री वाटते. ललिताताईंचे पती वसंत केसव हेही ललिताताईंना मोलाचे सहकार्य करतात.
पक्ष्यांचा निरपेक्ष भावनेने प्रेम व सांभाळ करणार्‍या ललिता केसव यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपणही त्यांच्याकडून आदर्श घेऊ या.
‘मोरांची आई’ यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही निसर्गाचे काही तरी देणं लागतो, हे लक्षात घेऊन आपणही निसर्गसंपदा जतन करण्यासाठी धडपडत असलेल्या हातांना मदतीचा हात देवू या.
- गौरी प्रदीप कुलकर्णी, उपशिक्षिका
कन्या शाळा, सातारा