शूर मुलगी...

शिक्षण विवेक    29-Jun-2024
Total Views |


शूर मुलगी ...

   एक शहर होतं. तिथे एक इमारत होती. दररोज इमारतीतील मुले खाली खेळायला येत असत. एके दिवशी संध्याकाळी मुले नेहमीप्रमाणे खाली खेळत होती आणि अचानक एक कोल्हा त्या इमारतीत शिरला. मुले खेळात दंग होती. तेवढ्यात प्रांजलला तो कोल्हा दिसला. तिने लगेच आपल्या मित्रांना सावध केलं आणि दुसरीकडे पळून जाण्यास सांगितले; पण ती स्वत: मात्र तिथेच थांबली आणि कोल्ह्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवत राहिली. तिने आईने सांगितलेल्या गोष्टीत ऐकले होते की जंगली जनावरे आगीला घाबरतात. त्याक्षणी तिने एक लाकूड घेऊन त्याची मशाल केली आणि कोल्ह्याच्या दिशेने न घाबरता चालू लागली. इतर सगळी मुले घाबरून सैरावैरा पळू लागली. कोणी घरात जाऊन लपून बसले तर कोणी घाबरून रडू लागले. प्रांजलने मात्र कोल्ह्याला पळवून लावायचे ठरवले. तिच्या हातातील मशाल पाहून कोल्हा मागेमागे जाऊ लागला आणि शेवटी मशालीच्या आगीला घाबरून कोल्हा पळून गेला. प्रांजलने आपल्या मित्रांना बोलावले व कोल्हा गेल्याचे सांगितले. सगळ्या मित्रांना खूप आनंद झाला. सगळ्या मित्रांनी आनंदाने प्रांजलला उचलून घेतले. तिच्या धाडसी व शूरपणाबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले. तेवढ्यात, प्रांजलच्या कानावर आईचा आवाज आला, “ प्रांजू, बाळा, उठ आता. सकाळ झाली.” प्रांजल म्हणाली, “काय गं आई, आत्ताच तर मी कोल्ह्याला पळवून लावलं.”, असं म्हणत तिने डोळे उघडले. बघते तर काय ती तर अंथरूणावर झोपली होती. ती म्हणाली, “अरेच्चा!! म्हणजे तो कोल्हा, ती मुलं, ती मशाल! हे सगळं स्वप्न होतं तर.”हे ऐकून आई म्हणाली, “अगं कोल्हा काय, मशाल काय, हे काय बडबडते आहेस?”, त्यावर प्रांजलने स्वप्नात घडलेली गोष्ट आईला सांगितली. आई म्हणाली, “शूर माझी बाळी ती!”, असे म्हणून आईने प्रांजलला प्रेमाने जवळ घेतले.

- प्रांजल सावंत