
हिरवाईने नटलेले डोंगर. त्या डोंगराच्यामधून खळखळ, निर्मळ पाण्याची नदी. नदीच्या काठावर उगवलेले हिरवेगार, लुसलुशीत गवत, छोटुली गोडुली जांभळी फुले, डोलणारी गवतपाती, भुरभुरणारी मखमली फुलपाखरे, छोटे मोठे रंगीबेरंगी पक्षी, अशा या नयनरम्य, निसर्गरम्य, हिरवे गावात एक मोठी बाग होती. त्या बागेत आंबा, पेरु, चिकू, वड, पिंपळ, कडूनिंब, शमी, नारळ, बकुळ, सोनचाफा, प्राजक्त अशी अनेक फळझाडे, फुलझाडे होती. बाग मधुर फळांनी, सुगंधी फुलांनी बहरलेली गंधीत होती. बागेत अनेक फळझाडे असल्यामुळे वेगवेगळया ॠतुंमध्ये वेगवेगळी झाडे बहरत होती. अनेक पाखरांची घरटी जणू झाडांना फुटली होती. तर पोपट, खारुताई, सुतारपक्षी यांच्या ढोल्याही त्या झाडांवर होत्या. ती झाडे पाखरांचा आसरा, निवारा, अन्नदाता होती. अशा या परोपकारी, भरभरुन देणार्या सेवाव्रती झाडांच्या बागेत, एका कोपर्यात आंब्याच्या झाडाशेजारी केळीची झाडे होती. त्यांची चांगली मैत्री झाली होती. बागेत वाहणार्या वार्याबरोबर त्यांच्या एकमेकांशी चांगल्या गप्पा रंगत. त्यात सुख दुःखाची देवाणघेवाण तर आलीच.
वसंतॠतू येताच कोकीळच्या कुहूऽकुहूऽ मुधर सुरांनी बाग भरून गेली होती. आंब्याला मोहोर आला होता. बागेत मोहराचा दरवळ होता. झाड पाखरांनी भरून गेले होते. पाखरांच्या किलबिलाटाने झाडाला हैराण केले होते. फुलपाखरांनी, मधमाश्यांनी फुलांमधील रस, मध पिण्यासाठी झाडावर, फुलांभोवती पिंगा घातला. मध्येच जोराचा वारा येताच आंब्याच्या पानांनी सळसळ आनंद गाणे गायले. आजूबाजूच्या झाडांच्या सळसळ गाण्यांनी, सळसळ आवाजानी बाग भरून गेली होती.
केळीच्या झाडालाही वाटले आपणही आनंदगाणे गाऊया; पण वार्यामुळे त्याची लांबलचक नाजूक पाने फाटून गेली. केळीला खूप दुःख झाले, ते नाराज होते. आंब्याचे झाड केळीच्या झाडाला म्हणाले तू दुःखी, नाराज नको ना होऊ. मलाही खूप वाईट वाटते. तुझी पाने लांब, नाजूक आहेस म्हणून ती वार्यामुळे फाटली पण तो तुझा प्रकृतीधर्म आहे. देवाने तुझी पाने तशीच, नाजूक तयार केली आहेत. पण झाड नाराजच राहीले.
हळूहळू आंब्याचा मोहोर गळून गेला. त्याची जागा छोटयाछोटया हिरव्या कैर्यांनी घेतली. खारुताई, पोपट, मैना, भारद्वाज विविध पाखरांची झाडावर वर्दळ वाढली. माकडांच्या टोळ्या, पक्षीगण कैर्या खाण्यासाठी झाडाच्या अंगाखांदयावर उड्या मारून खेळत होती. आंब्याचे झाड फार आनंदी होते. काही दिवसातच कैर्या मोठ्या झाल्या. केशरी पिवळया आंब्याचे घोस झाडावर लोंबू लागले. आंब्याचा मधूर वास बागेत दरवळू लागला. आंबे खाण्यासाठी छोट्या मोठ्या पक्ष्यांनी, प्राण्यांनी झाडावर जणू ठाणच मांडले. लहान मुलांनी खोडकरपणा करून झाडाला दगडही मारले. बागवानाने अर्धवट पिकलेले आंबे झाडावरून उतरवून त्याच्या अढया घातल्या. आपली फळे खाऊन पक्षी, प्राणी, माणसे सुखावली पाहून परोपकारी आंब्याचे झाड सुखावले. परोपकार करणे हा तर झाडाचा गुणधर्मच आहे. आंब्याचे झाड फार फार आनंदी झाले होते.
सारा आनंद सोहळा पाहून केळीच्या झाडाला वाटले, असा आनंद सोहळा आपल्याला कधी अनुभवायला मिळणार? पंख फडफडून चिवचिवाट, किलबिलाट करणारी ही पाखरे आपल्या अंगाखांद्यावर कधी खेळणार, आपल्याबरोबर कधी खोड्या करणार. आपण या पाखरांच्या, कोणाच्याही काहीच उपयोगाचे नाही. ते खूप दुःखी, कष्टी झाले होते.
त्याच वेळी बागेतून वनदेवता जात होती. ती बागेतील सर्वच झाडांना त्यांच्या चांगल्या कामासाठी आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांची हालहवाल जाणून घेण्यासाठी आली होती. ती त्याला म्हणाली, ‘एवढा आनंद सोहळा बागेत चालू आहे तू असा शांत शांत, दुःखी का?’ झाडाने सांगितले,‘मलाही आंब्याच्या झाडासारखाच परोपार करावा असे वाटते.’ वनदेवता त्याला म्हणाली,‘प्रत्येक झाडाचा उपयोग वेगवेगळा आहे. तुझ्या पानांचा, तुझा उपयोग माणसे पवित्र पुजेत करतातच. त्याचप्रमाणे मोदक, पातोळ्या, आंबोळ्या शिजवण्यासाठी करतात. तर माणसाला जेवायलाही तुझ्या पानांचा उपयोग होतो.’ पण त्याला तिचे म्हणणे पटले नाही. ते रडू लागले. वनदेवतेला त्याचे दुःख दूर करावेसे वाटले. तीने झाडाला आशीर्वाद दिला,‘सगळे तुझ्या मनासारखेच होईल. तुला आंब्याच्या झाडाप्रमाणे पाखरांना, प्राण्यांना अंगा खांद्यावर खेळण्याचा, त्यांना खाऊ घालण्याचा आनंद मिळेल. परोपकाराचे समाधान मिळेल. तुझ्या झाडाला केळीला फुल येईल. जे केळफुल, फुलोरा म्हणून ओळखले जाईल. त्यापासून भरपूर केळी-फळे तयार होतील. तुला हवा तसा परोपकाराचा आनंद मिळेल. परोपकाराचे काम करता करता, एकदा का केळीचा घड, केळी तयार झाली पिकली की, तुझे आयुष्य हळूहळू संपून जाईल. तुला चालेल ना? तुझ्या जमीनीत असलेल्या कंदातून नवीन झाडे जन्म घेतील. ती तुझा परोपकाराचा वारसा पुढे चालवतील. पण तुला एक आणि एकच केळफुल, फुलोरा येईल. ज्याच्यापासून फळांचा घड तयार होईल. नंतर परत फुलोरा येणार नाही. आंब्याच्या झाडासारखे खूप खूप आयुष्य मी तुला नाही देऊ शकणार.’
केळीचे झाड आनंदाने तयार झाले. त्याला आयुष्य कमी असले तरी चालणार होते. आपली फळे पक्षी, प्राण्यांनी, भुकेलेल्यांनी खावी अशी त्याची खूप खूप इच्छा होती. त्याने वनदेवतेचे म्हणणे मान्य केले. त्याने पाहिले होते आंब्याच्या झाडाची जुनी पाने शिशीरात गळून झाडावरुन गळून जातात. वसंत ॠतूत येणार्या नवीन पानांना जागा करून देतात.
काय आश्चर्य, वनदेवतेच्या आशिर्वादाने केळीच्या झाडाला लवकरच लोंबते केळफुल आहे. केळफुलाचा जन्म झाला. केळीला फुलोरा आला. विविध पाखरे, मधमाशांनी केळफुलाभोवती पिंगा घातला. केळीच्या झाडाला आनंद झाला. थोडया दिवसातच केळीच्या झाडाचा फुलोरा गळून जाऊन बोटाएवढी छोटीछोटी हिरवी केळी घडावर दिसू लागली. झाडाच्या घडावर आठ दहा फण्या होत्या. प्रत्येक फणीत १७-१८ केळी होती. अशा तर्हेने केळीचे झाड फळांनी (केळयांनी) भरून गेले. अनेक पाखरे, खारुताई, माकडे अशा प्राण्यांनी केळी खाण्यासाठी झाडाच्या अंगाखांद्यावर उडया मारल्या. काही दिवसातच हिरवी केळी पिकून पिवळी आणि पिकलेल्या केळयांचा वास बागेत पसरला. अनेक पक्षी, प्राणी माकडांनी केळयांचा फडशा पाडला. बागवानाने केळीचे घड तोडून गाडीत भरले. केळीच्या झाडाला आनंद झाला. त्याची प्राणी, पक्ष्यांना फळे खाऊ घालण्याची इच्छा पूर्ण झाली होती. वारा येताच परोपकारी झाडाने आपली फाटलेली पाने हलवून आनंद गाणे गायले. आंब्याच्या झाडानेही त्याला सळसळ आनंद गाणे गाऊन साथ दिली. केळीच्या झाडाचा, म्हणजेच मित्राचा आनंद पाहून ते ही आनंदी झाले होते.
झाडाच्या प्रत्येक भागाचा पान, फळ, फुल, मूळ, खोड याचा माणसाला उपयोग होतोच. झाडे हवा शुद्ध करतात, झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणून झाडे जणू आपला श्वासच आहेेत. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा असा आपण ध्यास घेतला पाहिजे. त्यांची पूजा केली पाहीजे.
अशा सेवाव्रती परोपकारी झाडांची पूजा करणे म्हणजे निगा राखणेच आहे. त्यातून निसर्ग संवर्धन होवून पर्यावरण रक्षण होईल.
आपण लक्षात ठेवायला हवे पर्यावरणाचे रक्षण हे उज्वल भविष्याचे धोरण आहे.
पर्यावरण वाचेल, तरच जग वाचेल.
- रश्मी गुजराथी