एक तारा

एक तारा

शिक्षण विवेक    14-Mar-2024
Total Views |


एक तारा

 एक तारा
‘आई गं, घालून दे ना गं आजचा दिवस माझी सागरवेणी?’ राहीने सकाळपासून भुणभुण लावली होती.
‘आज उशीर झाला आहे. उद्या नक्की घालते.’ आईने तिचं ‘तेच ते’ उत्तर दिलं.
‘फक्त पाच मिनीटं जास्त लागतील.’ राही तिचा हट्ट सोडायला बिलकुल तयार नव्हती. शेवटी व्हायचं तेच झालं.आई चिडली. हातातला राहीच्या स्कर्टचा पिळा जोराने झटकत म्हणाली,‘पोळ्यांच्या कामावर जायच आहे. पण साधं सांगून तुला कळत नाहीच. छळायला जन्माला आली आहेस. बंडखोर, बिनडोक मुलगी आहेस तू!’
यावर राही गप्प राहिली. पलिकडचा कंगवा हातात घेऊन खसाखसा केस विंचरू लागली. आईकडे तिनं पाहिलं नाही. आता कावेरीलाच तिची दया आली. वाटलं ‘आपल्या पोरीवर आपण डाफरू शकतो. हक्काने चार शब्द बोलू शकतो. खरंतर सागरवेणीसारखी गोष्ट आहे. हौस काय ती तेवढीच करू शकतो आपण!’ कपड्यांची बादली स्नानगृहात सरकवून कावेरीने ओलसर हात तिच्या साडीला पुसले अन् राहिला पुढ्यात बसवून कंगवा स्वत:च्या हातात घेतला.
सागरवेणी घालून कावेरी गडबडीने तिच्या कामावर निघून गेली. घराला कुलूप लावून राही सुद्धा शाळेला निघाली. जाता जाता किल्ली आईकडे द्यावी म्हणून नयना मावशींच्या दारापाशी उभी राहिली. तोच कानावर शब्द पडले,‘जमत नसेल तर काम सोडून दे. वेळेवर पोळी-भाजी झाली नाही तर साहेब डबा कसे नेणार? जादाअचे चार पैसे फेकले की, दुसरी बाई मिळेल. कावेरी, कानात शिरत आहे ना तुझ्या?’ जळजळीत निखार्‍याप्रमाणे असलेल्या या वाक्यांनी राही खूप दु:खी झाली. आईच्या अपमानाने नाराज झाली. इतक्यात त्या घरात जाणार्‍या निलूताईकडे किल्ली देऊन राहीने शाळेचा रस्ता धरला. दिवसभर ह्या शब्दांमधली कटुता या पाचवीतल्या राहीला अस्वस्थ करत राहिली.
शाळा सुटल्यावर मैत्रिणी गप्पा मारत घराकडे चालल्या होत्या. ‘आज कोजागिरी आहे. संपूर्ण गोल गरगरीत चंद्राला दूधाचा नैवेद्य दाखवायचा अन् मग ते प्यायचं.’ स्नेहा खुशीत होती. अनु म्हणाली,‘आकाश नुसतं चांदण्यांनी भरलं आहे. परवा बाबा आणि मी रात्री शुक्राची चांदणी दिसते आहे का, ते शोधत बसलो होतो तर एक तारा तुटताना दिसला. मनातल्या मनात, डोळे मिटून मी माझी इच्छा सांगितली. आता ती इच्छा पूर्ण होईल. बाबाच तसं म्हणाला.’
‘खरं सांगते आहेस अनु? आकाशातून तारा तुटताना पाहता क्षणी इच्छा मागायची. ती पूर्ण होते?’ राहीने विचारलं.
‘येस!’ म्हणून अनुने राहीचा हात हातात घेतला. त्याचवेळी राहीने ठरवलं,‘आईला कोणाकडेही असं हलक्या पद्धतीचं काम नाईलाजाने करावं लागणार नाही असं काहीतरी होऊ दे. तिला ताठ मानेने जगू दे.’ ही आपली इच्छा आपण त्या तुटणार्‍या तार्‍याला सांगायची. इतर कुण्णाकुण्णाजवळ हे गुपीत फोडायचं नाही. राहीने ठरवून टाकलं रोज रोज रात्री खिडकीखाली झोपून राही आकाशाकडे पाहत बसू लागली. झोपून तरी कसं म्हणणार? अंथरूणावर पडून किंवा अभ्यास करण्याचं नाटक वठवून! घरी, एका खोलीत ४ जणं राहत होते.कोणाला अंधार हवा असायचा तर, कोणाला बाहेरच्या दिव्याच्या उजेडाचा त्रास वाटायचा. रात्री बारा नंतर नीजानीज व्हायची अन् नीरव शांतता पसरायची. अवनीवरती शांततेची दुलई पांघरणारी सृष्टीदेवता कशी असेल? कोणत्या रूपामध्ये दिसेल याची उत्सुकता राहीला वाटायची.
रोज रोज अभ्यासाचं नाटक करता करता राही खरंचच अभ्यास करू लागली. निरभ्र आकाशाचं, चमकणार्‍या चांदण्यांचं आकर्षण तिच्या मनात जागलं. ध्रुवतारा, सप्तर्षी, धुमकेतू विषयीची माहिती जाणून घेता घेता राही, हरीण आणि हरीणाच्या आकारात तारे () सारखे कळत होते. दृष्टीला दिसत होते; परंतु या तारका समुहाला हे नाव कसं मिळालं हे राहीला जाणून घ्यायचं होतं. शाळा सुटल्यावर तिनं सुमनताईंना गाठलं. तेव्हा कळलं, ‘व्याध’ हा अतिशय तेजस्वी तारा आहे. अगस्तीच्या दुप्पट तेजोमय! तो ‘द्वैती’ तारा आहे. ‘व्याध-अ’ आणि ‘श्वेत बटुला व्याध’ ही जोडगोळी सतत एकमेकांभोवती परिभ्रमण करत असते. ‘व्याध-ब’ ‘व्याध-अ’ला स्वत:कडे खेचून घेतो. दोघांभोवती ‘चुंबकीय क्षेत्र’ तयार होते. मृग नक्षत्राच्या एका मध्यभागी एका सरळ रेषेतले तीन तारे जोडून ती रेषा पुढे वाढवली की, ती व्याध तार्‍यामधून जाते. हे अलिकडचे तीन तारे म्हणजे व्याधाने (शिकार्‍याने) मृगाला मारलेला बाण आहे. काल्पनीक असल्या तरी तार्‍यांच्या कथा रम्य आहेत.
अलीकडे राहीला जाणवू लागलं होतं की, कोणतीही नवीन वस्तू वा देखावा पाहताना आपण आपल्या परिचयाच्या गोष्टींशी तो जोडून पाहतो. मग लक्षात ठेवतो. तुटणार्‍या तार्‍याची मात्र संगती लावता येत नव्हती, कारण अजुनही तारा तुटताना दिसलाच नव्हता. एवढं कळलं होतं की, पडल्यावर तार्‍याला ‘पाषाण’ रूप मिळतं.
सुमनताई, रूपादीदी, भुषण अंकल वेळोवेळी राहीच्या शंकांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचे. राहीची सातवीची वार्षिक परिक्षा जवळ आली होती. अभ्यास सुरू होताच; परंतु राहीला, अमेरिकेतल्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्राविषयी कळल्यापासून तिची उत्सुकता फार ताणली गेली होती. एके दिवशी शाळा सुरू सुटल्यावर बोलतबोलत राही सुमन ताईंच्या घरी गेली. त्यांनीही त्यांच्या मुलाला, राजेशला नासाविषयी माहिती द्यायला सांगितली. त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. अंधार पडला पण भान राहिले नाही. राहीचा बाबा सुमनताईंकडे आला आणि लेकीला मारतमारत घेऊन गेला. राहीला घरी जायला उशीर झाला होता हे खरं होतं; पण बाबाने ना राजेशचं ऐकलं ना सुमनताईंचं. त्या दिवसापासून राहीचं ताईंच्या घरी येणं बंद झालं; परंतु शाळेच्या वेळात ती शंकांचं निरसन करून घ्यायची. सूर्यमालेविषयी अधिक जाणून घ्यायची.
राहीच्या आईच्या पोळ्यांच्या कामात खंड नव्हता. राहीच्या खगोलशास्त्र माहितीचा ‘पट’ वाढत होता. गोडी वाढत होती. राहीचा एकूण अभ्यासही सुधारला होता. राहीचं लायब्ररीत जाणं, पुस्तकं वाचणं, मैत्रिणींना एखादा प्रश्न समजावून सांगणं हे शिक्षकांच्या नजरेतून सुटत नव्हतं. आत्मविश्वासाचं तेज राहीच्या सावळ्या चेहर्‍यावर दिसायला लागलं होतं.
२२ जानेवारी. शाळेच्या स्नेह संमेलनाची तारीख जाहीर झाली. अर्थातच ती जेष्ठ-श्रेष्ठ खगोल तज्ञ डॉ. जयंत नारळीकरांच्या सोईने ठरवली होती. पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी मुख्याध्यापिका चंदना यांनी राहीवर सोपवली. राहीच काय, नववीचा सगळाच वर्ग तयारीला लागला. सभागृहात पताका फडकत होत्या. दारावर सुरेखसं कागदी फुलांचं तोरण वार्‍यासोबत झोके घेत होतं. भिंतींवर सुविचार लटकत होते. ती सुरेशची, म्हणजे त्याच्या वळणदार अक्षराची खासियत होती. माधवने नारळीकर सरांच्या स्वागतासाठी घराच्या बागेतली ‘गुलाब फुलं’ आणली होती.
डॉ. नारळीकर सर ठरलेल्या वेळी आले. सभागृहात शांतता पसरली. ‘तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे’ ही प्रार्थना मुलांनी एकसुरात गायली. वातावरण प्रसन्न झालं. डॉ. नारळीकरांचा स्त्कार झाल्यावर त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. अध्यक्षीय भाषण सुरू झाले. मधूनच ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारीत होते. सर्वांच्या माना त्याक्षणी राहीकडे वळत होत्या. राही अचुक उत्तरे देत होती. नंतर अध्यक्षांनी मुलांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली. ते शंका निरसन करत होते. निगर्वी, सोज्ज्वळ आणि देशाभिमानी असं त्यांचं व्यक्तिमत्व! विद्यार्थी, शिक्षक सारे सारे खूश होते. फोटोग्राफर जवळून-दूरून फोटो काढत होते. मिलिंदने इस्रो आणि श्रीहरीकोट्टाविषयी जाणून घेतलं शालेय ज्ञानाचही प्रकाश किरणांसारखं वर्तन आहे. ही माहिती सभागृहातल्या सर्वांपर्यंत अनायसें पोहोचली. प्रश्न संपले आहेत असं वाटेपर्यंत राही उभी राहीली. ‘सर, फ्रेड हॉईल खगोल तज्ञांसोबत आपण कोणता सिद्धांत मांडला ते सांगा आणि ‘जडत्वाचा’ विश्वरचनेशी असलेला सिद्धांत आपल्याकडून ऐकण्याची उत्सुकता आहे.’ राही खाली बसली. नारळीकर सर तिच्याकडे पाहून म्हणाले,‘अरे वा! म्हणजे माझ्या दोन सिद्धांतांची तुला माहिती आहे तर! मुलांनो, तुमच्यातल्याच या विद्यार्थीनीचं कौतुक करायलाच हवं. का ते सांगतो. परीक्षेसाठी तुम्ही मुलं उत्तरांची तयारी करता. प्रश्नाच्या अनुशंगाने उत्तरं लिहिता; परंतू या मुलीनं माझ्यासाठी विचारायच्या प्रश्नाचीही व्यवस्थित तयारी केली आहे. तिला सिद्धांत ठाऊक आहेत. कोणासोबत काम केलं आहे ते माहित आहे आणि विषयही ज्ञात आहे. खरंतर तिला सगळंच ठाऊक असणार; परंतु मला मोठेपणा द्यावा किंवा माझ्यातोंडून ऐकावं म्हणून प्रश्न विचारला. बेटा, नाव काय तुझं?’
‘राही’ राही नम्रपणे उभी राहीली.
‘माझ्याकडून या मुलीला बक्षिस जाहीर!’ असं म्हणत डॉ. नारळीकरांनी ५००रू.ची नोट बाहेर काढली. राहीचे डोळे भरून आले. व्यासपीठापर्यंतची वाटही धूसर दिसत होती. आनंद मनात मावत नव्हता.
एक तारा तुटत होता...!
- कविता मेहेंदळे.