
आमच्या आजीला आमची आई एकटीच आणि आजीची आम्ही चार नातवंडे. मी आणि माझे तीन भाऊ शाळेला सुट्ट्या लागल्या की आजोळी जायचो. आजीचा छान वाडा, वाड्या पुढे पडवी व पुढे मोठे अंगण. अंगणाच्या बाजूला छान पैकी गाईचा गोठा. वाकलवाडी असे आजीच्या गावाचे नाव. सगळी ठाकर वस्ती. पण आम्ही शहरातले सुट्टीत तिकडे गेल्यावर त्या ठाकरी मुलांना खूप आनंद व्हायचा. सकाळी उठलं की आम्ही व ती ठाकरी मुलं अंगण झाडत असू व शेणाचा सडा घालत असू. आजीच्या अंगणाशेजारी गाय, बैलांचा गोठा होता. त्यामुळे शेण मिळत असे. मग आम्ही मुलं आमच्या पद्धतीने पांढऱ्या चुन्याच्या रांगोळ्या काढत आणि ठाकरी मुलं वारली पद्धतीच्या रांगोळ्या काढत असत. त्या आम्हांला खूप आवडत तेव्हा रांगोळी स्पर्धा वगैरे नव्हत्या, पण आम्ही काढलेल्या रांगोळ्या आजी कौतुकाने पाहत असे. त्या काळी रांगोळी वगैरे प्रकार नव्हता, कारण वाऱ्याने रांगोळी उडून जात असे. लाल रंगाची काव जमिनीला लावून त्याच्यावर पांढऱ्या चुन्याने रांगोळ्या काढायच्या आणि मग आम्ही अंघोळीला जात असू. अंघोळ करून आल्यावर त्याच अंगणात नाश्ता करायला बसायचो. नाश्ता झाल्यावर आम्ही अंगणात खेळायचो. मामी बाळाला अंगणात बसून वरण भात खाऊ घालत असे. (आईला चुलत भाऊ होता. आजी गावची पाटलीण. सगळा कारभार पाहत असे. कधी आमच्याकडे आली तरी मामा लगेच तिला घ्यायला यायचा. मला ते कळतच नसे. मी आईला विचारत असे की मामा लगेच आजीला घ्यायला का येतो? तेव्हा आई म्हणत असे की त्याचे आजीवर प्रेम आहे.)
बाळाला खाऊ घालताना मामी अंगणात दाणे टाकत असे. ते खाण्यासाठी चिमण्या कावळे जमा होत असत. चिमण्या कावळ्यांना पाहून बाळ आनंदाने जेवण करत असे. दुपारच्या उन्हात आम्ही मुलं पडवीत बसून सागरगोटे, सापशिडी, पत्ते, चल्लसपाणी असे खेळ खेळत असू. तेव्हा कितीही ऊन असले तरी अंगणातून गार वारा येत असे. कारण आजूबाजूला छान हिरवीगार झाडी होती. संध्याकाळी उन्हं उतरली की अंगणात लंगडी, पळापळी, लपाछपी असे धावते खेळ खेळत असत. खूप खूप मजा येत असे. रात्री अंगणातच जेवणाची पंगत बसे. आजूबाजूची ठाकरी मुलं ही आपापली जेवणाची ताटं घेऊन तिथे जेवायला बसत असत. जेवण झालं की आम्ही सगळे अंगण झाडून तेथेच अंथरूण टाकत असू. आजूबाजूची मुलं आपापली अंथरून घेऊन आमच्या इथे झोपायची. अंगण खूप मोठे होते म्हणून आजी छान गोष्ट सांगत असे. आकाशातील चंद्र-तारे बघता बघता, आम्ही कधी झोपून जायचो कळायचेच नाही. मी झोपेतून उठल्यावर अंगणाला नमस्कार करत असे. मी आजीला म्हणाले आजी मी मोठी झाल्यावर, माझं लग्न झाल्यावर, हे अंगण मला देशील का गं? तेव्हा आजी हसायची आणि मला म्हणायची, ‘अगं बाळा, अंगण म्हणजे काय वस्तू नाही की, ती उचलून तुलादेता येईल. तुला जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तू ये अंगणात बसायला, वावरायला.
’दहा-पंधरा दिवस कसे पटकन निघून जायचे आणि मी अंगणाला नमस्कार करून पुन्हा सुट्टीत येईन असं सांगायचे. डोळ्यांत पाणी यायचं. ‘शहरात कुठले अंगण? आम्ही भाड्याच्या खोलीत राहत होतो. आता शिकून मोठे झालो. सोसायट्यांमध्ये स्वतःची घरं झाली, पण अंगण. कुठलं अंगण हे माझं स्वप्नच राहिलं.
- मंगला वाडेकर, पालक,