
आठवणीतला पाऊस म्हणताक्षणी मला माझे बालपण आठवले आणि तोच खरा स्मृती पटलावरील पाऊस! लहानपणी सुट्टी पडली, की गावी (कोकण) जात असे. उन्हाळा संपत आला की मिरगवणीची तयारी घरातील ज्येष्ठ मंडळी करत. सात जून मिरग सुरू! ‘पाऊस येतलो तयारी करूक होई’, असे म्हणत तयारी सुरू आणि खरंच पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येई. ‘मिरग सुरू’! आम्ही लहान मुले या पावसात मुक्तपणे भिजत असू आणि मग जेवणावर मनसोक्त ताव! निरागस बालपण या पावसात मनसोक्तपणे विहरत असे.शेतकरी शेतात खोळ (प्लॅस्टिकचा कागद) डोक्यावर घेऊन शेतातील कामे करत.
मुंबईला आल्यावर मग काय छत्री, रेनकोट घालून शाळेत पालकांसोबत जात असत. गावचा, मुंबईचा पाऊस तोच, पण पाऊस अंगावर झेलण्याची पद्धत वेगळी. आठवणींतला पाऊस वेगळा तो काय? सुखद अनुभूती घेता येणे, बळीराजा शेतात जाऊन सर्वांच्या उदरभरणासाठी राबतोय आणि स्वतःही त्याचा आनंद घेतोय.मोठे झाल्यावर मनातला आठवणींतला पाऊस आकाशातून जमिनीवर येत होता. अगदी चातकाप्रमाणे त्याची वाट बघतच असतो, पण या पावसात एक अवखळ अदा असते मनाची हाक असते, भिजण्याची आस मनाला गारवा देतो. पाऊस तनामनात झेलत अखंड भिजणे, हा पाऊस ओलावा कायम स्मृतिपटलावर असतो. आठवणींतला पाऊस सुखकारक, जीवनदायी, सृजनाची निर्मिती करणारा असतो. अर्थात प्रत्यक्षात त्याचे स्वरूप बदलले. त्याला कारण आपण माणसेच! पाऊस लांबला, मिरगाची मिरगवणी दुरापास्त झाली. असे असले तरी अजूनही वेळ गेली नाही. आपल्या मनातील सुखकारक, जीवनदायिनी मृगसरी नक्की बरसतील. आपण पाणी अडवून जिरवू या, वृक्षारोपण-संवर्धन करू या, प्राणी, पक्षी, निवारे संवर्धन करुनी, मोराला नाच रे मोरा आंब्याच्या वनात त्यासाठी वन, जंगल सुरक्षित करू या म्हणजे मग आठवणीतील पावसाच्या सरी बरसतील.
आनंदाचा परमानंद !
तू वसुंधरेचा ध्यास !
तू मनीची आस तू !
- - - ऋतुजा गवस