
चिव चिव चिव चिव.. अरे ओळखलं का मला ? मी चिऊताई बोलतेय.. हो, सांगावं लागत आहे मला कारण, मी आता जास्त दिसत नाही तुम्हाला. आमची संख्या कमी होऊ लागली आहे आता.
'जहाँ डाल डाल पर सोनेकी चिड़ियां करती है बसेरा, वो भारत देश है मेरा!' एकेकाळी भारतात खूप समृद्धता आणि आनंद होता हे दर्शवणाऱ्या या गाण्याच्या ओळी माझं भारतातील अस्तित्वही अधोरेखित करतात. पक्षीवर्गाच्या पेसरिफॉर्मेंस गणातील आणि पेसरिटी कुलातील पॅसर प्रजातीच्या पंचवीस जातींपैकी मी एक पक्षी आहे. माझे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिक्स् आहे. माझी लांबी साधारण १६ सेमी असून वजन १३ ते ३९ ग्रॅम आहे. मी एका वेळेला ३ ते ५ अंडी देते. माझ्या अंडी उबवणीचा काळ १४ ते १७ दिवसांचा आहे. वाळलेले गवत, पिसे, कापूस यांपासून आम्ही आमचे लहानसे घरटे झुंबरे, वापरण्यात नसलेले कोनाडे, वळचणीची जागा इ. ठिकाणी नर-मादी असे दोघे मिळून तयार करतो. मूळची युरोप, भूमध्य प्रदेश आणि आशियामध्ये असणारी मी आता जगभर पसरले आहे. भारतात काही ठिकाणी मला ‘तपकीर' असेही म्हणतात. मी दिल्ली व बिहार या राज्यांचा राज्यपक्षी आहे.
'चिऊताई.. चिऊताई दार उघड' हे बडबडगीत म्हणत तुमचे आई-बाबा लहानाचे मोठे झाले. 'थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे..' यातून माझी पिलांप्रतीची काळजी, माझी कर्तव्यनिष्ठा दिसते.. माझं घर मेणाचं होतं यातून माझी दूरदृष्टी दिसते.. पण दिसणाऱ्यालाच बरं का !!
एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. आता कोणच म्हणत नाही.. सर्वत्र आलाय कबुतरांचाच (पारव्यांचाच) महापूर.. ऐकू येत आहेत का माझे चिव चिव असे सूर? चिमण्या कवितांमध्ये, धड्यांमध्ये, गाण्यांत आहेत परंतु पाहण्यात नाहीत !
सगळ्या प्रकारची धान्ये, किडे, सुरवंटे, नाकतोडे, कोळी, फळे, कोवळ्या रोपांचे शेंडे वगैरे माझे खाद्य आहेत. मुलांनो, तुम्ही च्युईंगम खाऊन कुठेही फेकता आणि अन्न म्हणून आम्ही पक्षी ते खायला जातो, तर आमची चोच चिकटते, आमचे पाय चिकटतात... आम्हांला काहीच करता येत नाही. मुख्यत्वे मकरसंक्रांती व इतर दिवशीही आपण आनंदाने पतंग उडवता, पतंगाच्या मांजामध्ये आमचे पंख अडकून आमची अवस्था काटलेल्या पतंगासारखी निष्प्रभ अशी होते. आम्हांला नीट उडताही येत नाही. बुद्धिजीवी आहात तुम्ही.. सर्व सजीवांचा जीव जाणा. एवढेच सांगावेसे वाटते..
मनुष्य आणि पर्यावरणीय घटक यांच्यामधील ऋणानुबंधाची वीण घट्ट असेल तर पर्यावरण क्षीण होणार नाही. मला शेतकऱ्यांचा मित्रही म्हणतात. परंतु, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतींमुळे, घरट्यांसाठीच्या जागांची आणि अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशके यांचा शेतातील वाढता वापर, नागरिकांमध्ये पक्षांबाबत असलेले अज्ञान इ. कारणांमुळे आमची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मोबाईल टॉवर्समधून होणाऱ्या विद्युत चुंबकीय उत्सर्जनामुळेही आमची संख्या घटत आहे.
आम्हांला मातीची अंघोळ लागते; परंतु पायाला धूळ न लागू देणाऱ्या माणसांमुळे शहरांमध्ये तर सर्वत्र सिमेंट काँक्रिटचे रस्ते व त्याच्या शेजारी सिमेंटचेच ब्लॉक. जरासुद्धा धूळपायाला लागणार नाही याची माणसांनी पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे, पण आमचे काय ? आमचा कोण विचार करतो !! पावसाच्या पाण्याचे लोटच्या लोट नदीला जाऊन मिळतात. जरासुद्धा पाणी मुरायला संधी नाही. पाहवतच नाही आम्हाला ते.
आमचे पर्यावरणीय महत्त्व किती आहे आणि आमची संख्या कमी होऊ लागली आहे हे माणसाला जाणवू लागले आहे. मुलं जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देऊन नव्हे, तर प्रत्यक्षामध्ये आम्हांला दाखवत चिऊ-काऊचा घास भरवायचा आहे.. असे वाटू लागले आहे. माणसाला असे वाटत आहे, म्हणूनच की काय आमच्या संवर्धनासाठी दरवर्षी दि. २० मार्च हा दिवस सन २०१० पासून 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला आहे.
चला आता येते मी. पंखात बळ आणून अन्नपाणी शोधलं पाहिजे. फार लांबचा पल्ला गाठायचा आहे ना !! माझ्या पिलांसाठी मी हे करणारच! तुम्हीही तुमच्या पिलांसाठी मला म्हणजेच चिऊला घास ठेवालच आणि जोडीला पाणीही
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या' या स्वर्गीय लता दिदींनी गायलेल्या भावपूर्ण गाण्यामध्ये आम्हालाही आमचे चिवचिव असे सूर एकरूप करावेसे वाटत आहेत; परंतु हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे! स्वाध्याय : शेतकऱ्याचे मनोगत, सैनिकाचे मनोगत, कोरोनायोध्याचे मनोगत, झाडाचे मनोगत, सूर्याचे मनोगत, किल्ल्याचे मनोगत, नदीचे मनोगत, सह्याद्रीचे आत्मवृत्त, ढगाची कैफियत इ. विद्यार्थ्यांनो यापैकी कुठल्याही घटकाचे आत्मवृत्त लिहा..
- प्रेमला अरुण बराटे