'शिकू आनंदे'...बिनभिंतीची शाळा

शिक्षण विवेक    18-May-2024
Total Views |

'शिकू आनंदे' बिनभिंतीची शाळा 
मानसिक बेड्या तोडण्यासाठी 'शिकू आनंदे' प्रकल्प
दि.12 मे रोजी, खेड तालुक्यातील कशेडी घाटाच्या माथ्यावर 'शिकू आनंदे' बिनभिंतीची शाळा या शैक्षणिक प्रकल्पाचे उद्घाटन श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्री पुरुषोत्तम लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विजय भिडे, पुरुषोत्तम साखळकर, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर म्हणाले, "बिनभिंतीच्या शाळांतील शिक्षणाला अनेक प्रकारचे पैलू असतात. या शिक्षणाला भिंतीच्या सीमा नसतात. एकलव्य हा अशा शिक्षणाचा सर्वांत मोठा विद्यार्थी आहे. अनेकदा आपल्याला आपल्या चौकटीबाहेर उडी मारवत नाही. हा प्रयोग यासाठी महत्त्वाचा आहे की, आपल्या आकलनाच्या बाहेर असलेल्या संधी अशा प्रकरणातून मिळते. हा लढा भिंतीतील शिक्षणाशी नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक बेड्यांशी आहे. मानसिक बेड्या तोडून सर्व पातळीवर यश देणारे मूलभूत शिक्षणाचे धडे देणारा प्रकल्प येथे निर्माण होईल, असा मला विश्वास वाटतो.
प्रकल्पाचे प्रवर्तक विजय भिडे यांनी आमच्याशी संपर्क केला तो एक सुखद धक्का होता. कारण अनेक जण आपला अहंकार सोडायला तयार नसतात. पण विजय भिडे यांच्या मनाचा मोठेपणा हा की आपण रूजवलेला, वाढवलेला हा प्रकल्प ज्याच्याशी ते एकरूप झाले होते, तो त्यांनी विवेकला विचारपूर्वक सुपुर्द केला. व्हायब्रंट एनर्जी देणारे एक केंद्र म्हणून हे ठिकाण विकसित होईल."
१९८४ साली विजय भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तळमळीने बिनभिंतींची शाळा हा शिक्षण क्षेत्रात विधायक बदल घडवून आणण्यासाठी सुरू केलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.
"माझ्या वयोमानापरत्वे मी येथे काम करण्यावर आता मर्यादा आहेत. म्हणून विवेक परिवाराने हे काम पुढे न्यावे, ही माझी इच्छा होती. ज्यांचा या व्यवस्थेवर विश्वास आहे त्यांनाच मला ही जागा द्यायची होती. आज या संस्थेला ही जागा सोपवल्या नंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकसित करण्यासाठी घेतली ते पहिल्यावर मी माझ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना आहे. प्रकल्पात यापुढेही मला जे योगदान देणे शक्य आहे ते मी नक्कीच देईन." असे उद्गार विजय भिडे यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.
'शिकणं ही आपल्या आतली प्रक्रिया आहे.' आणि त्या प्रक्रियेला आपण कसं फुलवत न्यायचं याची शिकवण देणारा हा प्रकल्प विजय भिडे यांनी शिक्षणविवेक आणि विवेक स्पार्क फाऊंडेशन या शैक्षणिक चळवळीकडे सुपूर्द केला.
शिक्षणविवेक आणि विवेक स्पार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिकू आनंदे या प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट करताना, प्रकल्पाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांनी आनंददायी शिक्षणासह व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा प्रकल्प पूर्ण ताकदीने काम करेल अशी शाश्वती दिली.
हा प्रकल्प समाजातल्या 'संवेदनशील' व्यक्तींनी एकत्र येऊन काम करण्यासाठी आहे. शिक्षण, साहित्य, कला यांच्या संगमातून हा प्रकल्प अधिक ताकदीने उभा राहील अशी खात्रीही या वेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी प्रसाद डोईफोडे, गणेश वांजळे, सुरज शिंदे, गणेश यांनी गेले दीड वर्ष सातत्याने इमारत उभी करण्यासाठी योगदान दिलं, त्यांचे सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शिक्षणतज्ज्ञ दत्तात्रय साळुंखे, रायगड जिल्हा संघचालक शिवराज भागवत, कार्यवाह प्रशांत ढेपे, डॉ. समीर साळुंखे, श्रीमती शहा आणि कशेडी, पोलादपूर, खेड परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महेश पोहनेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, तर सूत्रसंचालन विवेक स्पार्क फाऊंडेशनच्या संचालक मुग्धा वाड यांनी केलं. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने करण्यात आली.