शाळा सुरू होऊन एक आठवड्यातच आईला रीयामध्ये फरक जाणवायला लागला, कारण सुरुवातीला उत्साही असणारी रिया आता मात्र काहीशी शांत झाली होती. अभ्यास सुरू झाला म्हणून कदाचित होत असावं असं वाटून आईने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्याच दिवशी शाळेतून आल्याबरोबर रिया मात्र चिडचिड करत होती. आईने प्रेमाने जवळ घेऊन तिला बोलतं केलं. तेव्हा काही काही तिच्या लक्षात आलं. तो विषय तिथेच थांबवून आई स्वतःच्या विचारात गुंग झाली. सुट्टी सुरू होण्यापूर्वीच्या पालकांसमवेत बाईंनी सर्व पालकांना सांगितलं होतं की टी.व्ही., मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी मुलांना घरातील छोट्या छोट्या कामांत मदत करायला सांगा. त्यांना मोबाईल गेम का आवडतात? कारण त्यात जिंकल्यावर लगेच Wow!, Great!, You Rock!, you win! यासारखे शाबासकी देणारे मेसेज येतात आणि हरल्यावर Better luck next time! म्हणत प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे त्यांना महत्त्व दिलं जातं. तसेच तुम्ही पालकांनीही मुलांना छोट्या कामातील व्यवस्थितपणासाठी, काम करण्यासाठी शाबासकी द्या आणि म्हणूनच आई रियाला घरात काम सांगून तिच्याशी प्रेमाने बोलूनच कामे शिकवत होती. पण हे सर्व करताना रिया एकटीच त्यामुळे इतरांशी मिळून मिसळून काम कसं करायचं हे तिला माहीतच नव्हते.
आईला आता तिच्या चिडचिड करण्यामागचं कोडं उलगडलं! रिया म्हणत होती की, मी बाईंना म्हटलं की मी एकटीच हे काम करते तर त्यांनी अजून दोघींनाही माझ्यासोबत पाठवलं. इतरांशी समायोजन करण्यात तिला कठीण होत होतं आणि बाईंविषयी राग निर्माण झाला होता.यावर आईबाबांनी दोघांनी तिच्याशी बोलून तिला समजावलं. वर्गात एवढ्या सगळ्या मुली असताना प्रत्येक गोष्ट तुलाच करायला मिळावी हे चुकीचं आहे. त्या मुलींनाही वाटत असणार की, मलाच सांगावं. हो की नाही? त्यापेक्षा तू असा विचार का नाही करत की तुझी मैत्रीणही काम असेल तर मदत करेल आणि ते अजून छान होईल किंवा ती अजून छान उत्तर सांगतेय तर मीही वेगळ्याप्रकारे विचार करून उत्तर द्यावं म्हणजे बाईंना आवडेल.खरंच की! आश्चर्याने रियाच्या तोंडून उत्तर आलं. तिला तिचा हट्ट समजला होता आणि सर्वांशी मिळून कृती किंवा प्रकल्प करण्याचे महत्त्वही कळले. बरं का रे, मुलांनो आपणंही कधीकधी असा हट्ट करतो आणि स्वत:ला त्रास करून घेतो; पण जर खरंच सगळ्यांनी मिळून एखादे कार्य केले तर ते नक्कीच सुंदर होते आणि सर्वांनाही शिकायला मिळते. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ !
- -- जुलेखा इनामदार